Give Yourself Time To Grow !

 Give Yourself Time To Grow  

        गिव्ह युवरसेल्फ टाईम टू ग्रो

स्वतःला विकसित होण्यासाठी वेळ द्या

आपण २१व्या शतकात जगत आहोत.सगळीकडे प्रगती होताना दिसत आहे.ही प्रगती तांत्रिक स्वरूपाची आहे.यंत्र माध्यमातून सुखसोयी देण्याच्या दृष्टीने वाटचाल निश्चित आपण करत आहोत,पण ह्या झपाट्याने होणाऱ्या बदलांमध्ये मानव स्वतःलाही बळच त्यात बसवण्याचा प्रयत्न करत आहे.Forcefully trying to fit oneself where one cannot survive.हे किती घातक असू शकत ? निसर्ग नियमांच्या पलीकडे जाऊन विकसित होण्यापेक्षा स्वतःला योग्यरित्या विकसित करा.

अर्थात हा विकास होत असताना या प्रक्रियेला वेळ देणे आवश्यक आहे.

    आपण इतर सजीवांची उदाहरण घेऊया.

तम्ही कधी फुलपाखरू पाहिलंत का ?पाहिलंच असेल..विविध रंगांचे,आकाराचे,आकर्षित करणारे फुलपाखरू.माझ्यासारख तुम्हालाही ते आवडत असेलच.पण हे फुलपाखरू एका क्षणात एवढे छान होत का ? अजिबात नाही.त्याची विकसित होण्याची एक प्रक्रिया आहे.आधी ते आपल्या कोशात असत,काही काळानंतर कोशातून बाहेर येत आणि आळीसारखं कीटक आपल्याला दिसू लागत.नंतर हळूहळू ते एका सुंदर पंख असलेल्या फुलपाखरामध्ये रूपांतरित होते.हे होत असताना फुलपाखरू अगलीकारण म्हणजे आयसोलेशन (isolation)सारख्या प्रक्रियेत देखील जात.आपल्याला कधी वेगळ,एकटं पडल्यासारखं वाटत असेल तर हे उदाहरण लक्षात ठेवा.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.एका कोकूनपासून सुंदर फुलपाखरू होण्यास एक काळ मध्ये लोटवा लागतो.ही वेळ अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे असते.

      जर तुम्ही योग्य प्रकारे विकसित नाही झालात तर काय होईल ? इथे विकास हा मानसिक,शारीरिक सर्वांगाने अपेक्षित आहे.जर तो नाही झाला तर आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन देखील अविकसित राहिल.संकटांना सामोरं जाताना,संघर्ष करताना मग तो शिक्षणासाठी,नोकरी-व्यवसायासाठी,  वैयक्तिक जीवनामध्ये कुठेच व्यापक विचारांची दृष्टी  नसणारे आपण निराश होऊन मागे मागे येत राहतो.आपली प्रगती खुंटते.पटकन काहीतरी मिळवण्यासाठी शॉर्टकट आपण घेतो.येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचे धैर्य आपल्याकडे असतं का हा विचार करायला आपण विसरतो.म्हणून थोडा वेळ देवून पूर्व तयारी केलेली असावी.

       आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे.आपण अनेक जण शेतकरी कुटुंबातील.तर चला थोडा या माध्यमातून या विषयाकडे पाहूया.एखाद पीक घ्यायचं म्हटलं तर ते कसं पण,कुठे पण,घेतो का ? नाही.एक विशिष्ट पद्धतीची प्रक्रिया आपण राबवतो.आधी जमीन नांगरून घेतो,मग बी-बियाणं जे काही लावायचा आहे ते पेरतो, लागवड करतो.त्याला पद्धतशीर पाणी देतो,खतं घालतो.काही पीक लवकर येणारी जरी असली तरी त्याच्या विकासाची एक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आपण ते काढत नाही.तसंच काही पीक वेळ घेतात पण त्याचं फळ चालताना जी गोडी लागते,ते योग्य विकसित झाल्यामुळेच.बदल घडला की तो दिसतो.म्हणजे आपण विकसित होत आहोत.विकसित होत आहोत म्हणजे आपण खरंच जगतोय असं मला वाटतं.एका बिजाचा प्रवास ती मातीत पेरल्यापासून ते रोप,वृक्षा पर्यंत होत असलेले बदल हे त्याच्या एक एक क्रमाने होत असतात.

   आंब्याची कोय मातीत पडली की तिची प्रक्रिया सुरु करते.काही दिवसात एक छोटं रोप तयार होत.ऊन,वारा,पाऊस सर्व सोसून ते मोठ होत असतं.योग्य निगा राखून ते रोप मोठं झालं की काही वर्षांनी त्याला मोहोर येतो.कसा,किती मोहोर आहे यावरून किती कैऱ्या येतील याचा ढोबळ अंदाज लावला जातो.कधी कधी हे सगळे अंदाज फोल देखील ठरतात.वारा,पाऊस इत्यादी त्याची कारण असू शकतात.कधी कधी अंदाजापेक्षा जास्त तर कधी काहीच हाती लागत नाही.कैरी उतरवून आपण काही आढी लावतो आणि बाकी इतर कैरी ठेवतो.आंबा पिकाला देखील वेळ घेतो.कैरी आणि आंबा एकाच झाडाची फळ असली तरी चव मात्र किती भिन्न असते.वेळ,परिस्थिती आणि गुण यावर खुप काही अवलंबवून असत. 

     या सगळ्यातून आपण काय बोध घेतो.विकसित होवून यश मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो.ऊन,वारा,पाऊस सोसावा लागतो. म्हणजेच आयुष्यात येणारी संकट,संघर्ष यांना समोर जाताना निराश न होता,परिस्थितीपुढे गुडघे न टेकता आपल्याला त्या स्थितीत सुद्धा विकास कसा करता येईल या कडे लक्ष द्या.वेळ खूप महत्त्वाची असते.त्याचबरोबर वेळ देऊन बदल घडवत प्रगतीशिल होत राहणं खरं मानव जीवन आहे हे समजून घ्या.इथून मागे जे झालं ते ठीक,पण आता हे महत्त्व समजलं असेल तर आत्ता पासून स्वतःला विकसित होण्यासाठी वेळ द्या.योग्य बदल घडवा.किमान येणारी पुढची पिढी आपल्याकडे बघून हा व्यापक दृष्टिकोन अंगीकारून चांगली विकसित होईल या साठी प्रयत्न करू.काही गोष्टींना विकसित व्हायला वेळ लागतो.तिथं थोड थांबा ! 

   मोठ्या वृक्षांची मुळं घट्ट असली की ती सर्व परिस्थितींना कुशलतेने सांभाळून घेतात.आपण पाया भक्कम करण्यासाठी वेळ द्या.जे काही चुकीचे निर्णय आतापर्यंत आपण घेतले असं वाटत असेल त्याचा खुप विचार करू नका.थोडी समज कमी होती अनुभव नव्हता म्हणून ते होत असतं.आता महत्वाचं काय तर विकसित होण्यासाठीची इच्छा ! ती प्रबळ करा.पण जे पेरतो तेच उगवतं हे देखील विसरू नका.चांगले आचार,विचार, प्रयत्न जर अंगी असतील तर निश्चित फळे देखील चांगलीच मिळतील.

      सगळी रोप,वृक्ष सारखी नसतात तशी सगळी माणसं देखील सारखी नसतात.काही लवकर तर काही हळूहळू विकसित होतात.यात काहीच गैर नाही.स्थिर असण्यापेक्षा हळूहळू का होईना प्रगती,विकास हा होत आहे यावर लक्ष केंद्रित करा.एका रात्रीत बदल होत नाहीत.लोक तुमची प्रशांसा,कौतुक करतात पण त्यासाठी किती वेळ,कष्ट लागलेले असतो हे आपल्यालाच माहित असतं.सहज काही मिळत नाही.आपल्या आयुष्याची  इतरांबरोबर तुलना करू नका.सूर्य त्याच्या वेळेला आणि चंद्र त्याच्या वेळेलाच उगवतो.आपले कार्य एक स्वतःला जाळून तर दुसऱ्या स्वतःला विविध चरणांमध्ये बदलून करत असतो. संघर्ष,त्याग हे सगळं आलंच.

      मी स्वतःला विकसित व्हायला वेळ दिला व देत आहे.अनेकदा वेळ गेली की समजतं,आपण हे करायला नको होतं किंवा असं करायला पाहिजे होतं.पण हरकत नाही.तो भूतकाळ एक शिकवण म्हणून पाहायचं आणि येणाऱ्या काळासाठी तयार राहायचं.पुन्हा काही नवीन अनुभवण्यासाठी.यातूनच विकास करत राहायचा.पण हे होत असताना होणाऱ्या यातना सहन होत नाहीत म्हणून मी पळ काढत नाही.मी हे सगळं साठवत राहिले.वेळो वेळी आवश्यक तिथ उपयोगात आणत गेले व पुढेही करत राहील.अजून खूप काही करायचं आहे.त्यासाठी थोडा वेळ देत आहे.आता विकसित झाले त्यावर कार्य करत आहे.यातून मी आणखीन विकसित होत आहे. 

     ह्या सगळ्याच मानवाशी निगडीत असलेले एक उदाहरण सांगते.आपण जन्मापूर्वी आईच्या गर्भात साधारण नऊ महिने असतो.आपल्याला जगात येण्यापूर्वी होणाऱ्या विकासासाठी हा काळ उपयुक्त असतो.ह्या पृथ्वीवर आपल्याला श्वास घेता यावा यासाठी ही वेळ महत्त्वाची असते.याला काही अपवाद देखील असतात,वेळेआधी जन्माला येणारे.पण नऊ महिने ही वेळ गर्भ वाढीसाठी पूरक वेळ आहे असं मानतात.पुढे बालपण,तारुण्य,म्हातारपण ह्या वेळेप्रमाणे मानव विकसित होत असतो.मुलांचं बालपण नष्ट होऊ देऊ नका.अनावश्यक गोष्टींमध्ये त्यांना गुंतवू नका.त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना चांगली व्यक्ती म्हणून कस घडवता येईल यावर भर द्या.तारुण्य विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचं.खूप शिका,संपत्ती कमवा,नाती टिकवा,  वेळेचा,कुटुंबाचा योग्य आदर करा.मुख्य म्हणजे शिकता शिकता चांगलं पेरण्याचे हे दिवस आहेत.त्यामुळे समाजात वावरताना चांगले विचार घ्या व द्या.म्हातारपण रिटायरमेंट म्हणून जगू नका.आयुष्यातील या टप्प्याचा योग्य विनियोग करा.स्वतःला आणखीन विकसित करा.जे जे साठवलं,चांगले-वाईट अनुभव मांडून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी एक मार्गदर्शक बना.तरच आपली खरी प्रगती झाली व पुढच्या पीडीच्या माध्यमातून होत राहील. 

    हजारो वर्षांच्या अनावश्‍यक,चुकीच्या रूढी-परंपरा खोट्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्यावर मानसिक गुलामगिरीचे पाश आवळून आहे.ही मूळ कितीही घट्ट असली तरी त्यांचा पाया हा स्वार्थी,अमानवी असून त्यातून मार्ग काढण्याची वेळ कधी येणार हा विचार देखील आपण करणं गरजेचे आहे. तुमच्या आमच्या विकासात सगळ्यात मोठा अडथळा हेच पाश आहेत.पिढ्यानंपिढ्या ज्या अनावश्यक पाशात आपण विनाकारण अडकलो आहे त्यातून मुक्त व्हा. सर्वसमावेशक,व्यापक,चिकित्सक,परिवर्तनवादी,  सत्यशोधक विचार प्रगतीसाठी,विकासासाठी खत पाण्याचे कार्य करतात.म्हणून स्वतःच्या विकासासाठी वेळ द्या.तुम्ही बदलला,विकासित झालात तर तुमचं कुटुंब,समाज विकसित होईल.चला खऱ्या अर्थाने विकसित होवू आणि मानवहीत जोपासणारा नवं समाज निर्मित करू. 

प्राची दुधाने 

वारसा फाऊंडेशन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

आज होळी .. म्हणजेच शिमगा..

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??