ओळख माझ्या माय मराठीची
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्त मराठी भाषा संवर्धन समिती आयोजित कार्यक्रमातील माझ्या व्याख्यानातील काही मुद्दे 🙏
*ओळख माझ्या माय मराठीची*
निसर्गाने उपजतच स्त्रीला मातृत्व बहाल केलं आहे.ज्या क्षणाला आपण आईच्या उदरामध्ये विसावते, तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपले आपल्या आईबरोबरचे नाते घट्ट असते.
मायेची सर माझ्या कशालाच नाही,
जाणते भावना माझ्या अन सारं काही.. असच काहीस आपल्या मातृ भाषेचं,माय मराठीच आहे.आपले भाव विश्व तिच्या विना अपुरे आहेत.
इतका गोडवा आणि प्रगल्भता आपल्या या भाषेत आहे.आपली ही मराठी भाषा बोली भाषेच्या माध्यमातून ५०-५१ प्रकारे बोलल्या जाते.पुणेरी,कोकणी,कोल्हापुरी, वर्हाडी,इत्यादी.आपल्या एका भाषेत इतकी विविधता तरी तिचा गोडवा तितकाच.नशीबवान आहोत आपण या मराठी मातीत जन्मलो.
मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगू नका. तिला कमी समजून तिचा अवमान करू नका.आपल्याला ज्ञानेश्वराची, तुकारामाची,जनाबाईची,बहिणाबाईंची अशा असंख्य संतांची मराठी लाभली आहे.तिचा आदर करा.अभिमान बाळगा !
इतर कोणती ही भाषा शिका.बंधन नाही.जागतिकीकरण होताना हे जमलंच पाहिजे.पण,हे करताना आपल्या मातृ भाषेला विसरू नका.
मराठी भाषा एकमेकांना कशी येत नाही हे टोमणे मारण्यापेक्षा, "एकमेकास करू सहाय्य,अवघाची धरू सुपंथ" या तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळींना साजेशी कृती करू.मराठी भाषा शिकतं राहू, शिकवत राहू.इतर भाषा ज्याप्रमाणे अभ्यासल्या जातात,त्यांचा प्रचार- प्रसार होतो आपली माय मराठी देखील जगाच्या पाठीवर शिकवली जावी,अभ्यासली जावी ही इच्छा आहे.आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावा.साहित्याचा भांडार आपल्या मराठीचा ठेवा स्वरूपात उपलब्ध आहे.तो आत्मसात करावा.
इंग्रजी माध्यमात मुलं सुरुवातीपासून इंग्रजी अक्षर ओळख शिकतात.पण मराठी अक्षर ओळख मात्र ३ वर्ष लांबवली जाते.पालकांनी पुढाकार घ्यावा.आपल्या मुलांना आपल्या मराठीची ओळख आपणहून करून द्यावी.शिक्षकांना विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देत रहावं.वाचन संस्कृती कमी होत चाली आहे.लिहिण्याची सवय कमी झाली आहे.भारतातील २५% ग्रंथालय एकट्या महाराष्ट्रात आहेत.त्याचा उपयोग व्हावा.
आपणच रोजच्या व्यवहारात मराठी भाषा बोलण्याचे टाळतो. हॉटेल, दुकान,फळवाला,भाजीवाला,
इस्त्रीवाला,दवाखाना,मेडिकल कुठें ही गेलो की नसत्या सवयीप्रमाणे हिंदी,इंग्रजीतील तत्वज्ञान आपण झाडतो.आपणच आपल्या माय मराठीला दुय्य्म किंवा त्याहून खालच्या स्थरावर न्हेवून ठेवतो.
इतर भाषा शिका पण आपल्या मराठी भाषेचा सन्मान राखा.खुप यश संपादन करा.आपल्या मराठी भाषेची आपल्याबरोबर असलेली विण मात्र घट्ट ठेवा.
आपण कधी व का मराठी भाषा दिन साजरा करतो या पेक्षा जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या माय माऊली मराठी भाषेला न्याय देवू तोच खरा आपला भाषा दिन !
आयोजकांचे विशेष आभार 🙏
-प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment