टाच वर न करता आकाशाला स्पर्श व्हावा, इतकं सहज आयुष्य जगायचं आहे !
टाच वर न करता आकाशाला स्पर्श व्हावा,
इतकं सहज आयुष्य जगायचं आहे !
आपण जन्माला येतो तेव्हा ह्या विश्वाशी आपण पूर्णतः अज्ञात असतो.प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवली जाते.फक्त श्वास घ्यायचा सोडून.
तो आपण आपलाच शिकायचा असतो.एकदा तो घेतला की आपण पहिली पायरी चढलो म्हणायचं.
मग नवीन नवीन ज्ञान प्राप्त करता करता श्वास सहज होत जातो.किती सोपं वाटतं नाही आयुष्यात असं.
अगदी टाच वर न करता आकाशाला स्पर्श व्हावं इतकं सोप्प..हो ही माझी कल्पना आहे,पण एकदा विचार करून बघा.क्षणात काही तरी गवसल्यासारखं वाटेल.
अर्थात प्रत्येकाला इतकं सोप्प आयुष्य जगावं वाटतं.
पण ते शक्य नसतं.पहिल्या श्वासापासून आपला जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो तो शेवटच्या क्षणापर्यंत.
कोणाचं ही आयुष्य दिसतं तितकं सहज व सोपं नसतं. जन्माला आल्यानंतर इथल्या पडद्यावर ज्याला त्याला त्याचा प्रयोग रंगवायचा असतो.त्यातून कोणाचीच सुटका नाही.पण हे संघर्षमय आयुष्यात तणावात जगायचं असा नियम नक्कीच नाही.आयुष्यातील हर एक क्षण तर्कशास्त्राप्रमाणे (लॉजिकप्रमाणे)जगण्यात मजा नसते. कधीतरी आपल्या विचारांना मुक्त विहार करू द्यायचा असतो.कधी बालपण तर कधी पोक्तपणा असा ही अनुभवायचा असतो.स्वप्नांच्या मागे धाव घेताना वास्तवातील निसटून गेलेल्या भावनांना पुन्हा अशी ही साद घालायची असते.आयुष्य सोपं नसलं तरी ते त्या जादूच्या चक्षूंमधून बघायचं आणि किती सहज वाटतंय ते अनुभवायचं असत.
लहानपणी इंद्रधनुष्यातील सगळे रंग ओळखता आले नाही तरी पुर्ण इंद्रधनुष्य नजरेला साफ दिसत असतो.
पण मोठे झालो की रंग माहीत असून उपयोग नाही.तो रंगीबेरंगी इंद्रधनुष्य नजरेला दिसायला तर हवा.किचकट वाटणारे प्रश्न अनेकदा सहज सुटणारे असतात.त्याकडे बघण्याची दृष्टी कोणती आहे हे महत्त्वाचं नाही का ?
काही माणसं आपल्या बरोबर इतरांचे आयुष्य सुद्धा जटील करून ठेवतात.आयुष्य जगण्याचा मार्ग हरवून बसलेले इतरांनाही आपल्या पाशांमध्ये जखडून ठेवतात. त्यांना काय सुख मिळतं कोणास ठाऊक ?
आपला मेंदू दिसतो एवढासा,पण फार करामती असतो.स्वतः बरोबर इतरांना देखील नियंत्रणात ठेवत असतो.वरवर सहज वाटणारी माणसं अनेक गूढ दडून वावरत असतात.अनेकदा उगाच जगणं कठीण बनवत असतात.
लेखा सोबत पुढे एक उदाहरण म्हणून छोटे चित्र देत आहे.चित्र अ आणि ब.
चित्र अ बघा.आपण कस आयुष्य असावं असा विचार करतो आणि
चित्र ब प्रत्यक्षात ते आपल्या विचारात कसं होतं ते दर्शवतं आहे.किती ताण त्या जीवाला.उगाचची खरड..त्यात जाल तेवढे गुंताल.त्यापेक्षा थोडा कल्पनाशक्तीला वाव द्या.आपल्याबरोबर इतरांना ही जगू द्या.सहज,सोपं नसलं तरी प्रयत्न तर करुद्या.कारण
आपली कल्पनाशक्ती भन्नाट असते.ती थोडी जागृत असावी.अविष्कार असेच होतात.टाच वर न करता आकाशाला स्पर्श करण्याइतपत सहज आयुष्य जगण्याचा आविष्कार आपल्याला करता येतो का बघूया !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment