आज होळी .. म्हणजेच शिमगा..
आज होळी .. म्हणजेच शिमगा..
होळी हा सण कि उत्सव? त्या विषयी नेमकी अशी माहिती द्या असे अनेकांनी सूचित केले होते.
*डॉ. अशोक राणा लिखित "सणांची सत्यकथा"*
या पुस्तकातील होळी विषयी थोडी माहिती इथे देतं आहे.
हे पुस्तके सर्वांनी वाचावे असा आग्रह माझा आहे. इथे संपूर्ण लेख न देता त्यातील काही भाग देतं आहे याची नोंद घ्यावी. प्रत्येकाला आपली मुळे शोधता आली पाहिजेत. त्यासाठी शोध घेता यायला पाहिजे.
उत्सवांमधून समूहभावना व्यक्त होते. तसेच बदलत्या संदर्भाचे कोंदण उत्सवाच्या स्वरूपाला नवेपण आणते. म्हणून अनेक सण-उत्सव बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भातही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्या बदलत्या स्वरूपातही त्यामागील हेतू मात्र व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. होळी हा कोणत्यातरी प्रवृत्तीचा निषेध करणारा उत्सव तसेच सणही आहे. उत्सव सामूहिकपणे, तर सण हे व्यक्तिगत स्वरूपात कुटुंबात साजरे करायचे असतात. होळीच्या सणाला शिमगा म्हणूनही संबोधतात. शिमगा करणे म्हणजे निषेध करणे असा वाक् प्रयोग मराठीत आहे. शिमग्यालाच गोव्यामध्ये 'शिगमा' असेही म्हणतात.
होळीच्या सणामागील नेमके कारण कोणत्याही ग्रंथकाराने सांगितलेले नाही. परंतु विविध प्रकारच्या कथा या सणाशी जोडून त्याला धार्मिक व ऐतिहासिक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कथांमधून पुराणिकांना किंवा वैदिकांना ज्या व्यक्ती शत्रूवत वाटल्या त्यांचा निषेध मात्र व्यक्त झालेला आहे.
ज्याप्रमाणे होलिका दहनावरून हा सण आला असे म्हटले गेले. त्याप्रमाणे ढुंढा व पूतना या तथाकथित बालग्रहांच्या दहनाच्याही कथा पुराणांनी रचल्यात. भविष्यपुराणात होळीच्या सणाची कथा सांगताना म्हटलं आहे की, 'पूर्वी ढुंढा किंवा ढौढा नावाची एक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली. तेव्हा लोकांनी तिला बीभत्स शिव्या व शाप देऊन व सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिजवलं आणि पळवून लावलं.'
या कथेतील ढुंढा ही सुद्धा एखाद्या प्रदेशाची मातृका असावी. पूतना ही मथुरेची मातृका होती म्हणून त्या प्रदेशाला पौतन असे पूर्वी म्हणत असत. त्याचप्रमाणे ढुंढा व होलिकाही असाव्यात. त्याशिवाय त्यांच्या पूजनाचे विधी झाले नसते, हेही स्पष्ट आहे. आर्यपूर्व गणसमाजात मातृसत्ताक पद्धती होती. तिच्यातील सामाजिक समता ज्यांना नकोशी वाटत होती, अशा आर्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी तिचा निषेध केला आहे. त्यासाठी कथा व विधींचीही रचना केलेली आहे.
भारतीय संस्कृतीकोश (खंड १०, पृ. ४२९) प्रमाणे, होळीला तीन प्रदक्षिणा करून बोंब ठोकाची. अश्लील शब्द उच्चारावे, नाचावे व गावे. या विधीत सर्व प्रचलित विधीला वैदिक पोषाख चढवण्यात आलेला आहे. हे स्पष्टपणे दिसून येते. विशेष म्हणजे ढूंढा राक्षसीचा त्रास वाचवण्याकरिता होलिकेची पूजा करण्याचा संकल्प केलेला आहे. ढूंढा व होलिका या दोन्ही राक्षसी आहेत, असेही परंपरा मानते. वरील वैदिक विधीशिवाय जनमानसात रूढ विधीचीही माहिती या कोशामध्ये दिलेली आहे, ती अशी-
'होळी पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या पौर्णिमेच्या (म्हणजे माघी पौर्णिमेच्या दिवशी गावाच्या मध्यभागी अथवा चव्हाट्यावर एरंडाची फांदी पुरून होळीची मुहूर्तमेढ रोवतात. या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असे म्हणतात. नंतर फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवऱ्या जमा करायला आरंभ होतो. लाकडे-गोवऱ्या चोरून आणाव्या असा संकेत आहे. होळी पेटवण्यासाठी लागणारा विस्तव चांडाल ज्ञातीच्या एखाद्या माणसाकडून लहान मुलांच्या द्वारे आणावा, असे सांगितले आहे. होळी पेटवल्यानंतर गावाबाहेर जाऊन अगर गाव मोठा असेल तर, त्याच्या मोहल्ल्या-मोहल्ल्यांत गटागटाने हिंडून, वाद्ये वाजवत, अश्लील शिवीगाळी करत किंवा अश्लील गाणी म्हणत, नाच करत दिवसाचा सर्व वेळ काढावा. या प्रसंगी कुठे कुठे दाने करण्याचीही प्रथा आहे. होळी पूर्ण झाल्यानंतर ती दूध व तूप शिंपून शांत करावी व मग जमलेल्या लोकांना नारळ, पपनस यासारखी फळे वाटावी. त्या दिवशी सकाळी खूप अश्लील बोलून होळीची रक्षा विसर्जित करावी. काही ठिकाणी ही रक्षा व शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगला माखून नृत्य गायन करण्याचीही प्रथा आहे.
या दिवशी चांडालाला स्पर्श करण्याचा प्रमुख विधी शाखात सांगितलेला आहे, असे सांगून पुढे कोशकार म्हणतात -
'होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पाहता असे ध्यानी येते की, हा सण मूलतः लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून कितीही धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधीनांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच लोप पावले नाही; उलट ते अधिक गडद व भडकपणे आविष्कृत होत राहिले.
आजच्या होलिकोत्सवात अनेक पदर सामावलेले दिसतात. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात. होळी, धूळवड आणि रंगपंचमी ही त्यांची परिचित नावे होत. भारताच्या विविध प्रदेशांत या तिन्ही प्रकारांनी होळी साजरी केली जातेच याशिवाय प्रतिपरत्वे तिचे विभिन्न आविष्कार होतात.'
वरील माहिती वाचून काही तरी समजलं असेल असा विश्वास व्यक्त करते. बदल स्वीकारत आपण पुढे वाटचाल करतं असलो, तरी आपली पाळंमुळं जपली पाहिजेत. जमतंय का बघा..
बाकी होळी हा सण जर खऱ्या अर्थाने वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी उपयुक्त होत असेल तर नक्कीच स्वागत आहे. आणि होळीमध्ये निसर्गाचा ऱ्यास न होता
बाकी प्रतीकात्मक वगेरे ढोंग करून विभत्स आनंद लुटायचा असेल तर खुशाल नाचा.
वसंत ऋतूची चाहूल देणाऱ्या आनंदोत्सवाच्या सर्वांना खुप खुप सदिच्छा 🙏🌺
-प्राची
Comments
Post a Comment