स्त्रीचे स्त्रीत्व नक्की दडले कशात ?
स्त्रीचे स्त्रीत्व नक्की दडले कशात ?
स्त्री ही एक मानव सोडून सगळं काही आहे.
हे येणाऱ्या अनुभवातून आपण बघतो,ऐकतो व
शिकतोच.रोज काही ना काही स्त्रीच्या स्त्रीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना समोर येत असतात.
काल परवा बातम्या बघत होते.मंदिर,स्त्री,पेहराव हे शब्द कानावर पडले.कोल्हापूरची बातमी दाखवत होते. महालक्ष्मी मंदिर परिसर दृष्टीस पडला.पत्रकार काही महिला व पुरुष यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे मत जाणून घेत होते.देवळात दर्शनासाठी येणाऱ्या स्त्रिया व त्यांचा पोशाख हा विषय होता.शिर्डी साई देवस्थान यांची ही काही सम बातमी ही असल्याचं समजलं.महिलांनी देवस्थानांमध्ये दर्शनास येताना साडी परिधान करावी असा विषय रंगला होता.साडी म्हणजे फक्त साडी नसून "हिंदू संस्कृतीला शोभनीय"असे वस्त्र असा त्याचा अर्थ.
स्त्रियांनो आता कुठे कुठे विरोध करायचा ठरवा ग बायांनो.उद्या नऊवारी नेसून डोक्यावर हातभर पदर घेऊन या असा फतवा निघाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.कारण तुमचं स्त्रीत्वच आज ह्या आधुनिक युगात तुमच्या कपड्यातून मोजमापन होते हे विसरू नका. स्त्रियांचे आज देखील त्यांच्या पेहरावावरून मूल्यमापन केले जाते हे किती लाजिरवाणी आहे.
काहींना माझ्या बोलण्याचा राग येईल.मग काय उघड नागडं फिरायचं का ? अस ही विचार त्यांच्या डोक्यात येतील.पण तुम्हाला बाई काय मूर्ख वाटते का ?
तिने काय करायचं,काय खायचं,काय घालायचं,कसं वागायचं,बोलायचं,शिकायचं की नाही,किती मुलांना जन्म द्यायचा,अगदी जगायचं का कुढून मरायचं,हे ठरवायचा अधिकार स्वयं घोषित संस्कृतीच्या ठेकेदारांना दिलाय कुणी ?
बायांनो तुम्हाला काही प्रश्न पडतात का ग ?
तुम्ही काय करायचं हे ठरवणारे इतर कोण ?
एक छोटा संवाद घेऊ या.तुमचा माझा किंव्हा आपला आपल्या स्वतः बरोबरचा..यात आपण थोडी चर्चा करू.बघू तरी या चर्चेचं सारांश काय हाती लागत.
तू आहेस तरी कोण ग ?
मी कोण म्हणजे..मी मानव आहे !
अग खुळी का वेडी तू.तू फक्त स्त्री !
शोभेची अन भोगाची वस्तू.मुलं जन्माला घालायचं साधन,चार घास थापून घालण्यासाठी एक मोलकरीन आणि आयुष्यभर पुरुषाला सुख देणारी दासी. यापलीकडे काय ग तुझं मोल ?
काय मोल म्हणजे ? माझ्या स्त्री रुपी देवीची पूजा होते.बालिका पूजन पासून सुवासिनींचे हळदीकुंकू इत्यादीत किती मान असतो मला.कितीतरी सण फक्त माझ्यासाठीच असतात.मी नटून-थटून,नवीन साड्या, दागिने घालून किती किती मिरवते.आणि हो मी शिकले पण.त्यामुळे मी पण कमी नाही बरं.
अगं किती हा तोरा तुझा.तुझं स्त्रीत्व केव्हढ्याशात आटपलंस ग ! कमाल आहे तुझी.नट्टापट्टा,साडी-चोळी, मिरवणं,फिरणं,सणवार एवढ्यातच अडकून पडलीस ग तू.आणि काय म्हणाली,शिक्षण घेतल.वाह ! छानच ! पण शिकून शहाणी कुठ झालीस गं ? अगं मानवतेची खरी शोभा आहेस तू.या वर वर पणाला कशी भाळलीस ग ? ज्या स्त्रीरूपी देवीची पूजा करतात सांगते ना,त्याच देवीच्या गाभाऱ्यात तुला पाळी आली की विटाळ म्हणून सावली पण पडू देत नाही ग तुझी.आता तर देवदर्शनाला पण देवीसारखं सजून जा ग माझी बाय ! ते तुझं पुढारलेपण,प्रवेश करू देणार नाही बघ तुला.ते अर्ध नग्न पुरुष देवळात देवाच्या गाभार्यात तुमच्या समोर मिरवलेले चालतात.पण तू साडीच घाल.तू जेवढे स्वतःला अनावश्यक रूढी परंपरा यात अडकून ठेवशील ना,तेवढी बंधने तुझ्यावर लादली जातील बघ.तुझा मान कशात आहे हे समजून घे ग बाई माझी.तुझ्या विनाशाला जर तू हातभार लावत बसलीस तर तू जगणार कशी ग ?
तुझा पेहराव नाही ग,तू जग बदलणार आहेस.
हे ठणकावून सांग जगाला.तू काय नेसायचं हे तू ठरव.एवढच सांगण माझं.एका साडीने जर तुझ स्त्रीत्व शाबूत राहत असेल आणि इतर कपडे स्त्रीत्वाची धिंड काढत असतील,तर आता तरी समजून घे.तुझी ओळख कपड्यात नाही तुझ्या कर्तुत्वात आहे.
तू म्हणतेस ते पटतंय ग,पण काय,कसं करू कळेना बघ.म्हणजे सवय पडली ना मला या सगळ्याची.पुरुषाच पुरूषत्व त्याच्या मर्दानीने,त्याच्या धाकाने,कार्याने संबोधलं जातं तसं आपलं स्त्रीत्व साडी,बांगड्या, अलंकार,सहनशीलता,व्रत-वैफल्य,चूल-मूल अशा गोष्टींवर आधारलेला आहे बघ.ते मोडून कसे बाहेर पडणार ? आपली संस्कृती कशी सोडणार ? त्या पुरुषांना कोण ग प्रश्न विचारणार ? बाबांनो तुम्ही हाफ पॅंट,जीन्स, टी-शर्ट घालून देवळात गेले तर चालते पण मी ते घातलं तर चालत नाही.भीतीच वाटते बघ हे सगळं बोलायची.
कोणत्या आधारावर जगते ग तू ? जो समाज स्वतःच्या सोयीने पुरुषत्व,स्त्रीत्व ठरवतो त्याच्या म्हणण्यावर ? या समाजाला,व्यवस्थेला सवय लागली आहे तुला पाहिजेत तसं बदलवण्याची.काय चूक काय बरोबर हे त्यांनीच ठरवायचं का ? कोणत्या संस्कृतीची भीती बाळगते ग तू ? साडी सक्ती करते त्या संस्कृतीची ?
तोकडा टॉप,स्कर्ट,जीन्स,ड्रेस घालून फिरली की तुझं स्त्रीत्व खालच्या दर्जाचं.अन साडी घालून तुझी कंबर,पोट दिसलं तरी बेहत्तर,पण ते दर्जेदार स्त्रीत्व.कमाल आहे नाही ? अग किती सावरायचं आणि आवरायचं स्वतःला ? ब्लाउज नीट आहे का ? पदर ठीक वाटतोय का ? पोट,पाठ दिसत नाही ना ? हातभर पदर डोक्यावर,खांद्यावर घेतला ना तरी त्या विभत्स नजरा आपण रोखू शकत नाही बघ..तू बुरखा घालून जरी उभी राहिलीस,तरी ही त्या नजरा तुला वरून खालपर्यंत स्कॅन करत रहातात.साडी ही संस्कृती बनून तुझ्या स्त्रीत्वाच मूल्यमापन कसं करू शकते ग ?
खर आहे.माझ्या तोकड्या किंवा पूर्ण कपड्यावरून माझं चारित्र्य व व्यक्तिमत्व,माझे विचार कसे कळतील ? हा संकुचितपणा समाजाच्या नजरेत आणि विचारात आहे.मी का त्याचं ओझं घेऊन जगू ? मला पण कळत,मी काय कराव,काय नाही कराव.
हे मला स्वयं घोषित संस्कृतीच्या,समाजाच्या ठेकेदारांनी शिकवू नये.आधी स्वतःची नजर स्वच्छ करा म्हणाव. बुद्धीवर,विचारांवर जी लोभाची,भोगाची,विभत्स जळमाट साठली आहेत ना,ती साफ करा.मग मला शिकवायला या.कपडे मानवाचा दर्जा वाढवतात असं म्हणतात,पण ती व्यक्ती खरं कशी आहे ते सांगू शकतात का ? नक्कीच नाही !
लाज मला नाही,येणाऱ्या जाणाऱ्या मुली,महिला यांच्या पेहरावाकडे शरीराच्या प्रत्येक कोनातून नजर फिरवून टीकाटिप्पणी करतात ना त्या लोकांना लाज वाटली पाहिजे.समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोण आणि पूर्वग्रहदूषित विचारांची व्यक्ती माझ्या पेहरावावर मत कस व्यक्त करते ? ओढणी,पदर खांद्यावरून सरकला तरी पाप झाल्यासारख्या भावना स्त्रीच्या मनात का येतात ? कारण बघणाऱ्याच्या नजरेत तिला वासना दिसते.एवढंच काय,तर बाईच्या कपड्याच्या आत काय असेल यातही अति टोकाचा रस काहींना असतो.त्याचं काय ?
माझे वस्त्र,मित्र,सहनशीलता,माझ्यावर समाज- पुरुष-परंपरांचं असणार वर्चस्व,माझी योनी-कौमार्य इत्यादी जर माझं स्त्रीत्व,माझं चारित्र्य ठरवणार असतील,तर त्यासाठी फक्त मीच का ?
हे नियम-फिल्टर पुरुषांना का नाहीत ?
आणि एवढंच नाही,तर रंग सुद्धा माझं स्त्रीत्व ठरवतात.गुलाबी,लाल असे रंग माझे.काळे,निळे रंग पुरुषांचे.रंग ही निसर्गाची विविध रूपे आहेत.ते कोणा एकाचे कसे ठरतात ? मी कोणाला प्रभावित करण्यासाठी पेहराव करत नाही.मला काय आवडतं,मला आरामदायक कशात वाटत,हे महत्त्वाचं नाही का ?
मी सहन करते म्हणून तुम्ही माझ्याबरोबर गैरवर्तन करतात.पण आता नाही.महिलांनी देखील महिलांना समजून घेतलं पाहिजे.आपण स्त्री सशक्तीकरण म्हणतो.पण ती मुळातच सशक्त आहे.समाज त्या शक्तीकडे कसा पाहतो व समजून घेतो हे महत्त्वाचं. समाजाने तिच्या स्त्रीत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे.आज माझ्या स्त्रीत्वावर उठणाऱ्या प्रश्नचिन्हांचा मी विरोध करते.हो पण हा विरोध मी एकटीने आणि स्त्री आहे म्हणून नाही करायचा.
लिंग समानता हा फक्त आम्हा स्त्रियांचीच लढाई नाही,संपूर्ण मानव जातीचा लढा आहे.मी माझा सन्मान मिळवण्यासाठी नेहमी सज्ज आहे.कारण मी एकटी नाही,तर समस्त स्त्रीयांसाठी लढा देत आहे.
मी बोलत आहे लिहित आहे.हा आवाज होण्यासाठी मला खूप वेळ लागला.पण आता इतक्या सहजासहजी शांत हा होणार नाही.हे मात्र निश्चित..मंदिरात दर्शनासाठी जायचं बंद केला आहे.त्याचा आज खरच आनंद होतोय.
अस ही तो देव खरा नाही.मानवनिर्मितच तो.माझ्यावर उठणारी ती बोटं सुद्धा त्यांचीच..विचार करा..बदल आवश्यक आहे.तो विचारांमधून घडणाऱ्या कृतीमधूनच होतो.
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment