बलिप्रतिपदा..बळी पुजन..
बलिप्रतिपदा-बळी पुजन
"इडा पीडा टळो,बळीचे राज्य येवो"!
लहानपणी हे वाक्य कानावर पडत होत,पण त्याचा अर्थ कळत नव्हता.आया-बाया दिवाळीला घरातील पुरुषांना ओवाळताना हे आवर्जून म्हणत.ह्या इडेची पीडा टळून बळीचे सुराज्य व स्वराज्य खरंच यावं,हे बळीराजा कोण होता हे वाचल्यावर समजायला लागलं.तर आज बलिप्रतिपदा त्या निमित्ताने बळीराजा विषयी जाणून घेवूया.
बळीराजा हा असुर राजा होता.हिरण्याकश्यपूचा पणतू,प्रल्हादाचा नातू,विरोचनाचा पुत्र,बाणासुराचा पिता.बळीराजा भारतातील बहुजन समाजाचे एक महानायक,महासम्राट,महातत्ववेत्ता ! बहुजनांचा कुलस्वामी म्हणजे मूळ पुरुष,आपला पूर्वज.
पराक्रमी,कर्तृत्वान,विनयशील,चारित्र्यसंपन्न,दानशूर,
जाणता राजा..बळी !
बळी राजा मातृसत्ताक सिंधुसंस्कृती व कृषिप्रधान संस्कृतीचा पुरस्कृतकर्ता.बळी राजाच्या राज्यात स्त्रियांना सन्मान होता.शेती प्रति निष्ठा इतकी होती की आज देखील शेतकऱ्याला बळी राजा म्हणून संबोधलं जात.ज्याला जे पाहिजे ते देवून बळीराजा आपल्या प्रजेला संतुष्ट करत असत.असा हा बळीराजा संविभागी म्हणजे समप्रमाणे न्याय प्रदान करणारा समतावादी राजा होता.बळीचे राज्य नुसते स्वराज्य नव्हते तर सुराज्य देखील होते.
देवांना(विप्रांना)बळीचे हे दानशूर व संविभागी असणे पटत नव्हते.सर्व श्रेष्ठ मान हा वैदिकांना मिळावा हिचं त्यांची इच्छा होती.बळी राजा हा समतावादी असल्याने त्याला हे शक्य नव्हतं.म्हणून छळ,कपट करून बळीचे राज्य लुबाडण्याचे दुष्कृत्य वामनाने केले.विविध पुराणांच्या माध्यमातून बळीराजा असुर होता,परकीय होता,यज्ञकर्म करणाऱ्या वैदिकांचा छळ करत होता असं मनाला वाट्टेल ते भासवण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला.
तरी बळीराजाचे कर्तृत्व,कुशलता,मोठेपणा इत्यादी त्यांना पुसता आलं नाही.बळीराजाची प्रतिमा इतकी स्वच्छ होती की मनाविरुद्ध या विप्रांना त्याचे गुणगान गावे लागले.केवळ द्वेष आणि इंद्राला राज्य व वैभव देण्याच्या अट्टहासापायी देवांच्या विनंती खातर विष्णूने बटू वामन अवतार घेतला.बळीराजाचे राज्य,धन,धान्या,वैभव सगळं फसवून बळकावल.
सगळं लुबाडून मन तृप्त झालं नाही आणि बळीराजाला पाताळात धाडलं.ह्या वरून खरं कोण कपटी,क्रूर, निर्दयी,विषमतावादी होत हे सांगण्याची आवश्यकता नाही.
वामनाने बळीराजाला भिक्षा(भीक)मागितली.
बळी हा दानशूर होता तसाच दिल्या शब्दाला जागणारा.बळीच्या चांगुलपणाचा फायदा घेवून विप्रांनी त्याचे सर्वकाही लुबाडले.बळीराजा मोठा धीराचा होता.अनेक अत्याचार त्याच्यावर केले गेले पण बळीराजा वामनाला शरण आला नाही.म्हणून की काय बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून बळीराजाला पाताळात धाडलं,गाडलं,वध केला या शब्दात बदनामी पुराणांमध्ये आढळून येते.हा पाताळ कुठं असतो ? याचा अर्थ बळीराजाला मारून टाकलं असा होतो.
बळीराजाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बाणासुर,कपटी वामनाच्या सैन्यांवर चाल करून गेला.
बाणासुराच्या भीतीनेच वामन मरण पावला.
का व कसा तुम्हीच ठरवा.बटू जो अक्राळ विक्राळ रूप धारण करू शकतो आणि एका पाऊलात पृथ्वी व्यापू शकतो तो भीतीनेच गतप्राण झाला असेल तर तो कसला अवतार..वैदिकांनी इतिहासात वाट्टेल त्याने वाट्टेल ते मिथक मांडून भारतीयांचा मूळ इतिहास मलीन करण्याचा प्रवास खुप प्राचीन आहे हे यावरून समजून येत.पण आपण ह्या मिथकांवर विश्वास ठेवून हे कपटी अवतार पुजतो आणि जे आपले खरे पूर्वज आहेत त्यांना मात्र असुर,राक्षस,शत्रू,ई.म्हणून अपमानित करतो.
स्वतःचा मोठेपणा मिरवून विप्रांनी बळीराजाला क्रूर असुर म्हणून चित्रित केला.पण बळीराजाची प्रजा त्याला इतका सन्मान देत होती की त्या प्रजेने बळीराजाला आपल्या हृदयात कायमचे स्थान दिले.
दरवर्षी बळीराजा आपल्याला भेटायला येतो या श्रद्धेतून त्याची वाट पहातात.आपल्या राजाचे स्वागत आनंदाने करण्यासाठी ते सज्ज होतात.मनो भावे त्याची पुजा करतात.शेतकऱ्यांचा राजा बळी.
शेतात पिकलेलं धान्या,भाजीपाला,ऊस इत्यादी मांडून बळीराजाचे स्मरण करतात.फुल वाहून,दिवा ओवाळून बलिप्रतिमेच औक्षण करतात.बहुजन स्त्रिया घरातील पुरुषांना ओवाळून,"इडा पीडा टळो बळी राजाचे राज्य येवो" ही इच्छा व्यक्त करतात.बळीचे समतेचे राज्य पुन्हा प्रस्थापित होईल ही आस त्यांच्या मनी आहे.
बलिप्रतिपदेला बळी प्रति कृतज्ञता व्यक्त करताना कोणते ही अनावश्यक कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही.मुळात बळीराजा यज्ञ कर्म, पशुबळी,वैदिक कर्म पुरस्कार करता नव्हता.अर्थात तो विरोधक देखील नव्हता.तो संविभागी राजा असल्याने त्याच्या राज्यात सर्वांना समान न्याय होता. पण तो वैदिक परंपरां मानत नव्हता.यज्ञ,पशुबळी,ई.हा प्रपंच वैदिकांचा होता.विप्रांच्या मनात हा विरोध असून ते बळी प्रति सतत द्वेष निर्माण करत राहिले (महाभारत,रामायण,पद्मपुराण, वामनपुराण,ई. पुराणांमध्ये पुराणकारांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे.माहितीस्तव.)
आपल्या बऱ्याच पूर्वज आद्यपुरुष व गणमाता यांचे दैवीकरण झालेले आहे.शंकर,पार्वती,तुळजा, खंडोबा,म्हसोबा,भैरोबा,ई.आणि ज्यांचे दैवीकरण करायचे नव्हते त्यांना असुर म्हणून कलंकित केले.
महात्मा फुले यांनी आपल्या लेखनीतून ह्या वैदिकांचे पितळ उघड पाडलं आहे.बहुजन समाजाने आपण सगळे बळीराजाचे वारस आहोत हे लक्षात घ्यावं.बळी हा अवैदिक परंपरेचा एक महापुरुष होता.आपण व आपले सर्व दैवीकरण झालेले व बळी सारखे असुर राजे यांचे कपटीपणाने केलेले हनन सगळे सांस्कृतिक संघर्षाचा बळी ठरले आहेत.बळी राजाला वरुणाच्या पाशाने यपूला(खांब)बांधून यज्ञामध्ये आहुती दिल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे.बळीराजाला अशा प्रकारे मारल्या नंतर बळी दिला असा वाक्प्रकार रूढ झाल्याचं समजतं.
महाभारतातील शांतिपर्वात बळीराजा व इंद्र यांचा संवाद आहे.त्यात बळीराजाची पाताळात पाठवल्या नंतरची अवस्था काय असेल याची काल्पनिक मांडणी त्यातून केली आहे.इंद्र कुत्सितपणे बळीराजाला त्याची अवस्था काय झाली या विषयी व बरच काही बोलत असतो.यात दोन-तीन वाक्यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो,ती अशी इंद्र,"बळीला बुद्ध"म्हणून संबोधतो.दुसरं बळीला हिणवून बळीच राज्य काय काय झाल्यावर येईल याची यादी करतो.त्यात"जेव्हा चातुर्वर्ण्य मोडकळीस येईल तेव्हा बळीच राज्य येईल" हे इंद्राच्या तोंडी पुराणकारांनी घातलं आहे.तिसरं,जेव्हा बळीराजाला यपूला बांधून त्याच्यावर अत्याचार केले जात होते,विविध पद्धतीने वामन भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या परिस्थितीत देखील बळी राजा खचला नाही.सर्व स्थितीला धैर्याने सामोरं गेला.इंद्र आणि बळीच्या संवादातून हे पुन्हा समोर आलं.इंद्र बळीराजाला,"तुझी अचल आणि तत्वदर्शीनी बुद्धी खचत नाही" असं म्हणतो.यावरून आपला पूर्वज काय व कसा होता हे लक्षात घ्या.दयाळू,पराक्रमी,शूर,संकटांना धीरानं सामोरं जाणारा वीर बळी जो बुद्ध आहे.
जेव्हा जातपात संपुष्टात येईल तेव्हा बळीच राज्य येईल.बळीच्या राज्यात सगळी प्रजा एक संध होती. कोणता ही भेद नव्हता.म्हणून आपल्या आदर्श, सत्वशील,संविभागी बळीराजाचे राज्य यावं यासाठी बळीचे वारसांनी विचाराने एकत्र येण्याचा मार्ग शोधावा.
गोवर्धन पुजा-
खरं तर गोवर्धन पूजे विषयी इथं लिहायचं नव्हतं,पण बळीराजाच्या आयुष्यात ज्याच्या मुळे इतका द्वेष निर्माण झाला,ज्याला बळीचे सुराज्य व स्वराज्य खुपत होत,जो देवांचा देव म्हंटला जातो तो इंद्र हा किती सत्ता प्रिय होता हे समजून येईल.देवांना सत्ता प्रिय होती.त्यासाठी ते एकमेकांविरोधात देखील लढाया करत.वैदिकांच इंद्राविषयी वेड कमी झाल्यावर विष्णू अवतार पुढे केला व त्याचं दैवीकरण आपल्या माथी थोपवलं.कृष्ण हां विष्णुचाच ८वा अवतार म्हणून पसरवलं.गोवर्धन पर्वताविषयी गोष्ट आपल्याला माहीतच असेल.कसा इंद्राला गर्व झाला आणि कृष्णाने त्याचं गर्वहरण केलं.इंद्राला इथे अहंकारी म्हंटल आहे.इंद्राने सतत सात दिवस मुसळधार पाऊस पाडून ब्रिजवासीय जनतेला वेठीस धरलं होत.कृष्णाने करंगळीवर सात दिवस तो गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे इंद्राच्या प्रकोपातून रक्षण केले अशी ती गोष्ट आहे.इथं हे लिहिण्याचा त्रास यासाठी घेतला की ह्या गर्विष्ठ,सत्तेसाठी हपापलेला इंद्र त्याच्यासाठी ह्याच विष्णूचा ५व्या वामन अवताराने बळीराजाचे राज्य कपटाने बळकवलं होत.पुढे विष्णूचा आठवा अवतार कृष्ण आणि इंद्र असे एकमेकांना भिडतात.काय खरं काय खोटं ह्या पुराणकारांनाच माहिती.
अशा प्रकारे बळीराजाच्या मस्तकावर जे तिसरं पाऊल बटूने ठेवलं पुराणकारांनी दर्शवलं आहे म्हणजे बहुजन समाजाची मती कुंठित केली असा घ्यावा.
आज तागायत आपण अशा अवतार व मिथकांवर विश्वास ठेवून कोण आपलं कोण परकं ही ओळखच पुसून टाकली हे समजून घ्या.अर्थात विरोधाला विरोध करावा व सामाजिक तेढ निर्माण व्हावा ही हे मांडत असताना अजिबात अपेक्षा नाही.पण ज्या व्यवस्थेमूळ मानव मानवाचा बळी घेत आहे ते थांबून बदलायला पाहिजे.यातून महामानवांना अभिप्रेत असलेल्या मानवहीत जोपासणाऱ्या नवं समाजाची निर्मिती होवून बळीचे सुराज्य व स्वराज्य पुन्हा प्रस्थापित होईल.
चला तर मग कपटाने वार करून मारलेल्या आपल्या संविभागी,दयावान,विनयशील,सत्वशील,जाणता राजा बळीचे स्मरण करूया.
त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून नतमस्तक होवू.
बलिप्रतिपदेला एक दिवा बळीच्या नावाने लावू आणि 'इडा पीडा टळून,बळीचे राज्य येवो'ही इच्छा व्यक्त करू.बळीचे स्थान आपल्या हृदयात आणखीन बळकट करू.
ll जय बळी राजा ll
बलिप्रतिपदेच्या सर्वांना वैचारिक शुभेच्छा !
टीप-
1)महात्मा फुले यांचे गुलामदिरी व डॉ.आ.ह.साळुंखे यांचे बळीवंश या ग्रंथांच्या आधारे मांडणी केली आहे.संपूर्ण माहितीस्तव ते वाचावे.
2)सोबत बलीपूजन कस करावं याचा फोटो जोडत आहे.
3)बळी राजा विषयी माहिती व्हिडीओ सोबत लिंक पाठवत आहे.
https://youtu.be/qGXb-UXfEL4
https://youtu.be/CdmxzPDSInY
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment