भाऊ बीज

भाऊ बीज 

बहीण आणि भाऊ या नात्यांना एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर कोणा मिथकाची आवश्यकता नाही.बहीण भावाचं नातं म्हणजे एका बीजातून अंकुरलेला अन मायेची सावली निर्माण करणारा विश्वासाचा वटवृक्ष.आपण मोठे झालो की लहानपण पुन्हा यावं ही आस आयुष्यात एकदा तरी मनाला शिवून जाते.बालपण मजेचं म्हणून ही आठवण असते असं नाही.नात्यांमध्ये स्पष्टपणा,प्रेम,मायेचा ओलावा, निस्वार्थपणा,अल्लडपणा,पारदर्शकता,रुसवे फुगवे, विसरभोळेपणा,आनंद, सुख,आपलेपणा.सगळं कस निर्मळ असत.पण मोठेपण या सगळ्याचा घात करत.
मग असं वाटत मोठ झालोच कशाला.पण शेवटी निसर्ग नियम आहे.पण मोठं होताना प्रेम ही मोठं व्हावं याच गाणं लहानपणी शिकलोच नाही.पावसाला मोठं होण्यासाठी पैसा दिला की तो मोठा होतो हे शिकलो,ते धादांत खोटं असलं तरी.पण नात्यांना प्रेम,विश्वास, आपलेपणा देवून मोठं करता येत हे खरं मात्र शिकायला विसरलो.
    बहीण भावाचं नातं नितळ वहाणाऱ्या झऱ्यासारख असावं.त्यात स्वार्थाचा लवलेश नसावा.बहीणभावाचं हे नातं रक्ताचं असावं असं नाही,पण ते निस्वार्थी असावं. मोठा भाऊ हा पिता समान तर मोठी ताई ही आई समान असते असं म्हणतात.टाळी एका हाताने वाजत नाही तशी नाती देखील एकानेच निभावून चालत नाही.सर्वांचा सहभाग योग्य प्रमाणात असावा लागतो तेव्हा तो गोडवा टिकून रहातो.
    वर्षानुवर्षं बहुजन स्त्रियांनी बळीराजाला आपल्या भावामध्ये जतन करून ठेवलं आहे.आपला भाऊ हा बळीराजा समान कर्तृत्वान,शीलवान,संविभागी, मातृसत्ताक व कृषिप्रधान संस्कृतीचा पुरस्कृतकर्ता,
समतावादी,दयावान,बलवान,विनयशील,प्रेमळ असावा हे प्रत्येक बहिणीला वाटत.आपल्या भावाच्या माध्यमातून बळीराजाचा हा वारसा पुढे वृद्धिंगत होवो ही इच्छा बहीण आज व्यक्त करते.मला वाटत आपण जेव्हा कोणाला ओवाळू तेव्हा प्रत्येक वेळेला ही भावना आपल्यात असावी.जो पर्यंत विचार रुजणार नाहीत तो पर्यंत भावना उत्पन्न होणार नाही.जसे विचार तशा भावना आणि तशीच कृती.
   छत्रपती शिवाजी महाराज परस्त्री मातेसमान मानत.जिजाऊंचे संस्कारच ते ! आपण महामानव डोक्यावर घेवून मिरवतो पण डोक्यात घ्यायला विसरतो.शिवरायांना मानणारे माझे अनेक बांधव आहेत.आपण विचारांच्या धाग्याने,बहीण भावाच्या नात्याने जोडल्या गेलो आहे.शिवरायांची प्रेरणा घेवून माझ्या भावांनो हा स्त्रीसन्मानाचा अखंड दिप असाच तेवत रहावा जिजाऊं चरणी हिचं इच्छा ! 
    भावाने बहिणीला भेटून तिच्या हातचं गोड धोड खाव आणि बहिणीला भावाने भेटवस्तू द्यावी एवढ्या पुरता हा सण नसावा.मायेचा ओलावा नात्यांमध्ये कसा राहील यासाठी प्रयत्न करा.वरवर देखलेपण करून नाती बहरत नाहीत.आपल्या मुला मुलींमधे ते संस्कार रुजवा. एकमेकांचा आधार असतात आपली नाती.स्त्री पुरुष समानतेची कास धरून भावांनी देखील आपल्या बहिणीला ओवाळून मातृसत्ताक संस्कृतीला बळ देणं आवश्यक आहे.कारण बळीचे राज्य जे सिंधुसंस्कृतीचे प्रतीक आहे.आया बहिणींना सन्मान बळीराजाच्या राज्यात होता तसाच शिवराज्यात देखील होता.समानता ज्या बळीच्या राज्यस्त प्रस्थापित होती,त्या सुराज्य व स्वराज्याची श्रद्धेने जोपासना बहुजन स्त्रिया करीत आल्या आहेत.इडा पीडा टळो,बळीचे राज्य येवो ! आपल्या ह्या मौखिक मंगल कामनेने बळी हृदयात जतन करण्याचे महान कार्य बहुजन स्त्रियांनी केलं आहे.
माझ्या भगिनी आणि बांधवानो एकमेकांप्रती आपले प्रेम,आदर,विश्वास व्यक्त करण्याचे हे क्षण सणांच्या माध्यमातून जतन करण्याची परंपरा सर्वांना सुख व समाधान देवो ही कामना.
    ओवाळीते आज बहीण भावाला,पहाते त्यात राजा बळीला..सुख-समृद्धी चोहीकडे वाहूदे,
बळीसम कर्तृत्व अन शिव छत्रपतींचे औदार्य तुज लाभुदे..
स्वराज्य व सुराज्य हर अंगणात नांदू दे,
ईडा पीडा सर्व टळू दे,मज बळी राजाचे राज्य येवू दे !

   माझ्या सर्व वैचारिक बंधू भगिनींना भाऊ बीजेच्या वैचारिक शिवमय शुभेच्छा ! 

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन 



Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??