नाही सत्ता तरी राजा !
नाही सत्ता तरी राजा !
आजच्या पोस्टचा विषय फार वेगळा आहे.
मी नेहमी माझा लेखनाबरोबर एक इमेज त्यावर आधारित सुविचारा सहित पाठवत असते.त्याने विषय समजायला आधार मिळतो असं मला वाटतं.
मी सतीशला(जो डिझाईन बनवतो)त्याला सुविचार आणि त्यावर आधारित चित्र पाठवले की तो डिझाईन तयार करून पाठवतो.त्या दिवशी जास्तच उशीर झाला.मी काही पाठवलं नाही म्हणून त्याने मला एक डिझाईन स्वतः करून पाठवलं.आजच्या लेखा बरोबर जोडलेली डिझाईन तीच.त्यावर त्याने जे लिहून त्या शेजारी चित्र पाठवलं होतं ते बघून,असं का पाठवले असेल ? असा पहिला प्रश्न मनात आला.पण त्याला तसं विचारलं तर पोरग हिरमुसायचं.म्हणून छान म्हटलं आणि गप्प राहिले.पण त्यावर लिहायचं हे ठरवलं होत.
साधारण काय लिहिले आहे,त्यावर मी डिझाइन ठरवते.पण आज त्याने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या डिझाईन बद्दल थोडक्यात लिहित आहे.
सामाजिक जीवनामध्ये आपण वावरत असताना प्रत्येक मनावर आपण एक विशिष्ट छाप निर्माण करत असतो.आपल्या कार्याची,स्वभावाची ती पावती असू शकते.असू शकते,असं म्हटलं कारण काही लोकांना तुम्ही कितीही चोंभाळल,त्यांच्याशी कितीही प्रेमाने तुम्ही वागले तरी तुम्हाला ते वाळीतच टाकतात.अनुभवाअंती.. चांगल्या माणसांवर चांगली छाप पडते.एखाद्याला खुसपट काढायचं तर तो कस पण काढतो.महत्त्वाचं काय तर तुमच्याविषयी इतरांच्या मनात काय भाव आहेत हे थोडक्यात समजून येतं.अनेकदा काही जण त्यांच्या भावना बोलून दाखवतात.पण काही मनात ठेवून कृतीतून दाखवून देतात.कदाचित याला ही तेच मांडायचं असेल.
जे त्याने डिझाईन मधून व्यक्त केल असाव.
या डिझाईनमुळे पुन्हा एक जाणवलं.आपण इतरांवर निश्चितच सकारात्मक छाप निर्माण करत मार्ग काढतोय. सत्ता मिळवणं हा कधी जीवन मरणाचा,धेय्याचा विषय धरलाच नाही.पण माणसं ती पण मोकार प्रेम देणारी, आदर करणारी आणि विश्वास देणारी व माझ्यावर दाखवणारी मिळाली.ती माझी मिळकत म्हणायला हरकत नाही.नेतृत्व केलं ते पण समाजहितासाठी.चांगली माणसं भेटली,तशी स्वार्थानं बरबटलेली अनेक वाटेत भेटली.पण त्यांची कधी हिम्मत झाली नाही दोन बोट करून माझ्याकडं दाखवायची.कारण आपण स्वच्छ राहीलो..कायम ! म्हणून तर सत्ता आपली नसली तरी लोकांनी राजाचा मान दिला.आपण ओंझळभरून दिलं,पण बदल्यात पदरात मावेना एवढ मिळालं. प्रेम,आपुलकी,विश्वास,आदर,जीवाला जीव देणारी माणसं,असं खुप काही भरभरून पावलं..सुखाच्या आयुष्याला समाधानाची सोनेरी झालर त्यातून मढली गेली.आता एक इच्छा आहे.त्यावर मोत्याची रांग असावी.हे मोती म्हणजे वाटेत भेटलेली समवैचारिक बांधव भगिनी.यांच्याबरोबर हा विचारांचा वारसा दूरपर्यंत घेऊन जायचा.पुढच्या पिढीला तो वाढवायला सोपवू तोवर.सध्या,आयुष्यात भेटलेल्या सर्व हितचिंतक,सत्ता नसून राजेपद देणाऱ्या बांधव भगिनी यांना उदंड आयुष्य लाभो,सुख समाधान त्यांच्या पायी लोळणं घेवो व सदैव त्यांची साथ राहो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
खूप छान 👌👍
ReplyDeleteमाँसाहेब, तुम्ही नेहमीच आमच्यासाठी राजा👑अहात