सोबती लता
मेरी आवाज ही पेहेचान हैं,गर याद रहें..
लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना !
जीवनातील चढउतार सर करताना,संगीत नेहमीच आपला जवळचा सोबती असतो.भावनांना वाट करून देताना गीत-संगीत महत्वाची भूमिका माझ्यासारख्या अनेकांनाच्या जीवनात पार पाडतात.त्यात गीतकार- संगीतकार-गायक शब्द,सुर व आवाजातून जे अद्भुत असे भाव गुंफण निर्माण करतात त्याची जादू काही औरच असते.क्षणात आपल्याला दूर आठवणींच्या कप्यात घेवून जातात.काही क्षण पुन्हा जगण्याचा ही आभास निर्माण करतात.काही हसवतात तर काही डोळ्यांत आसवं ही देवून जातात.लहान असताना बाल गीतं,तारुण्यात प्रेम गीतं(तशी ही आयुष्याच्या कोणत्या ही टप्प्यावर रोमांच निर्माण करतात),पुढे भाव गीतं.
असा या गीतांचा प्रवास सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या जीवनात सुरु असतो.मला समजू लागलं तस मी लतांची गाणी ऐकत असल्याचे मला आठवतं.कारणं आईला घरात रेडिओ आणि टेपरेकॉर्डरवर सुमधुर गीतं ऐकण्याची नितांत आवड.एकीकडे घरातील काम आणि दुसरीकडे संगीत.आज ही सवय मला देखील आहे.मग मूड प्रमाणे गाणी ऐकणं तर ठरलेलंच.यात खास करून लतांची गाणी ऑल टाइम फेव्हरेट..टेप असताना लतांच्या अनेक गाण्यांचे व्हॉल्यूम असणाऱ्या टेपचं (कॅसेट)भांडार घरात होत.कोणती ही परिस्थिती हाताबाहेर जाते अस वाटलं की त्याप्रमाणे ती टेप सुरु करायची आणि काही क्षणात त्या आवाजात आपला आवाज मिसळून जायचा.
खूपच भावुक झालो की शब्दनं शब्द मनाला भिडतो हे मात्र तितकंच सत्य आहे.त्या शब्दांना लाभलेला आवाज जर लतांचा असेल तर त्याचा प्रभाव अधिकचं वाटायचा.
अगदी आज ही त्यात तुसभर देखील फरक नाही.
अनेक वर्ष लातांनी गाणी गायली नाहीत.पण जी गायली ती नेहमीच मनाचा ठाव घेतात व घेत रहातील. रोज दोनचार तरी गाणी नित्यनियमाने लतांची ऐकणं हा एक क्रम ठरलेला असतो.अगदी व्यायाम करताना देखील सुरुवात लतांच्या गाण्याने होते.गीतकाराच्या शब्दांना आपल्या स्वरातून जीवन देणारे गायक अनेक झाले.
पण त्यांच्यांमधे भाव निर्माण करून श्रवण करणाऱ्याशी एक घट्ट नातं निर्माण करण्याचं काम हे खुप थोड्यांना जमत.त्यात लता मंगेशकर एक नाव.लता खुप भारी म्हणजे त्यांच्या पुढे कोणी नाही असा समज अजिबात नाही.पण काही माणसं एक वेगळी छाप निर्माण करतात. त्यात लता मंगेशकर आहेत.लातांच्या काही विचारांशी वैचारिक मतभेद मला होते व ते रहातील.पण त्याच्या आवाजाची सोबत ही कायम राहिलं.आज लता दिदी आपल्यात नाहीत.याच दुःख करण्यापेक्षा त्यांचा स्वर गीतं स्वरूपात कायम राहिलं व तो हवा तेव्हा श्रवण करता येईल व भावनांना वाट करून देता येईल.
या स्वरूपात त्या आपल्यात असतीलच !
त्यांच्या जीवनाचे असंख्य पैलू होते.आता त्यांना उजाळा मिळेल.ते ही थोडे समजून घेईन.गेल्यावर ही लतांच्या त्या आवाजातून त्यांना स्मरत राहिलं..अगदी त्यांच्या या गाण्याप्रमाणे..
नाम गुम जायेगा,चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पेहेचान हैं,गर याद रहें...
लतांना भावपूर्ण आदरांजली 🙏💐
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment