डॉ.भीमराव आंबेडकर

१४ एप्रिल 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती !

संविधान,हिंदू कोडं बिल,महाडचा सत्याग्रह,शेतकरी व कष्टकरी यांच्या हिताचे कार्य.असे एक ना अनेक कार्य आपल्या प्रयत्नातून,संघर्षातून पूर्णत्वाला ज्यांनी नेलं व ज्याचा लाभ सर्व स्थरातील जनतेला झाला.
विशेषतः वंचीत घटक,ज्या मधे माझ्यासारख्या असंख्य स्त्रियांचा समावेश आहे.असे थोर विचारवंत, समाजसुधारक,महामानव डॉ.भीमराव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर.
   न्यायशास्त्र,अर्थशास्त्र,राजनीति अशा अनेक विषयांचे सखोल ज्ञान बाबासाहेबांना होते.सामाजिक भेदाभेद यामुळे लहानपणापासून त्यांना जी वागणूक मिळाली होती ही अगदी हीन दर्जाची होती.या सगळ्या अनुभवांमधून जे काही गाठीशी बाबासाहेब यांनी बांधले होते त्यातून विचारपूर्वक एका परिवर्तनशील समाजाची, मानवी हिताची कार्य त्यांच्या हातून घडले,असं म्हणणं वावगं होणार नाही.कारण मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे,हे या महामानवाने कृतीतून दाखवून दिलं.
त्यांनी ते जीवन जगलं व अनुभवलं होत.ते कोणाच्या वाट्याला येवू नये म्हणून त्यासाठी त्यांनी लढा उभारला आणि ते यशस्वी देखील झाले.पण,आपण मात्र करंटे ठरलो.
  बाबासाहेब म्हणतात,वर्ग आणि जात तसे म्हणायचे झाले तर निकटवर्ती होत.कालांतराने ते अलग होतात.बंदिस्त केलेला,गोठलेला वर्ग म्हणजे,'जात'.ह्या बंदिवासाला छेदून बाहेर पडण्याचा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दिला खरा,पण आपल्यालाच त्यातून मुक्त व्हायचं नाही,असं दिसत आहे.सोन्याचा,तो ही काल्पनिक पिंजरा आपल्याला गोड वाटू लागला आहे.शिक्षण घेऊन सुशिक्षित झालो, पण त्या ज्ञानाचा उपयोग परिवर्तनासाठी होताना दिसत नाही.आपण आज देखील अनावश्यक रूढी परंपरा यांच्या नावाखाली सुरू असलेल्या शोषणाला बळी पडत आहोत.मानसिक गुलामगिरीतून आपल्यालाच मुक्तता नको आहे.
  मी नेहमी म्हणते आपण महामानव डोक्यावर घेतो,पण डोक्यात नाही.कारण आपल्या बहुजन समाजाच्या डोक्यात अतिरिक्त मैला साठला आहे.आपण दैववादी, रूढी-परंपरावादी,प्रतिगामी विचार व कृती जी बाबासाहेबांना मोडून काढायची होती व त्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला तेच आपण सोडवू शकलो नाही. त्यांना अभिप्रेत असलेला समाज असा निर्माण निश्चितच होणार नाही.त्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावं लागेल.त्यांनी केलेल्या तरतुदींचा उपयोग इतर हितकारक कार्यासाठी वापरावा लागेल.भेदाभेद विसरून एकसंध,मानवहित जोपासणारा समाज निर्माण झाला पाहिजे.
मी प्रयत्न करत आहे.तुम्ही हा प्रयत्न आपल्या वैचारिक कृतिशील परिवर्तनातून दाखवून द्यावा.हेच खरे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल. 
   लक्षात ठेवा फुले,शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र,म्हणजेच त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रगतीपथावर अश्वारूढ होणारा महाराष्ट्र होय ! 
समाजसुधारक,विचारवंत,महामानव हे आपले संपूर्ण आयुष्य संघर्ष करून परिवर्तनशील समाज निर्मिती करण्याचे अनन्यसाधारण कार्य करण्यात घालवतात. आपण स्वतःला त्यांचे वारस म्हणवून विविध रंगांच्या झेंड्याखाली ह्या महामानवांना विभागून त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या यांचा घाट घालून दिवसा ढवळ्या त्यांनी सांगितलेल्या शिकवणी मातीमोल ठरवतो..
समाजातील माझ्यासर्व भगिनी व बांधवांनी एकदा तरी ह्या महामानवांचे खरे संघर्षमय चरित्र वाचून त्यातून सत्य बोध घ्यावा.एखाद्या विशिष्ट जाती धर्मामध्ये जन्म घेणे हे कोणाच्या हातात नसते,पण आपले आयुष्य समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करण्यासाठी वेचने व सार्थकी लावणे हे आपल्या हातात नक्की आहे.जन्माला येणाऱ्या प्रत्येक महामानवाने हेच केल.त्यांनी समाज हा एका  कुटुंबाप्रमाणे एकत्र व्हावा ह्यासाठी अथक प्रयत्न केले.डॉ.बाबासाहेब एक असेच थोर व्यक्तिमत्व !
बौद्ध धर्म स्वीकारणे म्हणजे,एखाद्या विशिष्ट समाजाचे होणे हा हेतु नसून बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रम करणे हा होता.आपला हेतू देखील तोच असावा.
  छत्रपती शिवाजी महाराज,छ.राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब अंबेडकर हे व सर्व महामानव संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान आहेत.
असाच समानतेचा,शिक्षणाचा,न्यायाचा संदेश देणारे डॉ.अंबेडकर हे सर्व समाजाचे आदरस्थान आहेत.
न्यायासाठी सतत संघर्ष करणारे,भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्ववंद्निय,महमानव 
डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांना त्रिवार शिवाभिवाद्न !!

॥ जय भीम ॥

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाउंडेशन पुणे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??