जात,वर्णभेद मानवतेसाठी शाप !
जात,वर्णभेद मानवतेसाठी शाप !
मानव प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमान,म्हणून त्याने प्रगती केली.पण प्रगती करत असताना चांगल्या बरोबर वाईट देखील पेरत राहिला.या वाईटामध्ये सर्वात वाईट काय तर भेदाभेद.हा भेदाभेद मानवाला मानवापासून विलग करतो.जात,वर्ण,वंश,लिंग इत्यादी भेद हे मानवनिर्मित व्यवस्थेचा भक्कम पाया बनून सर्वत्र स्थिरावले आहेत.आज आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी कोणत्यातरी भेदाच्या आधारे मानव मानवापासून विलगीकरण प्रक्रियेत मग्न आहे.मानवाच्या विनाशाचे कारण मानवत बनला आहे.
पृथ्वीवर मानवता व्यतिरिक्त खरं तर कोणतीच
जात,वर्ण अथवा धर्म नाही. मानवाच्या अहंपणा मुळे मानव वंश संपुष्टात येण्याच्या मार्गावर निश्चितच आहे. आपल्यात विविधता असली तरी आपण सर्व मानवच आहोत हा विचार का होऊ नये.जातिभेद हा मृगजळाप्रमाणे आहे,दुरून जीवन असल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात मात्र जीवघेण.वर्णभेद मानवाच्या बाह्य अंगाच्या रंगाला अनुसरून केला जातो,पण प्रत्येक मानवाच्या रक्ताचा रंग लाल असतो,काळा किंवा पांढरा नाही हे मात्र विसरतो.मुळातच मानवाचे जीवन संघर्षमय असते आणि हे भेद अनावश्यक संघर्ष निर्माण करत राहतात.मानवाला जगण्याचा अधिकार आहे पण हे भेद ठरवू शकतात कोणाला किती व कसे आयुष्य मिळाव.तो मानव जातीय,वर्ण,वंश,लिंग इत्यादी भेदांच्या आधारे सक्षम आहे की नाही हे बघितल्या जात.मानवाच्या जीवनाचे मोल यामुळे कवडीमोल ठरले आहे.
भारतासारख्या विविधता,लोकशाही,धर्मनिरपेक्षता असल्यास देशामध्ये मुसलमान आपली देशाप्रती असलेली भक्ती आणि इतरांना(हिंदूंना)आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध करावी लागते.संविधानिक पदावर विराजमान असलेले लोक धर्मनिरपेक्षतेचे आपल्या स्वार्थासाठी वाभाडे काढताना सध्या आपल्याला दिसत आहे.हे रोखणं आवश्यक आहे.
वर्णभेद हा तर वेगळ्याच प्रकारे समाजात वावरताना दिसतो.गोरा रंग म्हणजे सौंदर्याचं प्रतीक मानल जात.खरंतर भारतीय लोकांना गहू वर्णीय म्हणून संबोधले जात.पण आज हा गोरा वर्ण आपल्यावर इतका हावी झाला आहे की तो शर्यतीचा विषय बनला आहे.या शर्यतीत कोट्यावधी लोक रोज आपल्या जीवनाशी खेळ खेळत आहेत.मानवाच्या आयुष्यापेक्षा त्याचा वर्ण जास्त मौल्यवान ठरवला जातोय.जाहिरातींमधून दाखवली जाणारी अतिशयोक्ती खऱ्या जीवनामध्ये कशी फायदेशीर आहे हे भासवण्याचा प्रयत्न सफल होतो खरा,पण प्रत्यक्ष जीवनात त्याचा काय परिणाम होतो हे मात्र दुर्लक्षित होत आहे.
ह्या भेदांद्वारे मानवाची एकमेकांप्रती मन इतकी कलुषित झाली आहेत की एकमेकांच्या जीवावर उठतात.प्रेमापेक्षा जातीयभेद जास्त महत्त्वाचा ठरवला गेला आहे.आपल्याकडे आजही अंतरजातीय विवाहातून घेतले जाणारे बळी एक मोठी समस्या आहे.नागनाथ मंजुळे यांचा सैराट चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला,पण डोक्यात कोण घेणार.
पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये आज देखील वर्णभेदातून दिवसाढवळ्या मुडदे पाडले जातात.भारतात गुजरात सारखे दंगे घडवण्यात जातीयवादी यशस्वी होतात.
ते यशस्वी होतात कारण ही भेदाची मुळं आपल्यात खोलवर रुजलेली आहेत.मुडदे पाडणारे हाथ तुमचे असतात पण मेंदू मात्र मानवता विरोधी असणारे समाजाचे ठेकेदार चालवत असतात.
आपल्याला माहिती आहे समाजसुधारक एका विशिष्ट जाती साठी लढा देत नसतात.ते संपूर्ण समाज हितासाठी संघर्ष करत असतात.समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत.त्या त्रुटी सुधारून समानतेचा मार्ग दाखवत समाजसुधारक कार्य करत असतात.पण ह्या बदलाच्या विरोधात असणारे प्रतिगामी या समाजसुधारकांनाच जातीयवादी ठरवून मोकळे होतात.यात सुद्धा दोषी आपणच.कारण महामानवांना आपण विविध रंगांच्या झेंड्याखाली,जातीमध्ये, विचारांमध्ये बांधून ठेवला आहे.वर्णव्यवस्था,जातीयवाद निर्माण करणारे अधिष्ठित आपल्या सोयीप्रमाणे त्यांचा गैरवापर करून आपल उच्च स्थान सिद्ध करण्यासाठी कटकारस्थान करत असतात.याला भूलणारे अथवा आपल्या स्वार्थासाठी लाळघोटेपणा करणाऱ्यांनी एक दिवस हे आपला पण नाश करतील याचा विचार का करत नाहीत.स्वार्थासाठी इतरांचा बळी घ्यायचा हा मानवताधर्म निश्चितच नाही.
मटक्यातील थंडगार पाणी प्यायला आवडणारे जातीय वादात अडकलेले असतात ही गम्मतच आहे. जात,वर्णांमध्ये जरी सगळे विभागले असले तरी सर्व मानवच आहेत व सगळ्यांना श्वास घ्यायला तीच हवा गरजेचे असते जी मला गरजेची आहे.मग भविष्यात एखाद्या मानवता विरोध्याकडून या हवेत सगळे श्वास घेतात म्हणून मी श्वास घेणार नाही असं ऐकायला मिळाले तर आश्चर्य करू नये.कोणाचा जन्म हा त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे ठरवून होत नसतो.मानव हा मानव म्हणून जन्म घेतो.पण मानव निर्मित व्यवस्थेचा बळी जन्म घेण्यापूर्वीच तो जीव होत असतो.जन्म दाखल्यावर जात लिहून त्याचं भविष्य ठरवलं जातं. सटवाई नशीब लिहिते असा आपल्याकडे प्रचलित आहे पण खरं तर ही व्यवस्था त्याचं नशीब ठरवत असते.
मानवता हाच खरा धर्म आणि प्रेम हाच खरा रंग जाणावा.समाजात वर्ण,जाती,वंश,लिंग इत्यादी भेदांना केवळ अमान्य करून शांत बसण पुरेसं नाही.कडवा विरोध करणे आवश्यक आहे.आपण ह्या सगळ्यापासून अंतर ठेवून राहू शकत नाही.मानव आहोत मानववाद स्वीकारण्यात हित आहे.हे भेद समाजाला एखाद्या रोगासारखे जखडून बसले आहेत.खोलपर्यंत ह्या भेदांद्वारे जखमा झाल्या आहेत.हळूहळू एकत्र येऊन या भेदांवर मात करणं आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने मानवहिताचे कार्य कराव.
मानव प्रगती करत आहे,पण ती प्रगती तंत्र स्वरूपाची आहे.प्रगती मानवतावादासाठी करण्यात यावी. माझ्यासाठी जात धर्म,वंश,वर्ण,लिंग,श्रीमंत-गरीब या सर्वांपेक्षा मानव महत्त्वाचा आहे.
मी मानवतावादी आहे.मी हिंदू अथवा मराठा म्हणून जन्माला आले आहे हा माझा मोठेपणा ही नाही व दोषही होवू शकत नाही.ती नोंद माझ्या जन्माआधीच ठरली होती.ह्या सर्व भेदांचा अंत करण्यासाठी त्याची मूळ शोधणं आवश्यक आहे व ती समाजापुढे मांडत रहाणं तेवढंच महत्वाचं.पण मी करत असलेल्या कार्याला विरोध दर्शविताना मी कशी चुकीची आहे माझ्या जातीचा दाखला देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो.पण मला त्याचा किंचितही फरक पडत नाही.हे त्यांचं मत आहे.त्यांच्या मताचा आदर आहे,पण त्यावर माझं कार्य,विचार अवलंबून नाही.मी कशी आहे हे देखील सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.असो ! पण कोणताही धर्म मानवते पेक्षा श्रेष्ठ नाही हे मात्र मान्य करावे लागेल.
मानवतेमधे विश्वास ठेवा.दया ही मानवतेची पहिली पायरी आहे.कर्तव्याची जाणीव,सद्सविवेकबुद्धी जागृत ठेवा.एका कोणत्या देशासाठी नाही तर समस्त मानवतेसाठी आपण एकता प्रस्थापित करून एकसंध होण्यासाठी उभ राहणं काळाची गरज आहे.मानव असणं म्हणजे मानवता नाही तर खर्या अर्थाने मानवी होणे म्हणजे मानवतावादी होणं आहे.भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देण,गरजवंताला मदत करण हे सर्व सगळ्या भेदांपलीकडे आहे.आपल्या सर्वांमध्ये मानवतावाद आहे.अनावश्यक बाबींच्या सततच्या माऱ्याने तो सुप्त अवस्थेत असेल.त्याला जागृत करा. पुढची येणारी पिढी ह्या सर्व भेदांना छेदून प्रगतीच्या योग्य मार्गावर धावण्यासाठी हा प्रयत्न आज अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचा आहे.जे या बदलाला विरोध करतील ते मानवतावादाचा विरोध करणारे आहेत हे समजून घ्याव.या विरोधाला शरण जाऊन भेदांना पाठिंबा दर्शवून मानवतेचा श्वास दाबू नका..
मानवता जिवंत आहे तो पर्यंत मानव जिवंत आहे !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment