नात्यांचा आठवणीतील गंध..
नात्यांचा आठवणीतील गंध
सतत दरवळत राहो..
कालपण,आजपण,उद्यापण..!
प्रिया आणि मनोहर,हेवा वाटावं असं प्रेमळ जोडपं.
लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली होती.अभय,त्यांचा मुलगा
८ वर्षांचा होता.प्रिया शिकलेली,पण मुलासाठी नोकरी सोडली आणि घरातून काही काम करू लागली.मनोहर एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता.
जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसा कामाचा व्याप ही वाढत होता.एके दिवशी मनोहरच्या ऑफिस मधून फोन आला. तातडीने ऑफिस जवळच्या दवाखान्यात या असा निरोप दिला.मनोहरला काही तरी झालं आहे हे प्रियाला समजलं.तिच्या भावाला फोन करून तिने दवाखान्यात बोलावून घेतलं.अभय तिच्या सोबत होता.मनोहरला हृदयविकाराचा झटका(heart attack)आल्याचे प्रियाला डॉक्टरांनी सांगितलं.प्रियाला धक्काच बसला ! काय करावं तिला समजेना.तिचा भाऊ तिच्या पाठोपाठ दवाखान्यात पोचला होता.वाट बघणं सोडून बाकी काहीच त्यांच्या हातात नव्हतं.साधारण २-३ तासाच्या उपचारानंतर डॉक्तरांनी मनोहर गेल्याची बातमी दिली. हृदय विकाराचा तीव्र झटका मनोहर सहन करू शकला नाही.प्रिया हे ऐकून सुन्न झाली.शरीरातला सगळा त्राण गेल्यासारखं तिला जाणवलं आणि ति कोसळली.
ती बराच वेळ बेशुद्धावस्थेत होती.शुद्धीवर आली तेव्हा अभय आजोबांच्या बाजूला बसून प्रियाकडे एकटक पाहत असलेला तिला दिसला.मनोहर गेल्याचं दुःख न भरून येणार होतं.पण अभयच काय ? जर मीच स्वतःला सावरलं नाही तर अभयला कोण सांभाळणार ?
काय काय प्रश्न तिच्या भोवती घिरट्या घालत असतील कोण जाणे.त्या क्षणी प्रियाचे सारे आयुष्यच बदलून गेले. प्रिया तशी धीटायची,पण मनोहरचं असं अचानक जाणं पचवणं अवघड होतं.अभयची जबाबदारी तिच्यावर होती. खचून चालणार नव्हतं.
वेळ भरभर धावत होती.अभय १० वर्षांचा झाला होता.मनोहरला जाऊन साधारण दीड ते दोन वर्ष लोटली होती.माहेर सासरची मंडळी प्रियाला दुसऱ्या लग्नाबाबत विचार कर सांगू लागले.पहिल्यांदा तिला ते ऐकून मेंदूत मुंग्या आल्यासारखं झालं.पण तिला माहित होतं सगळे तिच्या आणि अभयच्या काळजीपोटी बोलत होते.
प्रियाने अभयचा विचार प्रथम केला आणि दुसऱ्या लग्नास नकार दिला.प्रियाने परत काम करायला सुरुवात केली.अभय ही मोठा होत होता.जगाचे बरे वाईट अनुभव घेत प्रियाच संघर्षमय जीवन घड्याळाच्या काट्याप्रमाणे २४ तास बारा महिने फिरत होत.एकटी बाई,आई असे जीवन सुरू होते.अनेक कटू प्रसंगांना तोंड देत,मनोहरच्या आठवणीत आणि अभयच्या संगोपनात वर्षे कशी सरली प्रियाला कळलच नाही.जाणारा क्षण कधीतरी वाळू हातातुन निसटवी असा सहज निसटून जायचा तर कधी एक क्षण तप वाटायचा..
अभय कॉलेजला जाऊ लागला,तसं प्रियाची काळजी वाढू लागली.मनोहरच्या अकाली जाण्याने ती एकटी पडली होती.माणसांच्या घोळक्यात असलेल्या एकटेपणाने प्रिया त्रस्त होती.तिचा आधार अभय होता, त्यामुळे ती जगत होती.अभय पुढे बाहेर देशात शिक्षण घ्यायचं असे प्रियाला सांगू लागला.अभयच्या त्या वाक्याने प्रियाच्या मनात विचारांनी काहूर माजवल होत.लोक चर्चा करू लागले एकदा मुलं फॉरेनला गेली की परत येत नाहीत.नको पाठवू त्याला अमेरिकेला,इथं काय शिकता येत नाही का ? तुझा सगळा त्याग निरुपयोगी ठरला प्रिया.मनोहर तुला सोडून गेला आता अभय शिक्षणासाठी जाईल.तु पुन्हा एकटीच..असं काय काय मैत्रिणी, नातेवाईक,शेजारी बोलू लागले.प्रिया घाबरली.अभयच्या जाण्याला अजून बराच कालावधी होता.पण तिच्या डोक्यातील विचार चक्र तिला स्वस्थ बसू देईना.
एकदा प्रिया गॅलरीत बसली होती.तेव्हा तिला एक पाखरू आपल्या पिल्लाला चोचीने घास भरवताना दिसलं.प्रिया ते बघून भावनिक झाली.दुसर्या क्षणाला तिने विचार केला उद्या ते पिल्लू मोठे होईल त्याची आई त्याला पंख पसरून अवकाशात भरारी घ्यायला शिकवले.नंतर ते त्याचं नवं विश्व उभारेल.हा तर निसर्गाचा नियम आहे.मग माझ्या स्वार्थासाठी मी अभयच आयुष्य फुलवण्यापासून का रोखू ? हो,पण अभय परत आला नाही तर ? तिने अभय बरोबर बोलायचं ठरवलं.परदेशी काकू काका यांची दोन्ही मुले फॉरेनला जाऊन सेटल झाली आणि आता आपले आईबाप जिवंत की मेले हेदेखील डोकाऊन बघत नाही.अशी अवस्था आपली व्हायला नको हे प्रियाला सतत वाटत.तिने अभय बरोबर या विषयी बोलायचं ठरवलं.अभयला तिच्या भावना समजतं होत्या.तो शिक्षण घ्यायला जाणार आहे कायमच रहायला नाही.हे सांगून अभयने प्रियाला आश्वस्त केलं.
अखेर अभयचा परदेशात जाण्याचा दिवस उजाडला. आपले दुःख,काळजी,अश्रू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न प्रियाने केला.पण आई मी येतो असं अभय म्हणताच प्रियाचा बांध फुटला.मनोहर गेल्यानंतर प्रिया एवढी खचली नव्हती तेवढी आज वाटत होती.अभयने आपल्या आईला जवळ घेतलं व तिला शांत करत मी तुला सोडून कायमचा कसा राहील तूच सांग असं म्हणून तिचे अश्रू पुसू लागला.आज तिला तिचा छकुला पोक्त वाटला.तिने स्वतःला पुन्हा एकदा सावरलं.माझी काळजी करू नकोस असं प्रेमाने अभयच्या चेहऱ्यावर हात फिरवून मायेने तिने सांगितलं.दोघे एकमेकांना तेच समजावत होते.पुढची किमान पाच वर्षे अभय परदेशात जाणार होता.वर्षातून एकदा परत येणार होता,पण तोपर्यंत काय ?
अभय परदेशात पोहोचेपर्यंत प्रिया त्याच्या खोलीच्या सारख्या घिरट्या घालत होती.प्रियाची भावजय आणि नणंद तिच्याकडे दोन दिवस राहायला आल्या होत्या.त्या तिची घालमेल निहारत होत्या.प्रियाची परिस्थिती त्या जाणून होत्या.त्या तिचं मन इतर विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न करत,पण कशाचाच उपयोग होत नव्हता. थोडाफार वेळ कामात निघून गेला की प्रियाची पाऊले आपोआप अभयच्या खोलीकडे वळायची.दोन-चार दिवसांनी सारे आपापल्या घरी परतले.आता अभय परदेशात आणि प्रिया घरी एकटेच उरले.
प्रियाला घर खायला उठायचं.व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतल्याने जॉब हि नव्हता.मोकळी खोली,घर बघून प्रिया उदास व्हायची.हे नीट ठेव,तो पसारा करू नकोस,डबा व्यवस्थित खा.ह्या अशा सगळ्या सूचना ज्या ती अभयला लहानपणी द्यायची सगळ्या तिला आठवू लागल्या. एखादा विशिष्ट गंध आपल्याला एखाद्या वस्तू,पदार्थ, व्यक्तीची आठवण करून देतो.गंध हा आपल्या मेंदूचा ताबा घेतो आणि त्यात आपण हरवून जातो असं म्हणतात.पण प्रिया तर आठवणींच्या दरवळणाऱ्या गंधात इतकी हरवायची की तिला भास होतो की खरंच काही घडतय हे समजेना.नात्यांच्या आठवणींचा गंध प्रियाला कधी सुख तर कधी तीव्र वेदना देत.अगदी अभय लहान बाळ होतात त्या वेळचा गंध आठवणींच्या माध्यमातून प्रियाला यायचा.तिला सतत नॉस्टॅल्जीक वाटू लागलं. कधी स्वतःच बालपण,माहेर,आई-वडील,बहीण-भावंडं यांच्या आठवणीत ती गर्क व्हायची.नाती व भावना जपणं किती महत्त्वाचं असतं.कारण त्यांच्यांतून कधीही
न विरून जाणारा आठवणींचा ठेवा निर्माण होत असतो. माणसाने पैसा कितीही कमवला तरी सगळी सुखं पैसा विकत घेऊ शकतो का ? मुळीच नाही..त्यापलीकडे मायेने जपवणूक केलेली माणसं,नाती अनमोल ठरतात. गेलेला क्षण परत येत नाही.तो भरभरून जगायच असत. असे विचार प्रियाच्या मनात येवू लागलं.
सध्या प्रियाचं घर टापटीप असायचं.उगाचच आपण अभयला ओरडायचो स्वच्छ ठेव म्हणून,असं तिला वाटू लागलं.तो पसारा सुद्धा आपल्याला हवा हवासा वाटू लागतो.मानवाचं मन किती विचित्र असतं नाही.जवळ असलं की त्याची म्हणावी तेवढी जाण नसते आणि दूर गेलं की तेच हवं असं वाटू लागतं.अभयच्या भरलेल्या खोलीत,कपाटात आता दोन-चार कपडेच उरले होते. अभयला जाऊन काही महिने झाले होते,पण चादरीच्या सुरकुत्या अजून आहेत तशाच होत्या.प्रियाने त्याच्या गाडीवरची चादर पण बदलली नाही.इतरांना हा वेडेपणा वाटेल कदाचित,पण एकटेपणा काय असतो हे प्रिया सारख्या आई-बापाला विचारा.मग कळेल..दिवस कसाबसा सरत होता,पण रात्रीची उलघाल काही संपता संपत नव्हती.प्रियाला एकटं राहायचं दुःख नव्हतं पण एकटेपणा खुप जाणवतं होता.दिवसभराच्या गप्पा रात्री आपल्या माणसाबरोबर करणं किती महत्त्वाचं असतं हे एकटेपणात समजतं.अभय प्रियाला रोज फोन करायचा. पण प्रिया तिच्या भावना व्यक्त करत नव्हती.अखेर वर्ष ओलांडलं.सुट्टीला अभय घरी परतला.काय करू नि काय नको असं तिला झालेलं.वर्षभराचा सगळा शीण क्षणात गेला.पंधरा दिवसांनी अभय परतला.प्रिया पुन्हा त्या चक्रात अडकली.अभयला बघून हर्ष झाला होता पण तिच्या एकटेपणाचा इलाजही नव्हता.
प्रत्येक दिवस तिला हजारो सुया टोचत आहेत अशा वेदना होत होत्या.प्रिया अधून-मधून पलीकडच्या परदेशी काका-काकूंकडे जात-येत असत.त्यांच्या वेदनेपुढे आपल दुःख काहीच नाही,असं प्रियाला वाटायचं.वाचन,संगीत, मैत्रिणींबरोबर फिरणं यात हळूहळू प्रिया मन रमवू लागली.एकेदिवशी ती एक गोष्ट वाचत होती.कोणी लिहिली माहीत नाही,पण ती वाचून प्रिया भावनिक झाली.त्यात एक वयस्कर व्यक्ती आणि एक छोटा मुलगा यांचा संवाद होता.छोटा मुलगा त्या वृद्धाला त्याचे दुःख सांगत होता.त्याच्या हातून चमचा पडतो,तो कधीकधी चड्डीत शू करतो,वगैरे गोष्टींमधून तो मुलगा व्यक्त होत होता.ते आजोबा खूप वयस्कर होते.तो मुलगा काही म्हणाला किती मी पण असंच करतो,माझ्याबरोबर पण असंच होतं,अशी उत्तरे देत.पण अखेरीस तो छोटा मुलगा बोलला ते खूपच भावनिक होत.मोठी माणसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असं कळवळून तो मुलगा सांगत होता. तेवढ्यात सुरकुतलेल्या हातांचा कोमट स्पर्श त्या मुलाच्या हाताला होतो.त्या मुलाला काय म्हणायचं आहे हे त्या वृद्ध आजोबांना माहीत असतं.कारण बालपण आणि वृद्धपण सारखं असतं असं म्हणतात.आपल्याला आपले आई-वडील लहानाचे मोठे करतात.कसलाच कंटाळा ते कधीच करत नाहीत.मग ते म्हातारे झाल्यावर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतो ? हो पण काही मोठी माणस ही थोडी हेकेखोर असता.त्यांनी पण थोडा समजूतदारपणा दाखवणं गरजेचे आहे.प्रियाने आपल्या स्वार्थापोटी निश्चितच अभयला अडवलं नाही,पण भविष्यात अभयची जबाबदारी वाढली होती,हे देखील तितकंच महत्त्वाच.
प्रिया समजून चुकली की आपणही थोडं सावरणं गरजेच आहे.कारण अभयला आई हवी होती.वय वाढतं, पण हे वय वाढणं सुद्धा अहोभाग्य समजायचे. सगळ्यांच्या नशिबात नसतं वयस्कर होणं.
एकटेपणा आहे,पण आपण विस्मरणात तर गेलो नाही ना हा विचार प्रिया करू लागली.प्रियाने आपल्या एकटेपणावर मात करण्याचा मार्ग शोधला.परदेशी काका-काकू यांच्यासारखे लोक ज्यांना त्यांची मुलं पूर्णतः विसरून गेली आहेत त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण निर्माण आपण करायचा हे प्रियाने ठरवलं.दुसऱ्या क्षणी ती कामाला लागली.त्या पालकांचं पाल्यत्व प्रियाने स्वीकारलं.ती त्यांची कधी आई तर कधी स्वतः मूल व्हायची.अभयच्या नात्यातील आठवणींचा गंध दरवळत होता,पण त्याला नवीन नात्यांच्या जबाबदाऱ्यांच्या गंधाची झालर चढत होती.प्रियाला उमगलं होतं,आता तीच पिल्लू आभाळाला गवसणी घालत आहे.ते मोठ झालं आहे.ते परत घरी येईल.पण तोपर्यंत तिला वाट पाहायची होती.तिची नजर दाराकडे होती.पण मन इतरही कार्यात गुंतलं होतं.त्यामुळे वेदनेचा दाह नक्कीच कमी झाला होता.प्रिया एखाद्या बेटाप्रमाणे भासत होती. एकटी होती पण पूर्वी इतका एकटेपणा नव्हता.
तिला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलांचा व स्वतःचा सहवास लाभत होता.तिच्या पुढे अव्यक्त भावनांचा ताफा होता.जो अशक्यतेमुळे शक्य झाला होता.त्या भावनांना सुखी क्षणात परिवर्तित करण्याचे सामर्थ्य प्रियाने दाखवलं.शेवटी एकटे असलो तरी बलवान कसं व्हायचं हा पाठ प्रियाने धाडसाने गिरवला.
अभय शिक्षण घेऊन परतला.लग्न झालं.सून घरात आली.आता प्रिया नातवंडांमध्ये रमते.आपली वयोवृद्ध पालक-पाल्य यांच्यामध्ये देखील नात्यांच्या आठवणींचा गंध प्रिया निर्माण करत आहे.इतका एकटेपणा अनुभवून प्रिया थोडी हळवी झाली आहे.पण जगण्याची जिद्द तिने सोडली नाही.
अशा असंख्य प्रियांना सलाम !
वाचक मित्र-मैत्रिणींनो हा लेख लिहिण्यास कारण माझ्या एका वयाने ज्येष्ठ असणाऱ्या मैत्रीण व मार्गदर्शक, त्यांच्या सांगण्यावरून ह्याविषयी लिहिल आहे.त्यांचं नाव लिहिण्याची परवानगी घेतली नाही,म्हणून इथं तसा उल्लेख करत नाही.लेखामधील नावे,पात्र ही काल्पनिक आहेत.केवळ मानवी जीवनातील काही प्रसंग रेखाटता यावी म्हणून तो उल्लेख.प्रिया याऐवजी मनोहर का नाही किंवा दोघे का नाही असा प्रश्नही वाचकांना सतावेल.तरी प्रिया व मनोहर किंवा कोणी ही एक वाटत असल्यास त्यांनी तसे चित्र उभे करण्यास हरकत नाही.पण महत्त्वाचा मुद्दा लेखनाचा विषय आहे.
वयोवृद्ध पालकांना मुलं कायमचे एकटे सोडून दूर निघून जातात.आपल्याच घरात अथवा वृद्धाश्रमात ते शेवटच्या घटका एकटेपणात मोजत असतात.काही मुलं-मुली तर शेवटच्या क्षणात किंवा आई-वडील गेल्यावर देखील माघारी येत नाहीत.नात्यांच्या आठवणीतील गंध तेवढा काय तो शिल्लक उरतो.
ज्याच्या आधारे ते मायबाप जगत असतात.एक दिवस तरी आपली मुलं धावत आपल्याकडे येथील.लहानपणी सारखे आपल्या मिठीत,कुशीत शिरतील.ह्या वेड्या आशेवर कधी डोळे मिटतात कळत पण नसेल.
इथं दोन गोष्टी नमूद कराव्या वाटतात.
एक,आपली मुले लहान असताना छोटे-छोटे क्षण अनुभवा.जीवनाचा आनंद घ्या.आपल्या मुलांना मोठं होताना अनुभवा.प्रत्येक वळणावर त्यांच्या शक्य तितकं सोबत राहा.आपल त्यांच्याबरोबरच नातं घट्ट करा.मुले आपल्याला बघूनच अनुकरण करत असतात.
नात्यांचा आदर करायला मुलांना शिकवा.पुढे जाताना मागे राहिलेल्या व्यक्तींचा हात धरून त्यांना आपल्या सोबत घेऊन जायचं कृतीतून दाखवा.तस ते मोठे झाल्यावर तुमचा विचार करतील.दुसरी गोष्ट,मुलांनी देखील आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी सोसलेला ऊन,वारा,पाऊस याची जाणीव मनी धारावी.त्यांचा संघर्ष,प्रेम,काळजी आठवावी.आपल्या मुलांप्रमाणे वयोवृद्ध आईबापाला देखील संगोपनाची गरज आहे.
हे समजून घ्या.प्रिया धाडसी खंबीर होती,पण एकटेपणाची जाणीव आजही तिच्या अंगावर शहरे निर्माण करतात.
हल्ली टीव्हीत ती जाहिरात दाखवतात ना कोलगेटची,तशी या वयात ती एखादा जोडीदार शोधेल ही,पण त्या जोडीदाराची आवश्यकता केवळ मानसिक आधार एवढाच राहिल.समाज म्हणून आपण याकडे सकारात्मकतेने बघणं काळाची गरज आहे.काही वृद्धांना अनेकदा तरुणांनाही हे पटत नाही.कारण रूढी परंपरा यांचा इतका पगडा आपल्या विचारांवर बसला आहे,की लोक काय म्हणतील त्यामुळे आपण जीवन जगणंच विसरून जातो.आयुष्य नव्याने सुरु करण्यात काहीच हरकत नाही.एकटेपणाच दुःख आयुष्यभर माथी घेवून फिरण्यापेक्षा नात्यात विरून जाणं म्हणजे जीवन.शक्य तेवढी नाती जपण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.एकटेपणा कोणाचाही वेदनादायी असतो.एकटे असलो तरी एकटेपणा नको या साठी नात्यांच्या आठवणीतील गंध कायम दरवळत राहावा.सतत नवीन नवीन आठवणी निर्मित करत राहा.एकमेकांचा सहवास नाते वृद्धिंगत करतो.मानवी आयुष्य एकदाच आहे.ते जगण्याचा राजमार्ग नात्यांमध्ये दडला आहे.तो शोधला की नात्यांचा गंध चिरकाळ दरवळत राहील.
तुमच्या नंतर सुद्धा..
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
मस्त प्राची.. नात्यांचा गंध व सुगंध आपण घेतच पुढे जायला हवं हे खरं.. कोण कसे वागेल ? याची चिंता न करता.. आपला आनंद आपण शोधावा.. आपण आपल्याकडून नाती जपावीत फार विचार व त्रास न करता.. अशा अनेक प्रिया आहेत की ज्या आपले आयुष्य असे एकटेपणाने घालवतात, काहींना सुख मिळते तर काहींच्या वाटेला कायमचे एकाकीपण... आणि त्यासाठी आपण काही करू शकत नाही ही खंत मात्र मानत जाणवते... पण छान मुद्दा मांडलास.. अशीच लिहित रहा..
ReplyDeleteधन्यवाद ताई
Deleteप्राचीताई खूप समर्पक लिखान झाल आहें,
ReplyDeleteअत्यंत ज्वलंत प्रश्न अतिशय साध्या भाषेत मांडला आहे.
तुमच्यातील लेखक असाच बहरत राहो
खूप शुभेच्छा!!!
धन्यवाद ताई
Delete