कष्टाला पर्याय नाही..There is no substitute for hardship..

कष्टाला पर्याय नाही..

कष्ट म्हणजे श्रम.काही मिळवायचं म्हटलं तर श्रम हे घ्यावेच लागतात.कष्टाची दोन वेळची भाकर सुद्धा पंचपक्वान्न पेक्षा समाधान देऊन जाते.तसा भारत हा कृषिप्रधान देश.म्हणून कष्टाला आणि कष्टाळू माणसांना इथं तोटा नाही.मुळात देशाची खरी ताकद ही शेतकरी कष्टकरी हेच.त्यांच्या श्रमदानामुळे कोणताही देश यशस्वीपणे उभा असतो.स्वतःचं व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जरी ही माणसं राबत असली तरी त्यांचे कष्ट हे सामाजिक स्तरावर मोठं योगदान देत असतात.शेतकरी तर जगाचा पोशिंदा,त्याबद्दल तर मला नितांत आदर आहे.त्याचबरोबर कष्ट करून नोकरी करणारे, हमाल, रिक्षा,टेम्पो,इ.चालक,साफसफाई कामगार,मजूर अशा सर्वांबद्दल आपल्याला आदर हवाच.
     आज एक माझ्याबरोबर घडलेली कालचीच घटना इथे मांडत आहे.ह्या लेखाबरोबर जोडलेल चित्र तुम्ही पाहिले असेल.त्यात एक रिक्षा,रिक्षावाला व एक महिला बसलेले दिसतात.हे ह्या घटनेला अनुसरूनच आहे.मी काल सत्यशोधक प्रबोधन महासभा,महाराष्ट्र आयोजित  बळीपूजन निमित्त फुले वाड्यात निघाले होते. नेहमीप्रमाणे ऑनलाइन रिक्षा बुक केली.रिक्षात बसल्यावर लक्षात आले रिक्षावाले दादा खूपच बोलके आहेत.मी साधारण सव्वा दहाला घरातून निघाले होते.रिक्षावाले दादा म्हणत होते,'तुमची ट्रीप आली तेव्हा जेवण करत होतो".मला थोडे आश्चर्य वाटले आणि आपल्यामुळे जेवताना यावं लागलं की काय हा प्रश्न पडला.मी'तुम्ही जेवलात का पण'?
असं विचारल्यावर ते हो म्हणाले.मला ही नको तेवढे प्रश्न पडत असतात.एवढ्या लवकर जेवता का हा माझा प्रश्न लगेच तोंडातून निघाला.त्यावर त्यांनी जे सांगितलं ते आणखीन आश्चर्यकारक होत. 
      'सुट्टी म्हणून घरच्यांना गावाला पाठवला आहे ताई'.ते स्वतः लातूरचे.काही वर्षांपूर्वी पुण्यात कामाच्या शोधात आलेले,इथेच स्थायिक झाले.गेली सहा ते सात वर्षे स्वतः गावाकडे जाता आले नाही हे दुःख त्यांच्या बोलण्यात जाणवल.करोना आणि लॉकडाऊन मुळे सगळ्यांचे हाल झालेत.पण त्यावर मात अनेकांनी केली,त्यातील हे दादा एक.तर घरी कोणीच नसल्याने काल ते सलग तीन दिवस-रात्र रिक्षा चालवत आहेत असं समजलं.मग जेवण-खावण,झोपेच काय ? हा माझा पुढचा प्रश्न.त्यावर गावाकडचे कोणीतरी त्यांना डबा देतात हे समजलं.पण,'डब्याचे पैसे देतो.कोणाचे तरी कष्टच आहेत.फुकट आपल्याला काही नको'.हे त्यांचे त्या मागचे विचार.काल रात्री दोन तास स्वारगेटला मस्त झोप झाल्याच ही त्यांनी सांगितले.
    मी म्हंटल एवढं सगळं कशासाठी ? तर मुलं,त्यांचे शिक्षण या सगळ्यासाठी पैसा लागतो.तो कमावता पण आला पाहिजे हे त्यांचे उत्तर.थोडी जागा घेऊन छोटे घर बांधले,रिक्षा घेतली त्याचे पण हप्ते आहेतच.घरचे नाही,त्यात दिवाळी असल्याने दोन-चार दिवस बरे पैसे मिळतील हा त्यांचा हिशोब.पण चार पैशासाठी दिवस-रात्र करोनासारख्या महामारीच्या काळात किती लोक कष्ट करत आहेत,ते पण जिवावर उदार होऊन जाणून काळजात वेदना झाल्या.आपण किती सुखी आहोत हे तेव्हा पुन्हा उमगलं.पण एवढं सगळं असून कोणतेही दुःख,थकवा,आळस त्या दादांच्या चेहऱ्यावर नव्हता.तेव्हा इंग्रजी मधील काही ओळी आठवल्या. 'Hard Work Is Labour Of Love', म्हणजे आपल्या प्रियजनांसाठी जो कष्ट करतो त्याला ते कष्ट प्रेमाचीच  मजुरी वाटतात.आई-वडील आपल्या मुलांसाठी किती कष्ट घेतात,पण त्यांना ते ओझं वाटत नाही.तसंच ह्या दादांचं.मुलाला कोणत्या कॉलेजात टाकायचं.त्याला सैनिक बनवायचं स्वप्न बघणारा ध्येयवेडा बाप काल पुन्हा एकदा पाहिला.
     रिक्षाबरोबर इतर गाड्या देखील हे दादा चालवतात. 'एका कंपनीत विचारणा झाली आहे ताई',मला सांगू लागले.पण तिथं त्यांना सांगितलं जास्त काम नाही.बसूनच वेळ जाईल.तरी या दादांनी पडेल ते काम करेल,पण बसून राहणार नाही असे उत्तर दिलं.खरं तर तरुण पिढीने हे शिकलं पाहिजे.पडेल ते काम करणं म्हणजे अपमान होत नाही.कोणत्याही कामात कष्ट असतात.त्याची लाज बाळगून उपयोग काय ? आज मोठ मोठ्या व्यावसायिकांची कितीतरी उदाहरणं आहेत.
दुसऱ्यांकडे पडेल ते काम करायचे,पण कष्ट सोडले नाही.एक एक यशाची पायरी चढून पुढे जातात.हेच खरे यश.फुकटच्या श्रेयावर अनेक तुटून पडतात,पण जे मी कमावलं आहे त्याबद्दल पाठीवरची एक थाप अन कौतुक मिळण,मला जास्त समाधानकारक वाटत.काही वेळातच आमच्यात एक वैचारिक नातं निर्माण झालं.
      पुढे माझे विचार ऐकून,'ताई खूप शिकलेल्या का हो तुम्ही',असं त्यांना प्रश्न केला.मी बीए पॉलिटिक्स असं उत्तर दिल.त्यांना ते काय समजलं नसावं,पण तेच काय खूप भारी वाटलं.माझे विचार खूप वेगळे आहेत असं त्यांचं मत.मी जात-पात मानत नाही.मानवतावाद आमच्या रक्तात आहे हे ऐकल्यावर अजून मोकळेपणाने व आपुलकीने ते बोलू लागले.अर्थातच त्यांची जात काय आणि माझी काय हे आम्हाला माहित देखील झालं नाही.पण कसलं तरी अदृश्य दडपण असतं बहुतेक मनावर,ते गळून पडलं.मी नेहमीच बोलते तेच बोलत होते.माझ्यातला समाज प्रबोधनकार जागृत असतो.जमेल तिथं जमेल तेवढे चांगले विचार पेरत रहायचं,हेच माझं कार्य.पण ते विचार प्रभावी होतात हा देखील जिवंत अनुभव मी घेत असते.माझं बोलणं ऐकून दादांच्या अंगावर शहारे येत होते.विषय होताच तसा.. "महामानवांचा आपल्यासाठीचा संघर्ष"! ते फार शिकलेले नव्हते पण जाणून घेण्याची इच्छा,उत्सुकता खूप जाणवली.आज फुले वाड्यात बळीपूजनासाठी चालल्याच समजताच त्यावरही प्रश्न त्यांनी विचारला. त्यांना थोडक्यात माहिती दिली,कारण माझा त्या प्रवासाच अंतिम ठिकाणी जवळ होत.
     भाऊबीजेच्या दिवशी विचारांनी आणखीन एक भाऊ दिला असं त्यांना म्हटल्याने ते निशब्द झाले.
बहुदा मी मोठ्या घरातली.त्यांना मी असे काही तरी म्हणेल बहुदा ही अपेक्षा नसावी,असे ते त्यांचे भाव होते.पण मी त्यांना भाऊ म्हटल्याने काय बोलावं त्यांना कळेना.
     रिक्षातून उतरण्याआधी,'ताई तुमचा नंबर मिळेल का'? एवढंच ते बोलले.मी माझं कार्ड दिलं आणि दादा केव्हाही,काहीही मदत लागली तर कॉल करा म्हणून फुले वाड्याच्या दिशेने झपझप पावले टाकू लागले.पण मनात आणि डोक्यात पंचवीस मिनिटांच्या प्रवासात झालेले संभाषण,कष्ट करणारा एक बाप माणूस घर करून गेला.आज पुन्हा एकदा वाटलं खरंच कष्टाला पर्याय नाही.उद्या त्यांच्या कष्टावर त्यांची मुलं निश्चित यशस्वी होतील.पण असे असंख्य कष्ट करणारे हात ते सुख उपभोगण्यासाठी सुखरूप राहू देत,त्यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली !

आजचा हा लेख सर्व कष्टकऱ्यांना समर्पित !

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??