मंथन
मंथन
कोणी ही कोणत्या ही स्त्री बाबत आक्षेपाहार्य विधान करण्यावर माझा नेहमीच विरोध असतो. याचा अर्थ कोणी टीकाच करू नये असं नाही. परंतु, आपल्या भाषेचा वापर आपले संस्कार दर्शवतं असतात हे तितकंच महत्वाचे. अनेकांना मी स्त्रीवादी वगेरे वाटते. अर्थात स्त्रीवादी असणं किंवा कोणी तसं आपल्याला म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाही. हो पण मी एकांगी स्त्रीवादी निश्चितच नाही ! ते baised म्हणतात ना, म्हणजे पक्षपाती वगेरे मी नाही. मी पूर्वग्रहदूषित तर अजिबात नाही. म्हणून जिथे जे व ज्याचे चूक त्याला विरोधच असतो. तसंच, स्त्रियांच्या बाबत ही काही सत्य आपण स्त्रियांनी स्वीकारायला पाहिजे. पुरुषीसत्ता आपण किती वाहून घ्यायची याची मर्यादा आपल्याला कधी समजलीच नाही. आपली प्रत्येक बाब या पुरुषांवर अवलंबून ठेवायची. का? असा प्रश्न कधी आपल्याला सतावत नाही का? जगात एकटं कोणी काहीच करतं नाही. माणूस म्हंटल की एकमेकांची मदत, आधार वगेरे असतोतच. किंबहुना ते असावंच. परंतु, त्यासाठी किती झुकतं माप घ्यावं, याला मर्यादा का नसावी? पण इथे पण बघाना लिहिताना "माणूस" असं लिहिलं आहे मी. माणूस हा पुरुष लिंगीच शब्द आहे ना? मग इथे बाई कुठे? बाईला माणूस म्हणून ही स्थान नाही आणि मानव म्हणून तर नाहीच नाही..
धन्य त्या महामानव बाप अन माय माऊल्यांचे. जिजाऊ-सावित्री-फातिमा-अहिल्या-रमाई-मुक्ता,
शिव-शंभु-फुले-शाहू-आंबेडकर ही सगळी नुसती नाव नाहीत ओ ! आपल्या देशाने यांच्या संघर्षामुळे जो मोकळा श्वास घेतला ना, तो प्राणवायू आहेत हे..
सोयीनं आपली न्याय-स्वातंत्र्य-अधिकार-अमुक-तमुक मूल्य जपणारी तत्व शून्य प्राणी समाजात अनेक वावरत आहेत. इतरांच्या बाबत त्यांच्या भावना बोथट असतात. अगदी निर्विकार चेहऱ्याने सगळा आनंद घेत असतात.
स्वतःवर आलं की लगेच गळे काढतात. यात स्त्री-पुरुष कोणी अपवाद नाही. मी म्हणते स्त्री असो वा पुरुष एक तर कोणी ही विनाकारण कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नये. चारित्र्य ही काही सहज बाजारात उपलब्ध वस्तू नाही, जी खराब झाली की नवीन विकत घेता येते.
पांढऱ्या शुभ्र वस्त्राप्रमाणे चारित्र्य असतं. एक किंचितसा डाग पूर्ण शुभ्रता नष्ट करतो. एक वेळ कापड डागरहित होईल ही. परंतु, एखाद्याच्या चारित्र्याचे हनन झाल्यास ते पुर्ववत होणं कठीण आहे. आपलं शील जपणं हे आपल्या ही हातात आहेच. बाकी कोण काय बोलत तो त्यांचा प्रश्न. म्हणतात ना एखादी व्यक्ती शरण येतं नसेल तर तीचे चारित्र्य हनन करा.. हा तर फार ऐतिहासिक प्रयोग आहे. सरळ, सरल, स्पष्ट, सत्य मानवांनी या सगळ्याला कधीच भीक घातलेली नाही. हा देखील इतिहास आहे.
तर, आपली मतं अगदी स्पष्ट असावीत. दोन दगडांवर विसंबवुन राहिलं तर आपलाच टांगा पलटी होतो. आपण त्यातले नाही म्हणायचं आणि कृती तर त्याच दिशेने असते. अरे आयुष्य एकदाच असतं. कोणी पाहिला आहे दुसरा....सातवा जन्म ! उगाच peer pressure का घ्यायचं? कोण काय म्हणेल.. यातच आयुष्य भुर्रर्र उडून जातं. हे सगळं मी का सांगते. विषय अजिबात भरकटला नाही. स्त्री पुरुष समानता वगेरे आपण म्हणतो. मग चारित्र्य फक्त स्त्रीचंच असतं का हो? पुरुषांना नसतं का चारित्र्य वगेरे? की ते किती ही मळकटलं तरी चलता हैं?
आपल्याला सगळं समान पाहिजे. मग कधी कधी सगळं सोयीनं कसं घेतो? अनेकदा बाई असल्याचा अवडंबर का माजवलं जातं? ही एक प्रकारची दांभिकता नाही का?
समाज असाच होता आणि कायम असाच रहाणार का?
निऋती-तुळजा-जिजाऊ-सावित्री-फातिमा-अहिल्या-
रमाई-मुक्ता या व सगळ्या महान माता जर स्त्री आहे म्हणून.. त्या स्त्रीत्वाचा केवळ दिखावा करतं बसल्या असत्या. त्यांच्यावर अनेक दोष आरोप होत असताना, मी किती अबला म्हणत लढायचं सोडून रडत बसल्या असत्या तर..?? तर स्त्री म्हणून आम्हीच काय, तर संपूर्ण समाज आज गुलाम असला असता. हे वास्तव समजून घ्या.
कदाचित नेहमी प्रमाणे माझं हे मतं अनेकांना रुचणार नाही. ते टोचलं तरी बेहत्तर. पण मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक आहे. I'm not biased to self.
मला जर या पुरुषी मानसिकतेशी लढायचं असेल ना, तर मला तयार असायला पाहिजे या पुरुषसत्तेने निर्माण केलेल्या या व्यवस्थेशी दोन हात करायला. मला माहिती पाहिजे, हा समाज मला रोखण्यासाठी सगळ्या हद्द पार करेल. त्यात अनेक अनोळखी तर कैक माझ्या जवळचे असतील. इतके जवळचे, की आरश्यात माझे प्रतिबिंब नाही तर तेच मला दिसतात.
पुरुषांबरोबर बरोबरी करायची अथवा त्यांच्या पुढे जायचं म्हंटल तर किती सोसावं लागेल या विचाराने आपण थांबतो. खरं तर समानता या शब्दाचा अर्थच आपल्या कोणाला उमगला नाही. त्यात कोणतीच स्पर्धा नाही. हे जेव्हा आपल्या सर्वांना समजेल, तेव्हा कोणी कोणाच्या चारित्र्यावर बोटं ठेवणार नाही. स्त्रियांनी स्त्रियांविरुद्ध व्यवस्था बळकट होण्यासाठी आपला गैरवापर होवू देवू नये. समाजात रोज अनेकांवर विकृत मानसिकतेतून मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडतं असतात. आपण त्यावर चकार शब्द वाया घालवत नाही. आपल्याला काय? म्हणत बोथट होत जातो. आपल्यावर ही अशी परिस्थिती ओढावल्यावर मात्र अकांततांड्व करतात.
राहत इंदोरी साहेब म्हणतात ना "लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है" l
म्हणून कोणती ही आग आपल्या पर्यंत येण्यापूर्वीच ही व्यवस्था समान कशी होईल यासाठी कृती करावी.
कोणी आपल्या वैयक्तिक जीवनात काय करावं हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न.
बाकी बोलणाऱ्याच्याचं काय कोणाच्याच जिभेला हाडं नसतं!
विषय समजला असेल असं समजून इथेच त्याला विराम देते..
Comments
Post a Comment