ऋण..
माझ्या लिखाणाला आपण उस्फूर्तपणे
दिलेला प्रतिसाद व कौतुक,
माझ्यासाठी अनमोल आहे.
मी आपल्या ऋणात राहील..
सदैव !
आज एक महिना पूर्ण झाला.गेल्या महिनाभर विविध विषयांवर आधारित लेख लिहून आपल्या सर्वांसमोर ते मांडत आहे.अनेक वर्षांची इच्छा होती मनातलं कागदावर उमटाव.पण काही कारणास्तव ते शक्य होत नव्हतं.लॉक डाऊनच्या काळात वेळ असून देखील शक्य झाले नाही.म्हणतात ना योग्य वेळ यावी लागते बहुदा हीच ती योग्य वेळ असावी.इथून पुढे हे सातत्य टिकवण्याचा पूर्णतः प्रयत्न निश्चित करेल.हे आधीच सांगत आहे कारण जितकी सवय तुम्हा वाचकांना लेख वाचण्याची झाली आहे तेवढीच मला ते मांडण्याची झाली आहे.वक्त्याला चांगला श्रोता आणि लेखकाला चांगला वाचक लाभणं फार आवश्यक आहे.आजच्या लेख माझ्या सर्व प्रिय वाचकांसाठी.
कागदावर उमटणाऱ्या प्रत्येक शब्दात लेखकाचा अंतर्भाव असतो.विचार,भावना या प्रत्येकामध्ये निर्मित होत असतात.पण कागदावर उमटवण्याची कला,प्रतिभा ही लेखकांमध्येच असते.लिहिणारा लिहित असतो.
तो हे भाव व विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम असतो.लेखकाने केलेले लिखाण वाचकाला आपलसं वाटलं तर तेच लेखकाचं यश समजाव.त्यातून लेखकाचा झालेलं कौतुक,मिळालेला प्रतिसाद हा अनमोल असतो.कौतुकाची एक थाप लेखकाला प्रोत्साहित करते.वाचकांचे प्रतिसाद निश्चितच आणखीन नवीन शब्दांची जुळवणी होण्यास,नवीन काही तरी शिकण्यास व ते मांडण्यास लेखकामधे बळ निर्माण करतात.
आपल्या आयुष्यात व त्या लिखाणात काहीतरी साम्य आहे.कोणता तरी वैचारिक धागा आपल्याला लेखका बरोबर जोडतो व त्यातूनदेखील प्रतिक्रिया उमटत असतात.त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.त्यातून आपलेपण जोपासलं जात.मी आपल्या सर्वांचे आभार मानून मोकळी झाले असते,पण ती औपचारिकता मला कधी जमलीच नाही.आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास,दिलेलं प्रेम,आपलेपणा,मार्गदर्शन,आदर हा आभार या एका शब्दात समजावणं शक्य नाही.विचारांना शब्दांच्या माध्यमातून मांडल्याने इतकी नाती निर्माण होतात हा अनुभव अविस्मरणीय आहे.मुळातच माणसं जोडणं हा माझा स्वभाव.त्यात लेखनातून माणसं आपलीशी करता येतात हा शोध काय सुख देऊन गेलाय हे देखील मांडताना शब्द अपुरे पडतील असं वाटत.
पण खरंच तुमच्या सारखे वाचक आहेत म्हणून माझ्यासारख्या नवोदित लेखक,लेखिकांना स्फूर्ती मिळते.आम्ही काय करू शकतो हे तुमच्या प्रतिसादातून समजून येत.त्यात आणखीन श्रम घेवून अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट निर्मिती करण्यास मदत होते.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाचकांनी सतत दिलेली टिपणी,आपली लेखणी आणखीन सुधारण्यासाठी हिताचे असते हे खरा लेखक जाणतो.आपल्या विचारांमध्ये बदल करायचा नसतो तर मांडणीत करायचा असतो हे देखील वाचकांच्या प्रतिसादातून समजून येतात.सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व,वेळात वेळ काढून माझे लेख वाचता व त्यावर प्रतिक्रिया देतात ही सर्वात मौल्यवान भेट आहे.कारण वेळेपेक्षा मौल्यवान काहीच नाही.आपण ती अनमोल वेळ माझ्यासाठी खर्च करतात यातच सर्वकाही मिळाल्याचा आनंद आहे.माझे वाचक म्हणून आपण माझ्या लिखाणाला आधार दिलात हे म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही.आभार मानलेली तर नक्कीच काही काळ आपण सुखावतो पण ऋणात राहिल्याने आयुष्यभर हे सुख आपल्यात एक नातं निर्माण करेल.हे नातं मला टिकवायचं आहे.आपल्या ह्या लेखक-वाचक नात्याला मला बांधील राहायचा आहे.सदैव..आपल्या सगळ्यांची साथ ही केवळ शाब्दिक नाही तर त्या आधारे कृतीतून जीवन जगण्यात आहे.ही भावना मी आज आपल्या सगळ्यांप्रती व्यक्त करत आहे.
मला अनेक वाचकांचे अनेक निरोप आले.त्यातील काही इथे मांडत आहे.काही वाचकांनी माझे लेख एक नवीन उमेद निर्माण करतात असं कळवलं.ताई तुम्ही आमच्या मनातले लिहीत आहात असं काहींनी सांगितलं.ताई तुम्ही आमच्या मार्गदर्शक आहात,असेच मार्गदर्शन करत रहा म्हणून अनेकांनी मत व्यक्त केलं.बऱ्याच जणांना मराठी वाचता येत नाही म्हणून हिंदी,इंग्रजी मध्ये लिहा म्हणजे आम्हालाही वाचता येईल असं कळवलं.निश्चित त्याचा प्रयत्न नी करेल.कोणा कोणाला लिहिण्याची प्रेरणा मिळाली.फोन,msg करून अनेकांनी वेळोवेळी माझ्याबरोबर संवाद साधला.छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या महत्वाच्या असतात कधी समजलंच नाही ताई,असं ही खुप ऐकायला मिळालं. आम्ही खुप विचारपूर्वक तुमची मांडणी वाचत आहोत असं मत वाचकांनी व्यक्त केलं.अनेकांनी आता याच मांडणीच एका पुस्तकात रुपांतर करा असं सुचवलं आहे.मला मी एवढं काही मांडत आहे हे कधी जाणवलच नाही. अगदी सोप्या,साध्या,भाषेतील अनुभवासहित मांडणी वाचकांना इतकी आपलीशी वाटते हे उमगलं.खरं तर वाचकांच कौतुक व्हायला पाहिजे.साधेपणाला वावं नसतो असं म्हणणाऱ्यांना हा निश्चित एक समजपूर्ण संदेश आहे.
पुस्तक छापायचं की नाही आणि छापलं तर कधी याबद्दल ही उत्सुकता वाचकांमध्ये आहे.त्याबद्दल लवकरच कळवेल.ती माझ्यासाठी Let's Level It Up ! ची पायरी असेल.त्यामध्ये माझ्या प्रिय वाचकांचा सहभाग मोलाचा असणार आहे.माझ्या यशाचे भागीदार मला प्रोत्साहन देणारे माझे वाचक आहेत.कौतुक करणाऱ्या प्रति ऋणी राहणं शिकलं पाहिजे.नम्रपणे एकमेकांचे भागीदार बनवून राहण,सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आपण मानव म्हणून करू शकतो.माझे वाचक म्हणून आपण सर्वांनी माझ्या आयुष्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.आपण सर्व माझे सहकारी,मार्गदर्शक झालात आणि त्यातून माझे लिखान होत राहिले.पुढेही आपलेपणा असाच अखंड राहो हीच इच्छा..
काहींनी माझ्या लेखनावर टीका केली असेल.त्यात काही मार्गदर्शक देखील लाभले,पण काहींनी अनावश्यक टीकेचा सूर देखील धरला.त्यांनी मला आणखीन भक्कम केल्याबद्दल त्यांचे ही ऋण नक्कीच आहे.तुम्ही सर्व माझ्यासाठी एखाद्या माळ्यासारखे आहात.तुम्ही घेतलेल्या काळजीतून माझ्या विचारांची बाग शब्दरूपाने सतत बहरत आहे.तुमचे प्रोत्साहन, कौतुक,प्रेम,आदर,मार्गदर्शन,विश्वास,टीका-टिपणी इत्यादी माझ्या लेखणीच्या रोपट्याला खत पाणी देण्याचे काम करत आहे.आपण माझे वैचारिक सोबती आहात. माझ्या लेखनातील प्रत्येक शब्द माझ्या वाचकांच्या प्रेरणेतून निर्माण होत आहे.
एखाद्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा काळीज असावं लागतं.मी भाग्यवान मला एवढी कौतुक करणारी आपली माणसं मिळाली.आपला कौतुकाचा एक शब्द एखाद्याचे जीवन उजळून काढत असतो.फक्त आपले ते विचार शब्दरूपात मनापासून उतरण्याची गरज आहे.काही चुकलं की चूक म्हणून सांगण्याच सामर्थ्य देखील आपल्यात असावं.तसंच लेखकाने त्याचा द्वेष मनी न धरता बदल करणं अपेक्षित आहे.यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी चांगलं वाईट सर्वांचं एकत्रितपणे योगदान आवश्यक असत.माझ्या आजच्या आनंदाचे मुळ आपण आहात.आज मी खूप समाधानी आहे ते आपल्यामुळे. वाचक माझ्याप्रमाणे उदार अंतःकरणाचे व व्यापक, सकारात्मक दृष्टीकोणा असलेले आहेत.हे समीकरण पदोपदी वृद्धिंगत होवो आणि आपल्या प्रेमाच्या ऋणात मी अखंड राहो हीच सदिच्छा !
आभार मानून आपल्या सर्वांच्या योगदानाचा अपमान करायची इच्छा अजिबात नाही.म्हणून ऋणी राहील.. असा उल्लेख केला आहे.हे ऋण दिवसागणिक वाढत राहो हीच माझी मनापासून अपेक्षा..
आपली
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
सुंदर लिखाण होते, महिनाभर वैचारिक फराळ भरपूर दिल्याबद्दल खूप खूप आभारी प्राची ताई 😘😘👍♥️
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete