जागतिक महिला दिन

लिहिलेली पोस्ट जूनी आहे,पण विचार महत्वाचे !

आज सकाळपासूनच मन उदास आणि अस्वस्थ होतं.महिलांचा जय जय कार होता आहे आज आणि दुसर्या बाजूला त्याच महिलांच्या होत असणाऱ्या अत्याचारातील वाढ चिंतेचा विषय !! 
घरातली कामं उरकून बसले आणि क्षणात शून्यात विलीन झाले. ह्या शून्यातून बाहेर पडले ते फोनच्या आवाजाने.. 
फोन एका परिचित व्यक्तीचा होता. तिकडून आवाज आला,ताई महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! 
मी आभार मानले आणि दुसऱ्या क्षणातच तिकडून प्रश्न आला.. दिनविशेष काही लिहिलं नाही ताई ?  थोडी कामात असल्याने जमलं नाही म्हटलं आणि संभाषण थोडक्यात उरकलं.ताई आज काही लिहिलं नाही..असे दोन मेसेज ही आले होते.
मन व मेंदूवरील जळमाट काढून लिहायला बसले..विषय,अर्थातच महिला ! 

आज महिला दिन..तो ही जागतिक !
आपला माणूस म्हणून विचार केला जावा, पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला स्थान मिळावं यासाठी का होतो महिला दिन..सॉरी जागतिक महिला दिन साजरा ?
आपण मानव आहोत हे वेगळे सिद्ध करण्याची काही आवश्यकता आहे का स्त्रियांना ?
आणि का मी पुरुषांच्या बरोबरीने असावं ?
पुरुषांपेक्षा सक्षम मी नाही का ?
कळत नकळत अनेक प्रश्न मनात घर करू लागतात. पण खरं सांगू का, आपण प्रत्येक जण जन्माला येण्यापासून ते मरेपर्यंत अनेक स्त्री पुरुषांमुळे जगत आलेला असतो.कोणा एकाला किंवा फक्त स्वतःला आपण नाही श्रेया देऊ शकत.त्यामुळे पुरुष महान आणि स्त्री लहान हा भेदभाव मुळात कशासाठी ?
स्त्री ही स्त्री असते. 
तिची बरोबरी कोणी करू नाही शकत ! या जगात येण्यापूर्वीच आपण नकोशी आहोत हे माहीत असून ही ती जन्म घेते.आपल्याच लोकांकडून मर्यादा घालून दिल्याने ती असहाय्य, अपराधी जीवन जगते.
तिच्या अस्तित्वाला सुरूंग लागतो तो इथेच !! बोहल्यावर चढते ते नवीन स्वप्न उरी बाळगून,पण तिथेही तिच्या स्वप्नांचा बळी घेतला जातो.. पुढे हाच वारसा ती आपल्या मुलीला देते,हे चक्र असंच चालू रहात !
मातृत्वाच्या मरण यातना सहन करून जन्माला घालणाऱ्या पोटच्या पोरीचे हाल न बघणारी दुर्बल आई ते आपल्या बाळासाठी जगाची सारी बंधने झुगारून देणारी आई या दोन्ही मी पाहिल्या व अनुभवल्या आहेत. कोणाचा ही जीवन संघर्षविना नसते, पण संघर्ष हा केवळ स्त्री आहे म्हणून करावा लागत असेल आणि सांस्कृतिक दहशतवाद जपण्यासाठी करत असाल तर थांबा...आपण का व काय करतोय याचा विचार करा आणि अंधश्रद्धा,थोतांड रूढी परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली होणारी स्त्रीची ओढातान या भंपकपणातून बाहेर पडा..सत्यवानाची सावित्री होताय चांगली बाब आहे,पती विषयी प्रेम आदर असावा..पण त्याच बरोबर फुलेंची सावित्री हि व्हा ! 
शहाजी राजेंची जिजाऊ व्हा !!  
बाबा साहेबांची रमाई व्हा !!! 
परिवर्तनाची कास धरा,जगा.. 
जीवन एकदाच आहे आणि ते सुंदर आहे !
स्त्री आहात म्हणून मान वर करून जगा, इतर स्त्रियांशी तुलना,मत्सर, द्वेष,पुरुषांबरोबर बरोबरी या निष्क्रिय विचारांमध्ये व कृतीमध्ये आपले आयुष्य निरर्थक घालू नका..

सुशिक्षित व्हा व सुरक्षित रहा !
माझ्या सर्व माता-भगिनींना नेहमीच आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी मनापासून अनेक शुभेच्छा !!

तुमचीच मैत्रीण,

प्राची दुधाने
वारसा सोशल फाउंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??