थकवा अन कंटाळा..
थकवा अन कंटाळा..
थकवा आला की आराम करायचा असतो,
कंटाळा आला तर विरंगुळा शोधायचा असतो.
हे कळत असत,पण वळत नसतं.
कंटाळा कधी स्वतःचा येतो,
तर कधी रोजच्या वेळापत्रकाचा.
थकवा कधी कामाने येतो,
कधी नुसत्या घामाने सतावतो.
कंटाळा पिढ्यानं पिढ्यानंच्या
रूढी परंपरांचा असतो,
थकवा त्यांच्या ओझ्याने ही जाणवतो.
मी हसून तो वागवतो,
तो जड नाही असं भासवतो.
खोल श्वास घेवून,
हृदय अन मनावरचे ओझे धुवून.
चेहऱ्यावर हस्य फुलवून,
थकलेले खांदे असतो उंचावून.
ह्या थकव्याचा ही आता कंटाळा आलाय,
अन कंटाळ्याचा थकवा जाणवायला लागलाय.
पण थकून चालणार नाही,
कंटाळून मी बसणार नाही.
ह्या क्षणाच्या भावनांना,
मी शरण कसा जावू.
आयुष्य माझंच उध्वस्त करण्या,
माझ्या मनाचा ताबा मी कसा देवू.
एक घोट घेतो मस्त चहा-कॉफीचा,
तास एक घेतो विश्रांतीचा.
काय नी कशासाठी राबत आलो,
एक तो विचार अन मी झालो.
उत्तर माझे मलाच उमगले,
का थकलो का कंटाळलो.
प्रश्न माझा मीच सोडविला,
मार्ग होता हा मीच निवडला.
हा थकवा आणिक कंटाळा,
जाणीव देतो एकटेपणाची.
पण संकेत समज हा तुझ्या मनाचा,
लढा शेवटच्या टप्प्यातील तुझ्या कार्याचा.
पुन्हा हाती घे संकल्प ध्येयपूर्तीचा.
थकलेल्या,कंटाळलेल्या माझ्या मनाला,
शब्दांचा आधार.
संवेदना लपतात शब्दांच्या आड,
हाती लेखणी अन मनी भावनांचा बाजार.
व्यक्त करून मनातील भाव,
शब्द जगाकडे घेतात धाव.
माझ्या मनी तुझ्या ध्यानी,
चांगल्या,वाईट भावनांचा,
विश्वात मांडला डाव.
एक स्मित एक हात,
एक शब्द अन एक साथ.
सारा थकवा दूर करी,
कंटाळ्याशी वैर धरी.
जोड नाते असे स्वतःशी,
खूण गाठ ठेव मनाशी.
संवादाने सुटती प्रश्न,
सूक्ष्म असो वा तीक्ष्ण.
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment