जीणं
आपल्या जीणं इतकं स्वस्त झालं आहे का ?
आपलं जीणं इतकं स्वस्त झालं आहे का ?
बुद्धी,भावना बोथट झाल्या आहेत..
मानवता मृत्यूशय्येवर असल्यासारखी भासत आहे !
मानवाला एखाद्याचा जीव गेलेला पहाणं तसं फार वेदनादायक असत.त्यात ती व्यक्ती जवळची असेल तर दुःखाचा डोंगरच कोसळतो.पण गेल्या काही वर्षात कोणाचा जीव जाणं म्हणजे फार भावनात्मक राहिला नाही.सतत मरण कानावर पडून पडून जणु काही आपली बुद्धी व भावना बोथट झाल्या आहेत.मृत्यूचा आकडा तेवढा फक्त घोळत रहातो.तात्पुरती हळहळ व्यक्त होते.पुन्हा जैसे थे !ज्यांनी आपलं कोणी गमावला आहे ते या दुःखातून सावरतील की नाही माहीत नाही.पण आपण तिरहित व्यक्ती म्हणून दोन मिनिट सांत्वन करून ते विसरून जातो.पुन्हा एखाद्याच सांत्वन करण्यासाठी सज्ज असतो.
अनेक मृत्यू एखाद्याच्या स्वार्थापायी,हलगर्जीपणामुळे, आकसापोटी झालेले असतात.त्यांच्या आप्तेष्टांचा आक्रोश सहनशीलते पलीकडे असतो.पण कालांतराने तो ही आपल्याला ऐकू येत नाही.खरंच आपण इतके निष्ठुर झालो आहोत का ? अशा घटना खूप सहज झाल्या आहेत.पण म्हणून काय मानवाच्या जीवनाचे मोल कमी झालं का ? त्याला नऊ महिने गर्भात वाढवून मरण यातना देऊन जन्माला घालणाऱ्या त्या आईच्या वेदनांचा काय ? लहानाचं मोठं करण्यासाठी पडेल ते कष्ट उपसणाऱ्या बापाचं काय ? बहीण-भावंडं,बायको-नवरा,मुलं या सगळ्या नात्यांची होणारी फरफट आपण समजून घेणार का ? की सत्ताधार्यांप्रमाणे आपण ही याकडे कानाडोळा करणार ?
मानवाचा जीव हा अमूल्य असतो.पण आपल्याला घरात होत असणारा मृत्यू तांडव याकडे दुर्लक्ष करून शेजाऱ्यांचे सांत्वन करणे कोणते लक्षण म्हणावं ? भारतात दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मृत्यू. त्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात नवजात बालकांचा होरपळून झालेला मृत्यू असो (खरतर हे खूनच म्हंटल पाहिजे),याबद्दल आपल्याला काय वाटत न बोलता अमेरिकेत काय झालं व ते किती दुःखद आहे हे व्यक्त करणं इथल्या प्रधान सेवकाला जास्त महत्त्वाचं वाटतं ! अर्थात मी म्हटले त्याप्रमाणे निष्पापांचा जीव जाणं मुळात हेच दुर्दैव आहे.ते कोणी का असेना.त्यात भेदाभेद कसला ? त्या प्रती आपल्या भावना इतक्या क्षीण होऊ देऊ नका की पुढे आपल्यासाठी दोन आस्व गाळणारे देखील कोणी उरणार नाही.
मॉब लिंचिंग,बलात्कार,खून,सीमेवर सैनिकांचे मृत्यू,इत्यादी हे सत्ता स्थापनेचे नवीन द्योतक बनलं आहे.जीवन वेदनादायक असेल पण मृत्यू त्याहून वेदनादायी असतो.त्याला जर कोणाच्या स्वार्थाचा, बेजबाबदारपणाचा गंध असेल तर तो घाव कधीच भरत नाही.त्यामुळे आपल्या स्वार्थापोटी इतरांचे बळी घेणाऱ्यांनो जरा भानावर या आणि सर्वसामान्य जनतेने जागृत होवून त्यावर प्रतिक्रिया द्यायला शिका.अन्यथा इतरांप्रमाणे तुमचाही जीव स्वस्त होईल यात शंका नाही.
आज पर्यंत इतरांच्या हलकटपणामुळे मृत्यू झालेल्या सगळ्या जीवांना भावपूर्ण आदरांजली !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment