पेटवू क्रांतीची मशाल

९ ऑगस्ट..क्रांती दिन !
करा नाही तर मरा..करो या मरो..
Do or Die..लढेंगे या मरेंगे..भारत छोडो !
होय,याच घोषणा १९४२ साली ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशभर बोलल्या जात होत्या व ऐकू येत होत्या. 
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा उठाव १८५७ ला सुरु झाला.त्या नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्राम ऑगस्ट क्रांती दिनी उभा राहीला.
९ ऑगस्ट १९४२ या दिवशी भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना  अभिवादन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी "करो या मरो" ची भूमिका घेत इंग्रजांना भारत सोडण्याच्या आव्हानाचे रणशिंग भारतीयांनी फुंकले.
   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई येथे भरवण्यात आलेल्या ९ ऑगस्ट १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना "भारत छोडोचे" आव्हानं केले.तसेच देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी,पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवण्याकरिता सर्व देशवासियांना "करो या मरो" चा मंत्र ही दिला.गांधीजींचे हे आव्हानं संपूर्ण देशभर वेगाने पसरले.काँग्रेसच्या या आदिवेशनात गांधिजींसह,नेहरू, 
पटेल,आझाद आदी नेते यांची उपस्थिती व भाषणे ही झाली होती.यामुळे देशामध्ये क्रांतीची मशाल उस्फुर्तपणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या हाती पेलली होती.यातच या सर्व नेत्यांची अटक झाल्याने देशभर याचे पडसाद उमटले. 
नेत्यांची अटक केल्याने आता वातावरण निवळेल असं ब्रिटिशांना वाटले खर.परंतु आता स्वातंत्र्याचं हे आंदोलन  जनसामान्यांच्या ताब्यात गेलं होत. आंदोलनं,मोर्चे,निदर्शने,उद्रेक अशा स्वरूपाचे चित्र देशात निर्माण झाले होते.इंग्रजांची दडपशाही सुरु होती. 
परंतु देशात क्रांतीने उठाव केला होता.इंग्रजांच्या या दडपशाहीला लोक जुमानत नव्हते.हा फार मोठा बदल होता.स्वातंत्र्य मिळण्यासाठीचा अंतिम व जोरदार प्रयत्न अखेर यशस्वी झाला.परंतु त्यासाठी पुढील ५ वर्ष हा क्रांतीचा संघर्ष सुरु होता.यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.नव्या पर्वाला सुरुवात झाली.
   स्वातंत्र्य सहज मिळत नाही म्हणतात.त्यासाठी संघर्षातून मोठा लढा उभारावा लागतो. 
प्राणांची आहुती देत रक्ताचे पाट वहावे लागतात.
तुझं माझं दूर लोटून आपल्या येणाऱ्या भविष्याचा विचार केला जातो.वाट्टेल ती किंमत मोजण्याची व दडपशाहीला सामोरं जाण्याची धमक अंगी निर्माण करावी लागते.
क्रांतीची मशाल हाती घेतली की ती सतत तेवत ठेवण्याची आणि लढण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते.इतकं सोपं नसतं स्वातंत्र्य मिळवणं !
आपण करंटे मात्र हे स्वातंत्र्य सहज मिरवत बसलो आहोत.इतकंच काय तर हे स्वातंत्र्य गिळू पहाणाऱ्यांना ते गळी उतरवण्यासाठी हातभार लावत आहोत.या मातीत ज्यांचं रक्त मिसळलं आहे त्या आपल्या पूर्वजांच्या बलिदानाला नखं लावण्याचं नीच कृत्य आपणच करतं आहोत.हाती झेंडे,ओठी जयजयकार,मोठी मोठी भाषण आणि स्वातंत्र्याचा इव्हेंट केला की झालं.पोकळ देशभक्तीचे दाखले द्यायला आम्ही मोकळे.
   त्यांनी क्रांती घडवली,संघर्ष केला,लढा दिला,स्वातंत्र्य बहाल केलं,एवढंच काय तर हा देश नव्याने उभा ही करून दिला.या देशाचे राष्ट्र व्हावे हे स्वप्न तुमच्या आमच्या हाती सोपवून ते गेले.आई बापानं आपलं कर्तव्य पार पाडलं.सुजलाम सुफलाम असा भारत आपल्या स्वाधीन केला.येणाऱ्या पिढयांची जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली.आपण ते संभाळायचं सोडून देश अशा गद्दारांच्या हाती दिला ज्यांनी या देशाचा,त्याचा समृद्ध परंपरेचा,  इतिहासाचा,या मातीतल्या लोकांचा द्वेष,तिरस्कार सोडून कधी काहीच केलं नाही.देशाची संपत्ती हे नीच विकून पोसू लागले.परकीयांपासून देश,इथली रयत यांचं रक्षण सोडाच,परंतु अंतर्गत युद्ध हे घडवून आणू लागले.
आम्ही हळूहळू यात सर्पण घालण्याचं काम करतं आहोत.
ही आग विझवायची सोडून माझं घर कुठं जळतंय म्हणून बिनदिक्कत दुर्लक्ष करतं राहिलं.बघता बघता आगेचे लोळ दारापर्यंत आले.तरी आम्ही थंड ! का?
कारणं स्वातंत्र्य सहज मिळालं आहे ना आपल्याला.
त्या संघर्षाची,लढ्याची,क्रांतीची किंमत आपल्याला समजलीच नाही.खरतर आपण या स्वातंत्र्याच्या लायकच नाही.आपल्या सोबत जे होतंय तेच योग्य आहे.उलट थोडं कमीच पडतंय.ही दडपशाही वाढायला हवी.जे आगीचे लोळ दारापर्यंत आले आहेत ते घरात यायला हवेत.
प्रत्येकजण त्यात होरपळला पाहिजे.तरी आपल्याला आपल्यासाठी गेलेल्या आहुत्यांची जाणिव होईल का?  
की खरच इतक्या बोथट झाल्या आहेत आपल्या संवेदना प्रत्येक त्या लढल्या गेलेल्या लढ्या,केलेल्या त्या बलिदाना प्रती? घरा घरात राष्ट्रध्वज लावून या बोथट झालेल्या संवेदना जाग्या होतील का? की लावलेल्या आगीत आता ओल्या सर्पणाचं काम हा इव्हेंट करेल? मला माहीत नाही.पण हो,एक मात्र नक्की.ही लावलेली आग विझवण्याचं,पुन्हा ही आग लावू नं देण्याचं आणि तुम्हाला जागृत करण्याचं माझं कार्य मी क्रांतीकारकांच्या प्रेरणेने करतं राहीन.कारण..हे स्वातंत्र्य जरी मला सहज मिळालं असेल तरी त्यासाठीच्या संघर्षाची जाणिव माझ्यात जिवंत आहे.देशाप्रती माझ्या प्रेमाच्या भावना जितक्या त्याच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यात आहे,तितक्याच इथल्या जिवंत हाडामासाच्या माझ्या माणसांच्या उज्ज्वल भवितव्याप्रती त्यांना जागृत करण्यात आहेत.
    म्हणून आजचा ९ ऑगस्ट हा क्रांती दिन आणि काही दिवसात होणारा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी 
बोथट,संकुचित झालेल्या देशभक्तीला मोकळ करा.
आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या आपल्या पूर्वजांचे स्मरण करा.त्यांच्या वाहिलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची साक्ष घेवून हा देश त्यांच्या स्वप्नातले राष्ट्र निर्माण करू ही ग्वाही द्या.त्यासाठी एका विचाराने एकसंध व्हा. "लढेंगे और जितेंगे" हा नारा द्या.देशाला पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाण्यापासून परावृत्त करा.क्रांतीची ही मशाल पुन्हा पेटवा ! नवा इतिहास पुन्हा घडवा !
    आपणा सर्वांना क्रांती दिनी लढण्याचे बळ मिळो हिचं सदिच्छा ! 
   सर्व हुतात्मा,क्रांतिवीर,क्रांतीवीरांगा यांना विनम्र अभिवादन ! 🙏🇮🇳
   

प्राची दुधाने 


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??