प्रिय लेक जानू (जान्हवी)

प्रिय लेक जानू,
    आज तुझा जन्मदिवस.तुला खुप खुप प्रेम आणि आशीर्वाद.गेल्या वर्षीप्रमाणे तुला आजच्या दिवसाच्या निमित्तने हे पत्र लिहिण्याचे ठरवले.अशी पत्र आपण एकमेकांना लिहीत रहायला हवी.वर्तमानातच नाही तर भविष्यात यातील संभाषण आपल्याला प्रेरणा व ऊर्जा देत राहिलं.नवीन नवीन संकल्प हाती घेताना हे मार्गदर्शक ठरतील.हे आजच पत्र तुझ्यामध्ये होणारे बदल व त्याला सामोरं जाताना तू घ्यायची काळजी हे सांगणारे असले तरी यात प्रेमाचा व अतूट विश्वासाचा सुगंध भरपूर आहे हे लक्षात असुदे.
   जानू तू प्रत्येक जन्मदिनी मागील वर्षांपेक्षा अधिक प्रगल्भ होताना दिसतेस.स्वतःसाठीचे छोटे छोटे निर्णय तू घेण्याचा प्रयत्न करत आहेस.शिक्षणाप्रती तुझं समर्पण बघून किती आनंद होतो हे शब्दात व्यक्त करता येणार नाही.शिक्षण तुझ्यातील वैचारिक कृतिशीलतेला यशाच्या उच्चं शिखरावर घेवून जाण्याचा उत्तम मार्ग आहे.हे तू अचूक हेरलस.तू मांडत असलेल्या विचारातून तुझ्या भविष्यातील कृतींचा आराखडा तू मांडत आहेस हे देखील समजतं.तू काही धेय्य निश्चित केली आहेस.तिथे पोचण्यासाठी तुला खुप कष्ट घ्यावे लागतील.संघर्ष ही सर करावा लागेल.अनेकदा दोन पाऊल मागे ही यावं लागेल.
दोन पाऊल मागे येणं म्हणजे सगळे संपलं अस होत नाही बाळा.अशा वेळेस निराश होवू नको.रागावून,वैतागून, रुसून,हतबल होऊन,त्रागा करत खचुन बसू नकोस.हवं तर थोडी विश्रांती घे.कष्ट घेणाऱ्या प्रत्येकाला संघर्षाचा सामना करताना किती दमछाक होते याचा अनुभव मी रोज घेत आहे.पण म्हणून मी संघर्ष करायचा थांबवत नाही.
   आईच्या गर्भात जीव विसावल्यापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण संघर्षच करत असतो.तो कधीच कोणालाच चुकत नाही.हो,त्यातून मात्र आपण काय बोध घेतो आणि कोणत्याही परिस्थितीत टिकावं किती व कसा धरतो ते आपल्यावर अवलंबून आहे.
  मला माहिती आहे माझ्याकडे पाहून तू खुप काही न सांगता शिकतं आहेस.यासाठी मी माझी प्रत्येक कृती विचार करून करत असते.उद्या तुला ही पाहून कोणी तरी प्रेरणा घेईन.त्यासाठी तुला आणखीन स्वतःवर नियंत्रण ठेवायला,सकारात्मक रहायला शिकावं लागेल.तू आज ज्या वयाच्या टप्प्यावर आहेस तिथून तुला सगळंच छान वाटेल.तू करत आहेस ते सगळे योग्यच आहे.हे देखील वाटेल.पण मी आई व तुझी मैत्रीण या नात्याने जीवनातील बऱ्या वाईट अनुभवातून बारीकसारीक गोष्टी तुला सांगत राहीन.तुझ्याकडून काही चूक होत असल्यास तुझ्यासमोर ती मांडेन.त्याचप्रमाणे तू जे काही कार्य प्रामाणिकपणे करून यश प्राप्त करशील त्याचे कौतुक ही भरभरून करेन.मी सांगितलेल्या दोन कडवट शब्दांचा राग मानू नको.तुझ्या हिताचं तेच मी सांगेन.याचा अर्थ मी सांगते तेच तू कर असा होत नाही.तू जे निर्णय पुढे घेणार आहेस त्यासाठी तू त्याचा आधार नक्की घे.
  आज पर्यंत तू माझ्या पाऊलावर पाऊल ठेवून चालत आली आहे.माझी सावली तू झालीस.आता मात्र मला तू माझ्या सोबत चालताना दिसत आहे.ज्या दिवशी तू तुझे धेय्य घाठण्यासाठी एक पाऊल माझ्या पुढे जाऊन घेशील,तो क्षण दिवस माझ्यासाठी उत्सव दिवस असेल.माझ्या जीवनाचं सार्थक झालं अस मी समजेन. पण हो तेव्हा ही मी तुझ्या कायम पाठीशी असेन हे विसरू नको.
  येणारी पुढील काही वर्ष तुझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत.तू त्याबाबत जागरूक आहेस हे ही तुझं खरं तर कौतुक आहे.यात सातत्य असुदे.अभ्यासाबरोबर तुझे छंद व कला जोपास.जे जे आवडीचं ते ते करत रहा.मनं मोकळेपणाने जग.उंच भरारी घेण्याकरिता तुझ्या पंखात किती बळ येईल हे तू अनुभवशील.सगळे अनुभव गाठीशी बांधून ठेव.त्यातून बोध घेत पुढे चालत रहा.
    तुम्हा दोन्ही बहीण भावंडांच जेव्हा जेव्हा कौतुक होत,तेव्हा मनं भरून येत.तुम्ही दोघ असेच उत्तरोत्तर यश संपादन करत रहा.मी कौतुकाने तुम्हाला न्याहाळत राहीन.अखेरीस एवढंच सांगेल जे मी नेहमी सांगत असते.अवकाशाला स्पर्श केला तरी पाय मात्र जमिनीवर असुदे.विशाल दृष्टिकोन ठेवून जगाकडे बघ.एक लक्ष निश्चित कर.ते प्राप्त करण्यासाठी लढावं लागेल.तू लढ..मी कायम तुझ्यासोबत आहे.तू तुझं अस एक स्थान निर्माण कर.स्वतःच्या प्रगती सोबत समाजाचे परिवर्तन होण्यासाठी प्रयत्नशील रहा.
  तू जितकी गोड, शांत आहेस तितकीच धाडसी देखील आहेस.स्वतःवर विश्वास ठेव.माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.जे कार्य हाती घेशील त्यात यशस्वी हो !
मला तुझा अभिमान आहे.तुला खुप प्रेम !
तुझी आई (मम्मी)
    प्राची 😘❤️🌹

Comments

  1. जानु या गोड मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??