विरोधाभास
विरोधाभास
आयुष्यत किती विरोधाभास असतात नाई..
आपण शिकतो एक,ऐकतो दोन,बोलतो तीन अन करतो चार.शाळेत शिक्षण घेत असताना आपल्याला काय काय ज्ञानाचा अन तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जातात. जात-पात मानू नका,भेदभाव पाळू नका,बंधुभाव निर्माण करा,एकमेकांचा आदर सन्मान करा,मानवता हाच खरा धर्म,खोटे बोलू नका,चोरी करू नका,संविधान हा आपला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे,स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे,त्यांच्या प्रती व देशाप्रती आदर असावा,स्वातंत्र्याची किंमत समजून घ्यावी,दुसऱ्याच वाईट चिंतू नका,अशा एक ना अनेक बाबी एका दमात मावत नाही बाबांनो..
मला असं वाटतं Its not important what we learn now,is how we present the thought about it in future ! आपण आज जे शिकतोय त्याला अनुसरून आपण भविष्यात काही विचार सादर करू असं नाही.हे अनेकांना लागू होत.कारण विरोधाभास !
मी माझ्या मुलांना शिकवताना नेहमी सांगते(अर्थात अभ्यासाविषयी).इथ जे दिल आहे ते आपल्या ज्ञानासाठी.काय अपेक्षित आहे हे माहिती होण्यासाठी.
पण प्रत्यक्षपणे जे ह्या बुकात आहे असं घडतच असं नाही.उदाहरण-न्याय व्हावा म्हणून कायदे केले जातात, पण गड्याहो ते कायदे कसे मोडले जातील याचा विचार त्या आधी होतो.बरोबर ना ?
वास्तवाचं दर्शन करून देणे सुद्धा फार गरजेचे आहे.काय आहे,काय बघतोय आणि काय करायला पाहिजे याची जाणीव त्यांना आपण दिली पाहिजे.चुकीचा मार्ग निवडा असं नाही.तर,शिकलेलं आणि प्रत्यक्षात घडत असलेल वास्तव कोणत योग्य हे अनुभवाअंती कळेलच.आपण दोन्ही समजून घेतलं पाहिजे.या जगात सरळ बुद्धीच्या मानवाचं काही खरं नाही बघा..
चार बुक शिकली पाहिजे.हे आपले महामानव सांगून गेले.पण ती बुकं शिकून त्याचा कोंडमारा करून मरा.. असे म्हणाले का ? नाही.चार बुक शिकताना व्यवहार ज्ञान कोण शिकणार ?
अरे मंदांनो,तुमच्या तोंडात किती आयते घास घालायचे या महामानवांनी ? त्यांच्या शिकवण्यात आणि तुमच्या शिकण्यात किती विरोधाभास.
ते म्हणतात भेदाभेद करू नका.पण आपण उभे असतो लक्ष्मणाच्या त्या रेषा प्रमाण मानून ओढायला.महामानव सांगून गेले जातीयवाद,वर्णव्यवस्था ही मानवाच्या प्रगतीसाठी व मानवाला मानव म्हणून जगू देण्यासाठी घातक आहे.त्याचा आपल्याला काय फरक पडतो,ढेकळ ! आपण पुण्यतिथी,जयंती या दिवशी तेवढे ते सुविचार चघळतो.आपली पाठ त्या महामानवांच्या प्रतिमेकडे झाली रे झाली की,ये रे माझ्या मागल्या..
मी अमुक जातीचा,धर्माचा म्हणताना अहंकार काही मानवाचा कमी होत नाही.ज्या गोष्टींची लाज वाटावी त्याचा पोकळ अभिमान कसला बाळगता रे रताळ्यांनो..
मी एक तर माझ्या विचारांशी सहमत आणि ठाम आहे.मला कोणी अमुक जातीचा,तमुक धर्माचा म्हणून कोणावर फुकटचे तोंडसुख घेण्यात खरच अजिबात रस नाही.पण काही लोकांना मुळातच खाज असते,म्हणून त्यावर कीटकनाशक फवारावं तसं,त्यांच्या विचारांची कीड थोड्या प्रमाणात का होईना घालवण्यासाठी नाइलाजाने त्यांची जागा त्यांना दाखवावी लागते.
त्या बद्दल खरच मनापासून दुःख होतं.पण हाच त्यावर इलाज.स्वतःला आणि इतरांना छान वाटावं म्हणून फसवंण्यापेक्षा,कठोर होऊन काही वेळा सत्याला सामोरं जाणं योग्य ठरतं.आपल्याला जे योग्य वाटतं ते निश्चित करावं,पण त्या वाटण्याला काही शेंडा बुडूक आहे का ?
हे पण समजून घ्यावे.जेव्हा तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात भिन्नता दिसते,विरोधाभास जाणवतो तेव्हा तुमच्या विचारांना आणि तुमच्या कृतीला काहीही किंमत उरत नाही.
आपल्या महामानवांनी आपल्यासाठी दांडगी वैचारिक धनसंपदा माघारी ठेवली आहे.ती त्यांचे वारस म्हणून डोक्यावर घेवून मिरवण्यापेक्षा डोक्यात घ्या.तरच त्यांच्या संघर्षाची,कष्टाची आब राखली जाईल.आपण शिकावं एक अन कराव भलतच.यासाठी का त्यांनी अट्टहास केला होता ?
आज बहुतेक सगळीच सुख आपल्या पायाशी लोळण घेत आहेत.पण या सुखदायक स्तिथीत देखील दीन, दुबळ्यांसाठी ज्यांच्या डोळ्यात आपुलकीचे आणि काही तरी त्यांच्यासाठी करून दाखवायचे भाव निर्माण होतात,तो खरा मानव..बाकी सगळे देव..देव म्हटलं म्हणजे कौतुक केलं असं समजू नका.देव कोणाच्या किती कामी येतो हे सगळ्यांना माहीत आहे.त्यामुळे देव म्हटलं म्हणजे हुरळून जाऊ नका.माझी शिकवण तत्वप्रणाली मला काहीही शिकवत राहिली आणि माझा मेंदू कितीही भ्रष्ट झाला तरी मी त्या देवावर,जो वाईट कृत्यांना समर्थन दर्शवतो त्यावर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही.
इथे शिक्षा सहन करणाऱ्याला होते,आरोपीला नाही.
हे नीतिमत्तेला निश्चित अनुसरून नाही.पुस्तकाच्या पहिल्या पानावर संविधान उद्देशिका लिहून तिच्याकडे ज्या प्रकारे दुर्लक्ष आपण करतो.त्याचं पद्धतीने अनेक नीतिमूल्यांची आपण पायमल्ली करत असतो.म्हणजे आम्ही किती भारी,संविधानाला मानतो..म्हणणारे,
जेव्हा त्याच संविधानाने दिलेल्या न्याय निवाड्याला विरोध करतो.त्याला पूर्णतः नष्ट करण्याचे प्रयत्न करतो.
तेव्हा हा विरोधाभास तुमच्यासह सगळ्या समाजाला राख करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवला म्हणून मराठ्यांना अभिमान.महात्मा फुले यांनी उत्कृष्ट कार्य केले म्हणून माळी समाजाचा अभिमान.डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान देशाला देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले म्हणून बौद्ध समाजाला अभिमान.प्रत्येक महामानवाचे कार्य आपल्या संकुचित विचारांप्रमाणे संकुचित ठेवण्याचे कार्य त्यांना मानतो म्हणणारे व त्यांचे अनुयायी यांनी केला आहे.एखाद हित उंबरा ओलांडून समाजात या महामानवांनी पेरलं म्हणजे ते विशिष्ट कुटुंब,घटक, समाज यांच्यासाठी नसून,संपूर्ण मानवजातीचे हितासाठी.हे विसरलात का तुम्ही ? तुम्ही जेवढे तुमच्या खोट्या विश्वात रमणार ना तेवढी जोरदार थोबाडात एके दिवशी नियती वास्तवात तुमच्या लावेल,हे लक्षात ठेवा.नियती दैवाशी जोडलेली नसते.ना आपल्या हाताच्या रेषांवर ती अवलंबून असते.आपले कर्म काय आहे,यावर ती आवलंबून असते.
अनेक साधु-संत,बुवा-बाबा,लबाड असेही आहेत जे मुक्तफळे उधळताना उपदेश पराकोटीचे करतात.मुळात कृत्य मात्र तेवढेच घृणास्पद करतात.तसंच आपलं समजावं.या अशा विरोधाभासाने आयुष्य जगताना काही वेळेला यश मिळेल.पण आपल्या नजरेत तरी आपली पत उंचावेल का ?
पुस्तकांमध्ये लिहिलेल्या ज्ञानावर येणारी पिढी विश्वास ठेवेल का ? का फक्त माहिती म्हणून मेंदूच्या एका कप्प्यात साठवून ठेवेल ? असं घडलं तर नवल काय ? कारण माणसं काय बोलतात यापेक्षा ते कृती काय करतात हे बघणं महत्त्वाचं ठरत आहे.
येणाऱ्या पिढीला हे फक्त अभ्यास म्हणून लक्षात ठेवा. हेच आपण पालक म्हणून शिकवायचं की त्याला अनुसरून,स्वीकारून योग्य कृती करायची हे शिकवायचं हे आपल्या विचाराने व कृतीतून समजवणे योग्य होईल.
अशा अनेक विरोधाभासांना आपण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सामोरं जात असतो.त्यात योग्य बदल करणं आपलं कर्तव्य आहे.तरच महामानवांच्या विचारातील एकसंध,मानवतावादी समाज निर्माण होईल. अन्यथा..विनाश अटळ आहे !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment