हिजाबच्या माध्यमातून(आडून)नक्की काय विचार पेरले जात आहेत??
हिजाबच्या माध्यमातून(आडून)नक्की काय विचार पेरले जात आहेत??
मला वाटतं मुळात हिजाब,घुंगट,डोक्यावर पदर,वगेरे हे सगळे धार्मिक,सांस्कृतिक,पुरुषी,स्त्री पूर्वग्रहदूषित मानसिकतेचे प्रतीक आहे.यातून स्त्रिया बाहेर पडण्यासाठी लढा देत आहेत.धर्माचे,संस्कृतीचे स्वयंघोषित ठेकेदार या ना त्या मार्गाने त्यांना अडवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असतात.तरी स्त्रीया आपल्या स्वातंत्र्य,हक्क,अधिकारासाठी सर्वोत्परीने लढत आहे.
पण,हिजाबच्या आडून त्याला ज्या प्रकारे आज प्रदर्शित केल्या जात आहे ते स्त्रियांच्या या भूमिकेच्या अगदी विरुद्धाचे आहे.आज स्त्रिया हा आमचा धार्मिक पेहराव आहे.आम्ही तो का घालू नये ? अस म्हणताना दिसत आहेत.दुसरीकडे हा एका विशिष्ठ धर्माचा पेहराव आहे म्हणून तो नाकारत असल्याचे व त्यावर विकृत मनोवादी पद्धतीने कृती होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.या दोन्ही बाबी धार्मिक तेढ तर निर्माण करत आहेतच.पण त्याचं सोबत अनेक वर्षांची जी पुरुषी मानसिकतेच्या विरुद्धच्या लढ्याची,असंख्य स्त्रीवादी भूमिका प्रत्यक्षात मांडणाऱयांनी घेतली आहे तीच काय ?
या ना त्या मार्गाने या धार्मिक संकोचित अनावश्यक रूढी परंपरा आपल्यावर(स्त्रियांवर)असे जाळं फेकून लादल्या जात आहेत का ? होय ! हे असच होत आहे.म्हणजे काय तर,अस ही स्त्रीच वाटोळं आणि तस ही तिचंच वाटोळं.
नेहमी आपला स्वार्थ विविध क्षेत्रांमध्ये साध्य करण्याकरिता स्त्रियांचा वापर केला जातो.हो वापरच !
कारणं स्त्रीचं स्त्रीत्व तीच असतंचं कुठं ? ते तिच्या बापाचं,भावाचं,नवऱ्याचं,कुटुंबाचं,समाजाचं,जातीच, धर्माचं,संस्कृतीचं,राज्याचं,देशाचं,इत्यादींच्यां इभ्रतीत अडकलेलं असतं.मग या ना त्या मार्गाने तिच्या स्त्रीत्वाचा वापर करून,तिचा वेळ प्रसंगी अवमान करून आपलं इप्सित साध्य करण्याचं कारस्थान काही खरे समाज कंटक करत असतात.हे सातत्याने सुरु असतं.अनेकदा स्त्रियांना हे तुमच्या भल्यासाठी आहे सांगून त्यात अडकवल्या जात.मग कुठें देव-धर्माच्या नावाखाली,तर कुठ राजकीय स्वार्थासाठी स्त्रिया ही बाहुलं बनून रहातात.हे सगळं खुप गलिच्छ आणि विकृत आहे.
यामुळे कधीच Gender Equality म्हणजे लिंग समानता प्रस्थापित होणार नाही.परिवर्तनाचा जो विचार प्रवाह आपल्या देशात प्रवाहित होवू पहात आहे,त्याला टाळे बंद करण्यासाठीचे हे खेळ खेळले जात आहेत.
हिंदूंनाच काय शहाणपण शिकवता इतर धर्मियांना, मुसलमानांना शिकवा की ? अस म्हणणारे हे शहाणपण स्वतः ही शिकून घेत नाहीत आणि जे करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना ही अस रोखतात.काय येतंय का लक्षात ? दुहेरी चाल हे दोन्ही कडील धर्मांध रचत आहेत.
बायांनो,डोळस व्हा,विचार करा,मग कोणती ही भूमिका घ्या.काल-परवा एका विकृत पुरुषी झुंडीला एक पोरं धाडसानं सामोरं गेली.खरं तर तीच कौतुक वाटतं.
न घाबरता ती एका विशिष्ठ धार्मिक घोषणेला सामोरं गेली.पण,तिने ही त्याचा विरोध करताना धार्मिक घोषणेचाच आधार घेतला.हे ऐकून थोड दुःख झालं.पण यात दोष तिचा नाही.पण,यामुळे नभरून येणार नुकसान होवू शकत हे लक्षात घ्या.
धार्मिक-सांस्कृतिक कट्टरतावाद सर्वनाशच करतात.
यात अधिक नुकसान होत ते सर्वसामान्यांचं.म्हणजे तुमचं आमचं.ते धर्मांध तुम्हाला त्यांच्या प्रमाणेच धर्मांध बनवतील.ते होवू देवू नका.या चुकीच्या प्रदर्शनांना विरोध करा.पण त्या आधी ते समजून घ्या.
स्त्रियांनी जागृत रहायला हवं.तुम्ही प्रथम मानव आहात.
तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य,हक्क,अधिकार आहेत.ते तुम्हाला सहज मिळाले असतील.पण त्यासाठी अनेकांनी लढा दिला आहे.आपल संपूर्ण जीवन या साठी वेचलं आहे.प्राणांची आहुती अनेकांनी दिली आहे.हे विसरू नका.तुम्ही काय घालायचं,खायचं,प्यायचं,शिक्षण घ्यायचं,कसं जगायचं हे सगळं तुम्ही ठरवू शकता.पण हे करत असताना काही गोष्टी जपल्या पाहिजेत.हे विचार पुढे घेवून जाण्यासाठी.पुढच्या येणाऱ्या पिढ्या हाच जतन केलेला परिवर्तनवादी विचारांचा वारसा घेण्यासाठी सज्ज आहेत.आता तुम्ही ठरवा,त्यांना नक्की कोणता वारसा बहाल करायचा ते !
चुकीच्या स्त्रीत्वात अडकत बसलात तर तुम्ही सात पडद्यातच ठेवल्या जाणार यात काडीची ही शंका नाही.
या विषयाकडे तुम्ही कसं बघता हे तुमच्यावर अवलंबून आहे.आपली सद्विवेक बुद्धी शाबूत असेल तर हे समजेल.
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
खर तर धर्माच्या नावाखाली राजकीय फायदा करुन घेण्याचा प्रयत्न काही माणसं करत आहेत, या सर्व द्वीदल विचारी मनोवृत्तीला न जुमानता निर्भिड आणि बिनधास्त आयुष्य जगायला हवं🙏🙏🚩
ReplyDeleteकोणत्या ही जाती धर्मा भेदाभेदाच्या पलीकडे जावून मानवतेला अभिप्रेत जीवन जगलो पाहिजे
Delete