क्रोध सर्व काही नष्ट करतो..

क्रोध सर्वकाही नष्ट करतो..
   
    सजीवांमध्ये अनेक भावना क्षणाक्षणाला निर्माण होत असतात.काही क्षणीक तर काही दीर्घ काळ घर करून बसतात.कोणतीही भावना मर्यादेबाहेर निर्माण झाली तर ती घातकच ठरते.अतीव प्रेम ही भावना जरी निर्माण झाली तरी त्याचा परिणाम चुकीचा होऊ शकतो.पण क्रोध म्हणजेच राग जर प्रमाणाबाहेर निर्माण झाला तर सर्व काही नष्ट होऊ शकते.
आपल्या भावना ह्या पाहुण्यांसारख्या असतात.
त्या येतात,भेटतात,काही काळ थांबतात आणि निघून जातात.त्यांचा औपचारिकता म्हणून पाहुणचार ठीक, पण कायमच कोणाला आपल्याकडे ठेवताना विचार व्हायला नको का ? 
     गरम दुधाने तोंड भाजले की ताक फुंकून पिणारे  आपण,क्रोधासारखी भावना का आणि कशी शहानिशा न करता आपल्या अंगी आपण बाळगतो.क्रोधाची अनेक कारण आहेत.विशेष म्हणजे क्रोध हा नकारात्मकता निर्माण करणाऱ्या भावनांशी जोडलेला असतो.दुःख ही त्यातील महत्त्वाची जोडलेली एक भावना.राग इत्यादी भावना निर्माण होणं नैसर्गिक आहे.पण आपण त्यावर मात करून बदल घडवू शकतो.आपल्याला दुःख झाले की आपण निराश होतो आणि प्रत्येक घटनेकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करतो.त्यातून आपलं एक मत परिवर्तित होतं जे अर्थातच द्वेषाने भरलेलं असतं. एखाद्याची प्रगती होत असते ती कोणाला सहन होत नाही.त्यातून द्वेष,मत्सर,दुःख निर्माण होत.कळत नकळत हळूहळू या भावना आपला ताबा घेतात.
क्रोध वाढत जातो चिडचिडेपणा वाढतो.हा क्रोध ज्या व्यक्तीविषयी निर्माण झालेला असतो त्याचा परिणाम तिच्यावर निश्चितच होत असतो.विरोध करणे,अपशब्द उच्चारणे,बदनामी करणे,कधीकधी याही पेक्षा भयंकर गोष्टी होत असतात.पण त्याचबरोबर ज्या व्यक्तीने हा क्रोध आपल्यात साठवलेला असतो तो जास्त धोक्यात असतो.कारण आपला क्रोध हा आपलाच शत्रू क्रमांक एक असतो हे लक्षात घ्या.माणसाला वर वर सगळं छान दिसलं की सगळं उत्तम आहे असा समज करून घ्यायची सवय लागली आहे.पण खोलवर जाऊन त्याबद्दल जाणून घेण्याची तसदी नको वाटते.दुसऱ्याच छान चालल आहे,पण त्याला त्यासाठी काय कष्ट आहेत हे जाणून घ्या.पण ते न करता त्या प्रती क्रोध निर्माण करून तुम्ही स्वतः तरी कुठे सुखी होणार आहात.
    क्रोध हा क्रोधीत असणाऱ्या व्यक्तीला आतून पोखरत जातो.कोणा विषयी कसला ही राग असेल आपल्याला कोणी फसवलं,त्रास दिला तरी त्याविषयी मनात राग धरू नका.आपण क्रोध धरून स्वतःला शिक्षा देत असतो.एखाद्याला त्रास व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न करतात पण त्याचा समोरच्या व्यक्तीवर काहीच परिणाम होत नाही.म्हणून तुम्ही क्रोधित होता.तुमचं दुःख,भीती,असुरक्षितता,निराशा हे तुमच्या क्रोधाचा कारण आहेत.समोरची व्यक्ती नाही.तुम्ही तुमचे शत्रू बनत आहात.
      क्रोधाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असतो.घरात,कामाच्या ठिकाणी,समाजात सगळीकडे आपला हा रागीट स्वभाव प्रचलित होतो.आपण बारीक-सारीक गोष्टींमध्ये चिडचिड,किटकिट करू लागतो.मुलांना ओरडणं,घरातील लोकांवर राग काढणे, ऑफिस मध्ये कोणावर चिडून बोलणं,बाहेर विनाकारण वाद घालणं,भांडण-तंटे करणं इत्यादी क्रोधातून आपण करत असतो.काही लोकांच्या वागण्यामुळे देखील आपल्याला राग येत असतो.पण मला वाटतं त्यांचं वागणं बदलेल की नाही माहीत नाही,पण आपण तरी आपला क्रोध ताब्यात ठेवावा.
      क्रोध निर्माण झाला की त्याच्या परिणामांचा पण विचार आता इथून पुढे व्हायला हवा.आपल्यालाच त्रास जास्त होतो.त्यातून काही शारीरिक,मानसिक आरोग्य बिघडण्याच्या मार्गाने जाऊ नये एवढी काळजी घ्या.रागाच्या भरात निर्णय घेणं चुकीचं असतं. बहुतांशवेळा पश्चाताप माथी येतो.पुढचा विचार न करता पटकन राग रागात घेतलेली कोणती ही भूमिका आयुष्यभर पस्तावा करायला लावणारी ठरू शकते.
अनेकदा माणसं रागात खर देखील बोलत असतात.खूप काही आपण आपल्याच साठवून ठेवलेलं असतं. ते क्रोधाच्या भरात बाहेर येतं.म्हणून क्रोधात बोलताना जपून बोलाव.माझ्या मते क्रोधाला सगळ्यात चांगला उपाय म्हणजे शांतता..राग आला की थोडं शांत बसा. आपल्याला कोणतीही चुकीची गोष्ट चांगल्या मार्गावर वळवता आली पाहिजे.एखादा खराब रस्ता असेल तर आपण गाडी सावकाश,कमी गचके बसतील अशा पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो.तसच क्रोधाच पण करा.विरोधातून कटुता निर्माण होऊ देवु नका.क्रोधात सय्यम राखून शांत रहाण्याचा प्रयत्न करा. आवडीची एखादी गोष्ट करा.आपल्या रागाचा योग्यरित्या वापर करा.ती पण तुमची ताकतच असते.क्रोधात ऊर्जा असते. त्या ऊर्जेतून चांगली निर्मिती घडू द्या.चित्र काढा,नाचा, गाणं म्हणा,त्याविषयी कोणाबरोबर तरी बोला.क्रोधाला तुमच्या दुःखाच कारण होऊ देऊ नका.काही नाही जमलं तर कागद-पेन घ्या आणि त्यावर आडव्यातिडव्या रेघा  मारा.पण तो क्रोध कोणा व्यक्तीवर,स्वतःवर काढू नका.
    क्रोध स्लो पॉयझनिंगच काम करत.जो यजमानांना जास्त घातक असतो.हळूहळू तुमच्यावर क्रोध स्वार होवून त्याच्याप्रमाने तुम्हाला नाचवतो.याचा गैरफायदा इतर लोक त्यांच्या मतलबासाठी देखील घेतात.मला सांगा रिमोटने चालणार आपण एखादा यंत्र आहोत का ? ह्या क्रोधामुळे माझी मती भ्रष्ट होत असेल व मला रिमोटने एखाद यंत्र चालवतात त्याप्रमाणे कोणी नियंत्रित करणार असेल तर तो क्रोध कमी केलेला बरा नाही का.क्रोध काहीच निर्माण करू शकत नाही.तो जाईल तिथे सर्व नष्ट करतो.असा विध्वंस करतो की त्यातून पुन्हा उभारी घेणे अशक्य होऊन जातात.क्रोधात विचारांपेक्षा तोंडातून निघालेल्या शब्दाचा वेग जास्त असतो.एकदा गेलेल्या शब्द परत घेता येत नाही.शब्द खोलवर इजा करून न भरणारे घाव देऊन जातात.तुम्ही कोणावर रागावलात म्हणून तुम्हाला शिक्षा होणार नाही पण हा तुमचा क्रोधच तुम्हाला शिक्षा देईल यात शंका नाही. 
      मला तर कधी कधी असं वाटत की माझ्या सहनशीलतेची मर्यादा परीक्षण करण्यासाठीच काही लोकांचा या पृथ्वीवर जन्म झाला असावा.अनेक वेळा मला देखील राग अनावर होतो.पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न मी करत आहे.क्रोधापासून मी दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे.ज्या लोकांमुळे क्रोध निर्माण होतो त्याच्यापासून बचावात्मक भूमिका घेत आहे.त्यांची भीती वाटते म्हणून नाही.माझा क्रोध माझ्यासह,इतरांना काही इजा करणार नाही याची काळजी मी घेत आहे. Prevention Is Better Than Cure ! कारण इथं उपचार सोपा नाही म्हणून प्रतिबंध महत्वाचा.सध्या माझा राग नजरेपुर्ता,थोडा उपहासात्मक आणि किंचित टीकेपुरता मर्यादित राखून ठेवला आहे.तो ही उपयोगात आणण्याची वेळ माझ्यावर येवू नये,समोरच्या व्यक्तीला बुद्धी यावी एवढीच अपेक्षा.कारण मला स्वतःला जपायचं आहे.
कोणत्या तरी तज्ञाने सांगितलं आहे,एका मिनिटाचा क्रोध चार ते पाच तासाने आपली रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत करत असतो.तसेच एक मिनिट हसल्याने रोगप्रतिकारक प्रणालीला २४ तासाने अधिक चालना मिळते.मी तर हसणार बाबा..कोणाला राग आला तर हा माझा लेख १०० वेळा वाचून काढा.त्यावर तुमचं मत लिहा..तरी नाही क्रोध कमी झाला तर या भेटू एकदा..चर्चा करायला हो ! काही मार्ग निघतो का बघू.  Manage Your Anger 
                    Or 
It Will Start Managing You !

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

  1. There are no hindi and english meanings for us to understand your concern really

    ReplyDelete
    Replies
    1. Shrawanji I will definately try to find a way through..Thank you so much for your feedback !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

आज होळी .. म्हणजेच शिमगा..

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??