सण..वसुबारस..वैचारिक शुभेच्छा !
भारताच्या संस्कृतीत सणांना विशिष्ट महत्व आहे.
त्या विषयी थोडी माहिती वाचकांसमोर मांडत आहे.भारताची मूळ संस्कृती मातृसत्ताक.याच मातृसत्ताक संस्कृतीच्या माध्यमातून कृषीची निर्मिती झाल्याचे आपणांस ठाऊक आहेच.म्हणजेच शेतीचा शोध स्त्रियांनी लावला व आपल्या सिंधू संस्कृतीच्या राज्यकर्त्या स्त्रियाच होत्या.आपले सण हे याच मातृसत्ताक,कृषिप्रधान व्यवस्थेला अनुसरून आहेत.कसे ते बघूया.
आपल्याकडे स्त्रीरूप पुजली जातात.ह्या सर्व आपल्या पूर्वज असणाऱ्या कर्तृत्ववान राज्यकर्त्या आद्यगणमाता आहेत.शंकर,कृष्ण,भैरोबा,खंडोबा, म्हसोबा,हनुमान इत्यादी आपले आद्यपुरुष अथवा पूर्वजच.पण या सर्वांचं दैवीकरण करण्यात आलं.
अर्थात ते पूजनीय आहेतच पण या दैवीकरणाच्या माध्यमातून बहुजन समाज अनावश्यक व निरर्थक अशा कर्मकांडांच्या आहारी गेला.या मुळे हजारो वर्ष गुलामगिरी स्वीकारून आपल्याच आद्य स्त्रीपुरुषांना अपमानित करण्याचे क्लेशदायक कार्य बहुजनांच्या हातून घडतं आहे.अनेक इतिहासकारांनी अभ्यासपूर्ण सत्य इतिहासाची मांडणी केलेली आहे.त्यातून बोध घेऊन अनुचित,क्लेशदायक कृतीला बांद घालून,सत्य जाणून,अनावश्यक कर्मकांड,रूढी-परंपरा यांचा त्याग करून आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या समतेच्या आदर्श मार्गाने जाण्यास आपण स्वतःला प्रवृत्त करायला पाहिजे.तरच आपल्या पूर्वजांची झालेली विटंबना दूर करण्यास आपल्याला यश मिळेल व प्रगतीचा त्यांना अभिप्रेत असलेला मार्ग आपल्याला गवसेल.
या बदलाची सुरुवात आपल्या सणांच्या माध्यमातून करता येईल.दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा सण.सुख दुःख मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भागच.काळ बदलला की सुख दुःखाचे दोन्ही क्षण एकत्रित होण्याचे अनेक प्रसंग आपल्या जीवनात घडतं असतात.त्याचं प्रमाणे दिवाळी हा सण आनंदाचा असला तरी इतिहासाच्या पाऊलखुणा दुःखात आनंद आणि आनंदात दुःखाचे विरजण देवून गेल्याचे पुरावे आहेत.
तसाच दिवाळी सणाचा संबंध बळीराजा बरोबर अशाच सुख दुःखाच्या भावनांनी बहुजनांशी जोडलेला आहे. बळीराजा हा आपला कर्तृत्ववान,चारित्र्यसंपन्न, संविभागी,विनयशील अशा गुणांनी समृद्ध असलेला, मातृसत्ताक व कृषी संस्कृतीचा पुरस्कृतकर्ता जाणता राजा.वामनाने कपटाने केलेला बळीराजाचा छळ.
या सगळ्याचा झालेला परिणाम आज पर्यंत बहुजन समाज भोगत आहे.याच बळीराजाचे औदार्य स्मरण करून त्याचे सुराज्य व स्वराज्य पुन्हा येईल याची आस आपण बाळगत आहोत.सणांमधे भेसळ जरी झाली असली तरी त्यातील काही भाग तपशीलवार जर पाहिला तर खरा वारसा समजून येईल.
सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे मातृसत्ताक व कृषी संस्कृतीशी जोडलेले आपले सण आहेत.पिकांची पेरणी,काढणी,बदलणारे ऋतू त्यांचा मानव जीवन,
शेती यावर होणारे परिणाम या सगळ्यांच्या आधारे तयार केलेले एक बैजवार वेळापत्रक म्हणायला हरकत नाही.सगळी सुबत्ता व नांदी ही शेती व पशु धन यावर आवलंबून होती व आज ही आहे.शेती आणि घरात गोठ्यातील गुरं यावर पूर्वी माणसांची श्रीमंती मापली जायची.कुटुंबातील एक घटक म्हणून गाया,म्हशी,बैल यांना वाढवलं जायचं.शेती व घरातील दूध इत्यादी गाई,म्हैस,बैल यांच्यावर आवलंबून असायचं.म्हणून सणांमधे महत्वाच स्थान या पशूंना दिल आहे.
बैल पोळा,बसुबारस असे काही सण.
दिवाळीच्या पाच दिवसांची सुरुवात वसुबारस या दिवसाने सुरू होते असं मानतात.या दिवशी संध्याकाळी गाई व तिच्या गोऱ्ह्यांची पुजा केली जाते.
त्यांना ओवाळून फुलांची माळ गळ्यात घातली जाते.
गोठ्यातील इतर गुरांना देखील स्वच्छ आंघोळ घालून त्यांची देखील पुजा केली जाते.हात जोडून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण.पुरणपोळीचा स्वयपाक करून ती गाय गोऱ्याला दिली जाते.हे पशुधन घराला, लहान मुलांना पूर्ण आहार देवून आरोग्यसंपन्न बनवतो.मानवाच्या हितासाठी,प्रगतीसाठी त्यांचा त्याग,कष्ट हे वसरून चालणार नाही.भारतीय संस्कृती या सर्व प्राणी मात्रांना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानत आली आहे व त्याच्या प्रति आपल्या भावना या सणांद्वारे व्यक्त होत असतात.असाच वसुबारस हा दिवस.
गाई निश्चितच माते समान आहे.कारण तिने दिलेलं दूध पिऊन आपण मोठं होत असतो.आई ज्याप्रमाणे संगोपन करून आपल्याला वाढवत असते त्या प्रमाणे गाई,म्हैस या देखील घरदार दूध दुपत ठेवून आपलं व कुटुंबाचं एकप्रकारे संगोपनच करत असतात.आईला देव मानतो तस गाईला देव मानण्यात काहीच गैर नाही.पण या श्राद्धेला जोडून असलेली अंधश्रद्धा मात्र खोडून काढणं गरजेचं आहे.३३कोटी देव गाईमध्ये वास करतात म्हणून तिला पूजाव हे धादांत खोटं आहे.आपली मूळ संस्कृती ही स्वतःला या पशूंपासून अलग करत नाही.ते आपलाच एक भाग म्हणून कायम समरस राहिले आहेत.
पूजनाचे महत्व आहे तसेच त्याची पद्धत देखील विशेष आहे.यज्ञ ही संस्कृती आपली नसून ही कालांतराने वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून आपण लादून घेतली आहे.असो ! इथे तो विषय घेतला तर मूळ विषय बाजूला राहील,म्हणून उल्लेखापुरते ठेवू.
आपला पुजा विधी फुलं वाहून,दिव्याने औक्षण करून केला जातो.पूर्वी लाईटीचे दिवे नव्हते.दिवा,समयी, पणती,इ.द्वारे अंधार दूर केला जायचा.दिवा हे तेजाचे, ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे.तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा दिवा हा माध्यम आहे.एक समृद्ध परंपरा ही दिव्याच्या माध्यमातून जतन होत आहे.एक छोटा दिवा मन प्रसन्न करतो.असे हे सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून दिव्याचा मान व महत्व आहे.तो कोणत्या दिशेला ठेवल्याने काय होत यात मला तरी तथ्य वाटत नाही. दिव्याच काम दिवा करतो आपण आपलं कार्य केलं की इच्छित फळ निश्चित मिळेल.त्यासाठी दिवा दिशादर्शक घेऊन नाचवायची गरज नाही.म्हणून बुद्धीवर पडलेली झापड झटका आणि श्रद्धेतून अंधश्रद्धा दूर करा.
वसुबारस निमित्त सर्वांना वैचारिक शुभेच्छा !
पुढील पाच दिवस दिवाळी सणा निमित्त यावर आधारित लेख लिहिणार असून आवर्जून वाचावे ही विनंती.आजचा लेख सुरुवातीलाच थोडी विस्तृत माहिती देवून मांडला आहे याची नोंद घ्यावी.
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment