१० डिसेंबर..आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन !
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस
१० डिसेंबर २०२०
UNHRO संयुक्त राष्ट्रसंघ मानवधिकार कार्यालयाच्या नेतृत्वात जगभरात १० डिसेंबर हा दिवस
'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा केला जातो.१० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र पॅरिस येथे स्वीकारले होते.संयुक्त राष्ट्रसंघाने पुढे १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन/दिवस म्हणून जाहीर केला.
मानवाचे अधिकार व हक्क ही कोणाची जहागिरी नाही.प्रत्येक मानवाला त्याचे हक्क,अधिकार स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य समाजातील प्रत्येक व्यक्तीचे अबाधित राहिले पाहिजे.प्रत्येक मानवाला सन्मानपूर्वक जीवन जगता यावे या उद्देशाला अनुसरून १० डिसेंबर हा दिवस त्या प्रती जागृतता निर्माण करण्यासाठी म्हणून त्याकडे पाहिले जावे.अर्थात एक दिवस असावा असं नाही.
मानवाला मूलभूत अधिकार प्राप्त होणे आवश्यक आहे.कोणताही भेदभाव कोणत्याही व्यक्तीला तिचे मानवी हक्क व अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही.तिचे राष्ट्रीयत्व,लिंग,जात,धर्म,वर्ण,भाषा,निवास, इत्यादी भेदभावाच्या आधारे मूलभूत अधिकारांपासून कोणीही वंचित राहू नये.आपल्याला जन्मापासून
(खरं तर आईच्या गर्भात असल्यापासून)ते मृत्यूनंतर मानव म्हणून काही अधिकार व हक्क आहेत.
ते प्रत्येकाला मिळालेच पाहिजेत.असे अनेक अधिकार आपल्याला मुलभूत हक्कांद्वारे प्राप्त आहेत.
उदाहरण-
समानतेचा अधिकार,भेदभावापासून स्वातंत्र्य, जगण्याचा अधिकार,स्वातंत्र्याचा अधिकार, स्वसंरक्षणाचा अधिकार,कायद्यापुढे सर्व समान अधिकार, मत मांडण्याचे स्वातंत्र्य,गोपनीयता स्वातंत्र्य,छळ व मानहानी सारख्या वागणुकी पासून स्वातंत्र्य, गुलामगिरीपासून मुक्तता,वैचारिक स्वातंत्र्य,शिक्षणाचा अधिकार,चांगले अन्न व स्वच्छ पाणी मिळण्याचा अधिकार,वस्त्र व निवारा अधिकार,मूलभूत आरोग्य सेवांचा अधिकार,इत्यादी.
भारता ही मानवी हक्क कायदा लागू आहे.
२८ सप्टेंबर १९९३ रोजी मानवी हक्क कायदा भारतात लागू झाला.पुढे १२ ऑक्टोबर १९९३ मध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. सामाजिक,राजकीय,आर्थिक व सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला आहे.सर्वप्रथम ४८ देशांनी १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला.एकूण ३० कलम असलेल्या घोषणापत्रावर आधारित मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधायक १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मांडण्यात आले.पुढे १९७६ मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.
आपल्याला प्रत्येकाला या हक्क व अधिकाऱ्यांसोबत आपली जबाबदारी ही जोडलेली असते.जी आपण पार पाडण्यात चूकभूल करतो.आपल्याला आपले हक्क अधिकार मिळाले पाहिजेत.पण त्यासाठी संघर्ष करायला लागू नये.इतरांनी आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू नये,तसेच आपणही तसं वागू नये हे लक्षात का येत नाही ? मानवी मूलभूत हक्क हे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहेत.ते आपण समजून घ्यायला पाहिजे.पण खंत या गोष्टीची आहे की मानवी हक्क व अधिकार स्वातंत्र्य आपल्याला आहे हेच बहुसंख्य जनसामान्यांना माहीत नाही.त्यासाठी जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे.
प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा व मूलभूत हक्क मिळवण्याचा अधिकार आहे.कोणीही तो हिरावून घेण्यास पात्र नाही.आईच्या गर्भात वाढत असलेल्या,त्या जग न पाहिलेल्या बालकास देखील जगण्याचा अधिकार आहे.तो गर्भ मुलीचा आहे म्हणून तिचा जीव घेणं,हा त्या मानवी जीवाचा जगण्याचा हक्क व अधिकार हिरावून घेणं मानवी मूल्यांचा अवमानच आहे.मेल्यानंतर देखील त्या मानवी शरीराचे योग्य पद्धतीने आदरपूर्वक विधी होणे अपेक्षित आहे.त्याचबरोबर जन्मापूर्वी व मृत्यूनंतर या दोन्हींच्या मध्ये जे जीवन आहे,ते ही प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक मिळावं हेच मानवी हक्कांद्वारे अपेक्षित आहे.
खरं तर या साठी कोणता कायदा असण म्हणजे चेष्टा वाटते.पण मानवाला एकमेकांप्रती मानवतेने राहायला सांगावं लागतं हाच मुळात गंभीर विषय आहे.आपल्या हक्क,अधिकारांकडे आपुलकीने बघताना इतरांकडेही लक्ष द्या.आपले हक्क,अधिकार स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या हक्क,अधिकार स्वातंत्र्याची पायमल्ली करून मिरवू नका.आपण मानव म्हणून सगळे समान आहोत हे ध्यानात ठेवा.स्वतःबरोबर इतरांचा अधिकार,हक्क स्वातंत्र्याचे ही संरक्षण करा.
मानवता हाच खरा धर्म,हे आपण विसरत चाललो आहे.आज अनेक सत्ताधारी लोक विविध भेदभावाच्या आधारे मानवाला मानवाशी भिडवत आहेत.
स्वतःच्या स्वार्थापायी ठराविक मंडळी हुकुमी पद्धतीने जनसामान्यांना वेठीस धरून आपले मानवी हिताविरुद्धचे अमानवी धोरण साधत आहेत.पण सारासार
सद्विवेक बुद्धीचा उपयोग व वापर आपण टाळत आहोत.म्हणून ते धूर्त मूठभर लोक यशस्वी होत आहेत. त्यामुळे यात सर्वप्रथम दोष आपलाच.म्हणून मानवी हक्क समजून घेणं महत्त्वाचं होत आहे.शिक्षण घेऊन मानव शिक्षित होतो,पण साध्या-साध्या गोष्टींचा विचार व आचरण मागे सोडतो.नवीन शिकलं म्हणजे जून मागे सोडायचं असं नसतं.त्यात मानवाला मानव न समजून, त्याचे हक्क व अधिकार यासाठी त्याला झगडावं लागत असेल तर शिक्षणाचा उपयोग काय ? आपण कोणत्या अशा स्वार्थी हुकूमशहा सत्ताधार्यांच्या नादाला लागून इतरांबरोबर आपले ही मानवी हक्क अधिकार स्वातंत्र्य पणाला लावत नाही ना हे बघा.हे समजू शकलो तरी अनेकांच्या मूलभूत मानवी हक्काचे संरक्षण होईल हे निश्चित.तर चला आपले विचार व आचरण मानवहिताय या दिशेने घेवून जावू व प्रत्येक मानवाला सन्मानाने जीवन जगण्याचे विश्व असे एक स्थान निर्माण करू.
सर्वांना १० डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त शुभेच्छा !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment