"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य"
"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य"
सध्या पहावं तिकडे
"आम्ही मतदान करणारं नाही" या भूमिका घेतल्या जात आहेत.
नेत्यांवर, राज्यकर्त्यांवर, राजकारणावर त्यांच्या नीतीवर, व्यवस्थेवर रोष दाखवणं ठीक आहे. पण मतदान करणारं नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे? आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय म्हणून मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. खरतर मतदान नसून तो आपला अधिकार आहे. या देशाचे राज्य, इथली घटना सर्व काही to the people, for the people, by the people आहे. म्हणजेच, इथल्या लोकांनी, लोकांसाठी बहाल केलेलं आपले राज्य व घटना आहे. हे स्वराज्य आहे. स्वातंत्र्य मिळून अधिकार प्राप्त होणं ही साधी सुधी बाब नाही. आपल्या लाखो पूर्वजांच्या रक्ताचे पाट या मातीत वाहिले आहेत. जे स्वातंत्र्य अधिकाराने आपण उपभोगत आहोत ते त्यांच्या संघर्ष व बलिदानाचे द्योतक आहे. आपल्या स्वातंत्र्याला पारतंत्र्यत जाण्यावाचून न रोखू शकणारे आपण, कोणत्या अधिकाराने त्यांनी बहाल केलेला वारसा नाकारत आहोत? त्यांना आपल्या मताप्रमाणे वागता येवू न येवू. पण आपल्या लेकरा बाळांना कोणाची गुलामी नको म्हणून स्वतःच्या चामडीच्या पायघड्या करून तुमच्या आमच्या भविष्याच्या मार्गावर अंथरल्या. आपल्या पायात गुलामीच्या बेड्या पडू नये म्हणून खांद्यावर बसवलं. संविधान दिलं ! "जा पोरांनो सुखानं नांदा"!
हे स्वप्न त्यांनी डोळ्यात साठवून मिटले असतील.
"करंट्यांनो तुम्ही मात्र दरिद्री निपजलात".. होय, असच म्हणाले असते, जर आज ते हे पहायला जिवंत असते तर.
तुमचा मताधिकार झुगारताय.. काय अधिकार आहे तुम्हाला इतरांना दोषी ठरवण्याचा? या देशात कोणत्या अधिकाराने रहाता? स्वतःला भारतीय कसे म्हणवून घेता? पूर्वजांच्या बलिदानाची कोणती परतफेड करताय?
स्वतःचा नाकर्तेपणा अधिकार नाकारून व त्यातून स्वातंत्र्य गमावून दर्शवणार आहात का?
शूरांच्या भूमीतून षंढ कसे उपजले? सहज मिळालं म्हणून तुम्हाला किंमत नाही असं आपल्या पोरांना सुनावणारे आपण... आपल्याला हे जीवन स्वातंत्र्यात जगण्याचा अधिकार सहज मिळाला आहे हेच विसरलो ! आपल्याला सुनावणारं कोणी नाही या अविर्भावात आपण जगतोय.
मनुवादाचा अजगर शीतकालसमाधीतून जागृत होवून काही वर्षपूर्वी सत्तेचा फणा काढून बसला आहेच. सवयीप्रमाणे सर्व काही गिळंकृत करत आहे. आपण बघ्याची भूमिका घेत आहोत किंवा बघून न बघितल्या सारखं करतोय. यातून त्याच फावतंय. त्याला सहज भक्ष मिळतंय. भसम्या झाल्यासारखा तो ही न थांबता गिळतोय. त्याच्या गळी तुम्ही उतरले की तुम्ही पारतंत्र्यात हमखास गुलाम ! असं ही निवडणुका लांबवल्या आहेत. तुम्हाला त्याचा कितपत फरक पडतोय हे पडताळून पहात आहेत. चेकअप करता करता तुमच्या सगळ्या नाड्या कापतील. परत मेला बिच्चारा म्हणून टाळूवरचे लोणी चाटायला मोकळा. काय, सगळं दृश्य डोळ्यासमोर तरळतंय ना?
मी हे सगळं तुम्हाला का सांगत आहे? अविचाराने भूमिका घेणं आपण थांबवायला पाहीजे. आपल्या बापजाद्यांनी विचारपूर्वक पाऊलं उचलली,.त्याग, संघर्ष केला. बलिदान दिले, म्हणून आज आपण पुढारलो. अविचाराने आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय होईल? याचा विचार आपण करतो का? पायापुरतं बघण्याची सवय सोडा. मताधिकार आपली जीवन वाहिनी आहे.
ती जर कापली तर मानव म्हणून तुमचा मृत्यू समजा. तुमचाच नाही तर तुमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा सुद्धा.चुकीच्या वृत्तीला भीक घालू नका. योग्य व्यक्ती निवडा.इतर कोणावर विश्वास नसेल तर स्वतः निवडणुकीला समोर जा. फॉरेन रिटर्न सदाशिव पेठी असल्यासारखे "ई शी ! पॉलिटिक्स ईस सो डर्टी" म्हणून नाक तोंड मुरडून काही साध्य होणार नाही. अस्सल सदाशिव पेठी काही झालं तरी बाहेर पडून मताधिकार बजावतील. शिकायचं तर ते शिका. इतकं सांगून समजत नसेल तर तुम्ही तुमचे भविष्य खड्ड्यात घाला. मी माझ्या पुर्वज्यांनी लढून मिळवलेला स्वाभिमान कोणाला ही सहज पायदळी तुडवू देणारं नाही. अरे, इंच इंच लढवेल. मरेल, पण व्यवस्थेच्या दलालांना शरण जाणार नाही. माझा मताधिकार मी बजावणारच !
"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य".
- प्राची
Comments
Post a Comment