ज्योतिबा

आज ११ एप्रिल, 
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती/जन्मोत्सव 🙏🚩
 
ज्योतिबा आज तुम्ही समोर असता तर प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी  व्यक्त झाले असते. तरी, आपल्याला स्मरून व्यक्त होते.
   दिवसागणिक ज्योतिबा तुमचे विचार व कार्य मेंदू आणिक मनात दृढ होत आहेत. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या पथावर घेवून येण्याचे अशक्य प्रयत्न आपण पूर्वत्वाला घेवून गेलात. आता त्यातून तुमचे पाईक म्हणून अनेकांनी आपले सवते सुभे मांडले आहेत. आम्ही कसे फुल्यांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असं असलं तरी तुमचे विचार मात्र त्यांच्या कृतीतून केव्हाच हद्दपार झाले आहेत. 
  ज्योतिबा तुम्ही आम्हा बहुजन वंचितांना बोटाला धरून शाळेत घेवून गेलात. अक्षर ओळख शिकता शिकता कधी मानव म्हणून आमची ओळख होवू लागली समजलंच नाही. थोडी बहुत समाजात आमची विचारणा होवू लागली. घराचा उंबरठा ओलांडून गगनभरारी घेवू लागलों. ज्योतिबा तुम्ही तुमच्या सावित्रीबरोबर कोट्यवधी सावित्रीच्या लेकींचे अस्तित्व निर्माण केले. 
खोट्या व अनावश्यक रूढी परंपरेच्या भयातून मुक्ती देत आम्हा बौद्धिक बळाद्वारे अंगी ही बळ दिले.
  पण ज्योतिबा आज पुन्हा माझ्या अस्तित्वावर घाला घातला जात आहे. आश्चर्य म्हणजे स्वतःला तुझे, महामानवांचे पाईक म्हणवून घेणारे ही यात सामील आहेत. हे सगळे सनातनी, मनुवाद्यांच्या टोळीत राहून आपल्याच घराला खिंडार पाडत आहेत. हे यांना माहीत नाही, समजतं नाही असं नाही हा.. यांचे सत्ता आणि स्वार्थ यांना वरवर प्रागतिक परंतु मुळापासून प्रतिगामी कृत्य करण्यासाठी पूरक ठरतात. विचार तुमचे सत्यशोधकी, परंतु कृती मात्र संघी मनुची. नेहमी जे उदाहरणं मी देते तेच पुन्हा सांगते. आम्हाला अक्षर ओळख झाली ती तुम्हा फुले दांपत्यामुळे. पुण्यात भिडे वाड्यात भारतातील पहिली एतउद्देशीय मुलींची शाळा तुम्ही उभी केली. ६ विध्यार्थिनींपासून सुरु झालेली शाळा आज कोट्यवधींची संख्या पार करून केव्हाच गगनाला भिडली. परंतु, ज्योतिबा आता तुमच्या या ज्ञान मंदिराकडे पाठ करून हाती पुस्तकं घेवून मुली-महिला समोर असलेल्या त्या गणपतीची स्तुती गातात. तुम्ही नष्ट केलेल्या अनावश्यक रूढी-परंपरा, संस्कृतीच्या नावाखालील गुलामगिरी सारं काही पुन्हा उफाळून येत आहे बरं ! 
   असं नाही की तुमचे सत्यशोधकी विचार संपले आहेत. अनेक आहेत जे तुमचे खरे वैचारिक कृतिशील वारस होवून समाजात या दुष्ट प्रवृत्तींबरोबर दोन हात करतं आहेत. पण ज्योतिबा तुमची उणीव जाणवते. जेव्हा काहीच मार्ग नव्हता तेव्हा तुम्ही एक नवी दिशाच निर्माण केली. आज मार्ग आहेत, दिशा आहे परंतु या सत्याच्या वाटेवर कोणालाच चालायचं नाही. तुमचं नाव पाहिजे पण तुम्ही नको ! अशी गत झाली आहे. असच, इतर सर्व महामानवांबाबत ही होत आहे. 
  मी मात्र तुमच्या सत्यशोधकी मार्गावर चालत आहे. कधी असतात दोन-चार माझ्यासारखे वेडे, काही अधिक प्रगल्भ ही भेटतात या वाटेवर. मात्र बऱ्याचदा एकटीच भासते. कधी तरी पुढे मार्ग दिसेनासा होतो. भीती वाटते.
आपण भरकटलो, चुकलो तर ! तेव्हा ज्योतिबा तुमचे बोटं धरून वाट शोधत पुढे चालते. तुम्ही सोबत आहात या विचारानेच अंगी १० हत्तीचं बळ येत. अंधारात ही नवी वाट स्पष्ट दिसू लागते. या वेळेस मला ज्योतिबाची नव्याने ओळख होते. तशीच माझी ही ओळख दृढ होते. स्वतःमध्ये ज्योतिबा सापडले की बदल, परिवर्तन घडणारचं. तुम्ही आज ही आहात. सत्याच्या वाटेवर  आहात, समाजाच्या सकारात्मक प्रगतीमध्ये आहात, इतिहासात तर आहातच परंतु माझ्या अस्तित्वात ही ज्योतिबा आपण आहात. 
    अशा या माझ्या क्रांतिसूर्य ज्योतीबांनी पेटविलेल्या क्रांतीची मशाल हाती घेवून सत्याच्या मार्गावर चालत राहील. सत्यशोधकाचा वारसा कृतीनं जोपासले. 
येणाऱ्या पिढीला त्यावर चालण्याचे धडे व बळ देईन. 
हेच माझे अभिवादन ज्योतिबा तुम्हाला वाहीन 🙏🚩

जय क्रांती 
जय ज्योती 
सत्य की जय हो l 

- प्राची

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??