१ मे महाराष्ट्र दिन
१ मे महाराष्ट्र दिन !
लेख गेल्या वर्षीचाच आहे.त्यात दोन चार वाक्य महाराष्ट्राची आजची स्थिती दर्शवणारे जोडले आहेत.
परंतु आशयातील गाभा मात्र बदललेला नाही.आज ही महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.तो प्रयत्न रोखला पाहिजे.का? त्यासाठी हा लेख आवर्जून वाचा.
१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन.
आजच्या दिवशी १९६० साली स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती.पण या मागचा इतिहास फार संघर्षाचा आहे.राज्य पुनर्रचना आयोगाने त्यावेळी (१९५६)महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले.महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक मराठी माणूस या निर्णयाने क्रोधित झाला होता.अनेक ठिकाणी,विविध पद्धतीने सरकार विरोधात निषेध व्यक्त केला जात होता.संगठीत कामगारांचा असाच एक भव्य मोर्चा २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन परिसरात जमला होता. सरकार विरुद्ध घोषणा व निषेध व्यक्त होत होते.
पोलीसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव टाकला जात होता.आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
एवढं होऊन देखील कामगारांचा मोर्चा आपल्या भूमिकेवर अटळ होता.महाराष्ट्र द्वेषी तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश पोलिसांना दिला.यातच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांचे या मातीत रक्त सांडले.
या घटनेच्या साडेतीन वर्षानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.पण,त्यासाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले.आज ६२ वर्षे झाली आहेत,संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन.पण,आज देखील काही महाराष्ट्र द्रोही,द्वेषी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ करून गुजरातला जोडण्याचे दिवा स्वप्न पाहतात. त्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात.राजकारण केलं जातं.मोठमोठे उद्योग,व्यवसाय,इत्यादी मुंबईतून गुजरात व अन्य राज्यात स्थलांतरित केले जातात.आपण मात्र मूग गिळून गप्प बसतो आणि याकडे उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष करतो.या स्थलांतरामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले.मुंबईच(महाराष्ट्राच)महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी करण्याचे हे खेळ आहेत.
कोव्हीड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या बाबत दुजाभाव केला जातो.का? तर केंद्रात सत्तेत असलेले मोदी हे गुजरातचे,भाजपचे व आरएसएसच्या विचारांचे आहेत,जे मोरारजी देसाई प्रमाणे महाराष्ट्रद्वेषी आहेत.महाराष्ट्राने नेहमीच इतर राज्यांप्रति मोठ्या भावाची भूमिका पार पाडली आहे.पण काही मूठभर राज्यकर्ते आपल्या हव्यासापायी महाराष्ट्राचे तुकडे करू पहात आहेत.त्यात वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे एक.अशा असंख्य बाबी आहेत,ज्यातून महाराष्ट्र उध्वस्त करण्याचे मनसुबे आखले जातात.सतत अस्थिरता निर्माण केली जाते.देव-धर्म,जात-पात असे विषय घेवून भेदाभेद,विषमता,द्वेष पसरवण्याचे.महाराष्ट्रात अराजकता माजवण्यासाठीचे खेळ खेळले जातात.
त्याला विरोध करा.आपल्या सांविधानिक मूल्यांवर तटस्थ रहा.जे आपल्याला स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता प्रदान करतात.
बंधू-भगिनींनो हे राष्ट्र सगळ्या राज्यांच्या एकोप्याने उभ आहे.यात सीमावाद व अंतर्गत कलह निर्माण करून राष्ट्राची विभागणी करायला ही मानसिक विकृती पुढे मागे बघत नाही.पण ज्या कारणासाठी आपल्या हुतात्म्यांनी आपलं रक्त या मातीत सांडले आहे,त्याला मलिन करण्याचे,नष्ट करण्याचे काम जे कोणी करत असतील त्याला आपण विरोध केलाच पाहिजे.ज्या हुतात्म्यांनी या मातीत आपले रुधिर सांडले,ही माती पवित्र व महान केली.राज्य असून देखील महाराष्ट्र झाला.त्याचे मोल करणे अशक्य आहे.त्यांचे बलिदान वाया जाऊ नये,असं जर वाटत असेल तर महाराष्ट्र द्वेषाचे राजकारण वेळीच ओळखा व त्याला विरोध करा.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढलेले,हुतात्मा गेलेले आपल्याला छत्रपती शिवरायांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा रुबाबदार असा पुरोगामी महाराष्ट्र बहाल करून गेले आहेत.त्याची शान राखणं आता आपल्या हातात आहे.१मे शासकीय सुट्टी म्हणून केवळ साजरी करू नका.या दिवसाचं महत्त्व समजून घ्या.त्यामागचा संघर्ष,बलिदान,इतिहास जाणून घ्या.महाराष्ट्र द्वेषातून होणारे राजकारण ओळखा आणि आता तरी जागृत व्हा.कोणाला इजा करायची म्हणून नाही,पण आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज व्हा.कारण जबाबदारी महाराष्ट्राची आहे, राज्यालाच नाही तर राष्ट्राला एकसंध ठेवण्याची.
भूमीत ह्या जन्म माझा जाहला,
धन्य धन्य हे जीवन...
देह हा माझ्या महाराष्ट्राच्या कामी आला !
संत,वीर माता,शूर राजे जन्मले ह्या मातीत,
जान त्यांच्या पराकमाची,परम कर्तव्य आपले
असो हे मतीत !!
लोकशाही जिंदाबाद !
जय महाराष्ट्र
जय भारत
प्राची दुधाने
वारसा सोशल फाउंडेशन
Comments
Post a Comment