राष्ट्र संत गाडगे बाबा जयंती निमित्ताने..
या पोस्टच्या माध्यमातून कोणाच्या धार्मिक,दैविक अशा श्रद्धेच्या नावाखाली अनेक गोंजारून ठेवलेल्या भावना दुखावणं हा हेतू नाही,अस मी अजिबात म्हणणार नाही.कारणं विषयच असा आहे.मी बोलले की आग पाखड होणार आणि ते झोबणार..so,आवश्यक असेल तर बर्नोल वगेरे जवळ ठेवा.
आज २३ फेब्रुवारी,राष्ट्रसंत गाडगे महाराज(बाबा) यांची जयंती.जयंती बरं का ! ज्या गाडगे बाबांनी आपली सबंद हयात तुम्हाला शहाणं करण्यासाठी घालवली.
"बाबांनो देव दगडात नाही,तो माणसात आहे."
"देव मानव निर्मित आहे".
"देव कार्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षण/शाळा यावर खर्च करा". हे बाबांचे विचार.
कोरोनामुळे जी स्वच्छतेची अतीव काळजी आपण घेत आहोत,त्या स्वच्छतेविषयी बाबांनी समाज जागृतीचे वैचारिक कृतिशील कार्य केले याबद्दल सर्वांना माहीत आहे.दिवसभर स्वच्छता करायची आणि संध्याकाळी कीर्तनातून चार हिताच्या गोष्टी लोकांना बाबा सांगयचे.
ते विज्ञान निष्ठ होते.उदाहरण देवून आपल्या प्रबोधनपर कीर्तनातून बाबांनी जिवतोडून मानवातील अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न केले.पण,बाबा आम्ही करंटे निघालो ! हेच सत्य आहे. तुम्ही आमच्या हितासाठी संपूर्ण जीवन व्यथित केलंत.अगदी निस्वार्थीपणे.
समाजातील विषमता,अस्पृश्यता,अज्ञान,अनिष्ठ रूढी परंपरा,इत्यादी प्रतिगामी विचारांना तिलांजली देण्यासाठी बाबा कार्यरत राहिले.बाबा तुमचे द्रष्टेपण आम्ही समजू शकलो नाही.म्हणून तर आज तुमच्या विचारांनाच तिलांजली देण्याचे कार्य समाजात होताना दिसत आहे.तुम्हाला अभिप्रेत असलेले विचार व कार्य होत तर नाही.पण,उलट तुमचं नाव घेवून दैववाद,धर्मवाद इत्यादी प्रचार,प्रसार करणं अगदी नेटानं सुरु आहे.
मागे काही महिन्यांपूर्वी मी सत्यनारायण या विषयी व्हिडीओ केला होता.त्यात बाबांच्या विचारांची मांडणी केली होती.तेव्हा मला काही फोन आले होते.त्यांचं म्हणणं होत,मुंबईमधे गाडगे बाबांनी एक इमारत लोककल्याणासाठी उभी केली होती.आज ही ती आहे.(नक्की कोणती इमारत हे मला लक्षात नाही.कोणाला अधिक माहिती असल्यास कळवावे)पण,तिथे रोज मारुतीची आरती होत आहे.आज बाबा असते तर हातातील काठीनं बडवून काढलं असतं सगळ्यांना.
पण ते नाहीत म्हणून आपण अस काही करावं का? किमान त्यांनी उभ्या केलेल्या वास्तूत तरी त्यांचे विचार चिरडले जावू नयेत.पण,फरक कोणाला पडतो !
संत,महानायक,महानायिका डोक्यावर घेवून मिरवायचे.पण डोक्यात घ्यायचे नाहीत.डोक्यात घेतले असते तर आज कुठून तरी प्रकट झालेल्या गजानन महाराजाचा फोटो बाबांबरोबर घेण्याचे व एकत्र साजरीकरण करण्याचे साहस आमचे झाले नसते.
हे महाराज जन्माला येत नाहीत.ते डायरेक्ट प्रकट होतात.विज्ञानाच्या शोधाला,निर्मिती प्रक्रियेला पार सपशेल डायनोसर लावतात.तरी ते आमचे विधाते होतात.अन बाबा,तुम्ही मात्र परके होता.खरं तर तुमचे विचार अशा कृतीतून नाकारून आम्ही पोरके होतो.पण,हे समजायची बुद्धीच शिल्लक राहिली नाही ओ बाबा आमच्यात.विज्ञानाचा वापर करून जगणं सुधारलं असेल,पण जीवन व्यर्थच ठरतंय.बाबा तुम्ही आम्हाला माफ कराल याची खात्री आहे.पण,तुमच्या मनात आमच्या विषयी काळजी ही तितकीच असेल.अजून काही लोक आहेत जे तुमच्या विचाराने कृती करत आहेत.तुम्ही फार काळजी करू नका.
आम्ही इतक्यात हार मानणार नाही.यांनी प्रयत्ना अंती परमेश्वर दाखवला."आम्ही प्रयत्ना अंती परिवर्तन" दाखवू.लढत राहू.माणसांच्या मेंदूतील अस्वच्छता दूर करत राहू.तुमचे विचार पेरत राहू.आणि हो,सर्वात महत्वाचं.तुमचं दैवीकरण होवू देणारं नाही.हे ठामपणे सांगते.तुम्ही निश्चिन्त रहा.कोणा प्रकट झालेल्या इसमाबरोबर तुमची बरोबरी होवूच शकत नाही हे अबाधित सत्य आहे.
या सर्वातून वैचारिक वारस म्हणवणाऱयांना व इतरांना ही काही समजलं तर ठीक.नाही तर पालथ्या घड्यावर गोमूत्र..अस होईल !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
आम्ही प्रयत्नांती परिवर्तन दाखवू... खूप आवडलं.. मस्त!
ReplyDeleteधन्यवाद
Delete