महामानवांचे दैवीकरण
संपूर्ण लेख जाणीवपूर्वक बारकाईने वाचून मगच प्रतिक्रिया द्यावी..
याला बिनडोकपणा ऐसे नाव..
महामानवांची पूजा करायची, आरत्या गायच्या, मंदिरे बांधायची आणि आपल्या कर्तृत्वशाली इतिहासाची राख रांगोळी करायची... असले हे फुकटचे धंदे करणाऱ्यांना पोकळ बांबूने झोडपून काढलं पाहिजे.
अरे आपला इतिहास काय.. आपण करतोय काय?
हो, पण या बाजारबुणग्यांकडून अपेक्षा ती काय करावी..??!!
खरतर आपल्या हर एक कर्तुत्ववान पूर्वजाचा इतिहास आपण आपल्या हीन बुद्धीने पुसला. यात आर्यांना दोष देत बसण्यात काय धन्यता मानवी, जेव्हा आपलीच गिधाडं
आपलंच मांस जिवंतपणी ओरबाडतात !
जे आद्य पिता व माता शिव पार्वती यांच्या विषयी झालं, तेच आपण छत्रपतींच्या बाबतीत करत आहोत. आर्यांनी चुकीची वाट दाखवली खरी, परंतु ती वाट चिकित्सा न करता चालत रहायची, यात कसले शहाणपण आले? या विषयी मी नेहमी सांगत आले. आज पुन्हा ही मांडणी करत आहे.
महापुरुषांचे 'दैवीकरण' : कर्तृत्व पुसण्याचे एक पद्धतशीर षडयंत्र –
आज आपल्या समाजातील एक भीषण वास्तव म्हणजे महापुरुषांच्या विचारांपेक्षा त्यांच्या कर्मकांडाला आलेले महत्त्व. ज्या महामानवांनी रक्ताचे पाणी करून, बुद्धीच्या जोरावर इतिहास घडवला, त्यांच्याच इतिहासाची आज आपण 'राख-रांगोळी' करत आहोत. हे सर्व अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने 'आध्यात्मिक कंगोरे' जोडून केले जात आहे. या प्रक्रियेचे विश्लेषण खालील मुद्द्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे..
१. संघर्षापेक्षा चमत्काराला महत्त्व:
जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला 'दैवी अवतार' म्हणून मिरवतो, तेव्हा नकळतपणे आपण त्यांचे कष्ट, त्यांचे युद्धकौशल्य आणि त्यांचे अफाट प्रशासन कौशल्य नाकारतो. "हे तर देवाचेच रूप होते" असे म्हटल्यावर, त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या नियोजनाला न जाता 'चमत्काराला' दिले जाते. हे महाराजांचे कर्तृत्व झाकण्याचे पहिले पाऊल आहे.
२. चिकित्सेची हत्या आणि अंधभक्तीचा उदय:
इतिहास हा अभ्यासाचा आणि चिकित्सेचा विषय आहे, केवळ आरत्या गाण्याचा नाही. "आर्यांनी चुकीची वाट दाखवली" असा आरोप आपण करतो, पण तीच वाट न तपासता चालत राहण्यात आनंद मानने म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मंदिरे बांधून आणि उदो-उदो करून आपण महापुरुषांना लोकांच्या मेंदूपासून दूर करून केवळ भावनेच्या कप्प्यात बंदिस्त करत आहोत. चिकित्सा थांबली की बाजारबुणग्यांचे फावते आणि इतिहासाचे बाजारीकरण सुरू होते.
३. जिवंत विचारांची राख-रांगोळी:
शिव-पार्वती असोत वा छत्रपती, त्यांना कर्मकांडाच्या चौकटीत अडकवणे ही एक 'हीन बुद्धी'ची चाल आहे. स्वतःची गिधाडवृत्ती जपण्यासाठी महापुरुषांच्या नावावर पोकळ अस्मिता जागवली जाते. यामुळे महाराजांची स्त्रीविषयक सन्मानजनक दृष्टी, त्यांचे जलव्यवस्थापन, शेती व शेतकऱ्यानं विषयाचे धोरण, जातीभेदमुक्त स्वराज्याची संकल्पना, इत्यादी मुद्दे मागे पडतात आणि उरते ती फक्त पोकळ घोषणाबाजी आणि सत्तापिपासुंचे नितीमत्ता शून्य राजकारण..
४. दैवी अवतार की लोकोत्तर माणूस?
महापुरुषांना देवाच्या गाभाऱ्यात नेऊन बसवणे, हे त्यांना सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर नेण्याचे षडयंत्र आहे. जर ते देव असतील, तर त्यांचे अनुकरण करणे सामान्यांना शक्य नाही, हा विचार जनमानसात रुजवला जातो. परिणामी, समाज त्यांना आदर्श मानण्याऐवजी केवळ त्यांची पूजा करण्यात धन्यता मानतो.
या सर्व बाबींचा निष्कर्ष काय निघतो तर,
आपल्याच पूर्वजांचा इतिहास आपल्याच हाताने पुसला जाणे, यासारखा दुसरा बिनडोकपणा नाही. जोपर्यंत आपण महापुरुषांना 'चमत्कारी अवतार' मानण्याऐवजी 'कर्तृत्ववान माणूस' म्हणून स्वीकारून आत्मसात करत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्या खऱ्या इतिहासाला न्याय देऊ शकणार नाही. आरत्या आणि मंदिरांपेक्षा त्यांच्या विचारांची कृतीत अंमलबजावणी हीच खरी मानवंदना ठरेल.
बघा थोडक्यात नेहमीप्रमाणे सत्य, चिकित्सकपणे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समजलं तर ठीक. नाहीतर वाजवा टाळ्या–थाळ्या आणि आपल्याच गोतास काळ होण्याची चोख भूमिका पार पाडतं रहा..
मी मात्र तुमचे हे बिनबुडाचे हीन प्रयत्न मुळापासून उखडून टाकण्याचे माझे प्रयत्न करत राहील..
प्राची
महामानवांची वैचारिक कृतिशील वारसदार
Comments
Post a Comment