भय
भय
भय हा जीवितांचा शत्रू समजला जातो.
भय/भीती आपल्याला बुद्धीहीन करते.
भय निर्माण करून मूठभर स्वयंकेंद्रित, सत्ता पिपासूं, स्वतःला समाजाचे ठेकेदार समजणारे, असंवेदनशील नराधम समाजाचे विविधांगाने शोषण करतात. आपल्यामधे भीती अनेक प्रकारची असू शकते.
यातील एक भीती आपल्याला कायमचे गुलाम बनवते.
एक भीती नवा मार्ग निर्माण करण्यापूर्वीची असते.
आज चोहीकडे जी अंधाधुंदी सुरु आहे त्यामुळे मला प्रचंड भीती वाटते.. होय ! मला भीती वाटते. नकारात्मक दबावाला थोपवून धरण्याचे आपले प्रयत्न कमी पडत आहेत. याची सतत जाणिव होते. हतबल व्हायला होत.
कुठे आणि कोणा कोणाला तोंड द्यायचं? हताश निराश होवून स्तब्ध होतो.. तेव्हा माझी मुलं समोर दिसतात.
आपल्या आईच्या तालमीत वाढत, भविष्याला आत्मविश्वासाने गवसणी घालण्यासाठी सज्ज आहेत.
त्यांच्याकडे बघून भीतीच्या बेड्या आपसूकच गळून पडतात. आपल्याकडे बघून येणारी पिढी लढण्यास सज्ज आहे. तर इतक्यात मला हार मानता येणार नाही. पुन्हा नव्या उमेदीने उभारी घेत भरारी घेते. मनात भीती असते.
परंतु नवनिर्मितीचे भय इतिहास घडवू शकते ! या एका विचाराने घेतलेल्या भरारीत अधिक बळ निर्माण होते.
ही भरारी आजच्या सर्व पिल्लांसाठी, त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी. पालक आहात तर ही जबाबदारी स्वीकारा. अन्यथा आपल्या पाल्ल्यांचे आपणच शत्रू ठरू.
भयाचे गुलाम होवू नका. मोडून काढा भीतीचे सावट. भेदाभेदाच्या भिंती पाडा. समाज सुरक्षित करा.
समजतंय का बघा..
- प्राची
*Photo credit google
Comments
Post a Comment