प्रेमाचा एक किरण

आज जेष्ठ सिने अभिनेत्री प्रेमा किरण गेल्याचे समजले.खरं तर त्यांचा आणि माझा परिचय फारच अल्प स्वरूपाचा.तरी काही माणसं सहज आयुष्यात येतात आणि क्षणात आपली छाप पाडून एक आपुलकीच नात निर्माण करतात.प्रेमा आई त्यातीलच एक.    
   २०१४-१५ सालची आठवण.
वारसा एंटरटेंमेंटच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रात आपण कार्य करावं असं वाटतं होत.त्यासाठीचे यशस्वी प्रयत्न ही झाले.काही कारणास्तव ते पूर्णत्वाला गेले नाही ही बाब वेगळी.परंतु या काळात बरीच माणसं या क्षेत्रातील भेटली.त्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक पितांबर काळे काका ही होते.त्यांचा संपर्क झाल्यावर ते स्वतः पुण्याला आम्हाला भेटायला आले.प्रेमा आई त्यांच्या सोबत आल्या होत्या.खरं तर प्रत्यक्ष समोर पाहिलं आणि या प्रेमा किरण आहेत हे समजायला थोडा वेळ लागला.इतकी मोठी अभिनेत्री आपल्या समोर बसून अगदी सहजतेने वागते बोलत आहे हे पाहून आश्चर्य वाटले खरं.नंतर मात्र त्यांच्यात केव्हा मिसळून गेलो समजलं नाही.बराच वेळ गप्पा झाल्या.माझा मुलगा तेव्हा ४ वर्षांचा होता.पुलिसवाल्या सायकलवाल्या या गाण्यावर तो दम लागला तरी नाचायचा.त्या दिवशी प्रेमा आईंना याची झलक दाखवली.त्या इतक्या खूष झाल्या की त्याला जवळ घेवून बसल्या.या पिढीमध्ये आपला अभिनय असलेल गाणं फेमस आहे की,असे उदगार त्यांनी काढले.लेकीला तर,किती गोड आहे ग लेक म्हणून प्रेमानं चेहऱ्यावरून हात फिरवला.काही वेळातच इतका जिव्हाळा निर्माण झाला की मला तुम्ही सगळे प्रेमा आईच म्हणा अस त्या म्हणाल्या.म्हणून त्यांना प्रेमा आई असच इथे संबोधलं आहे.त्यांना गाडी पर्यंत सोडवायला गेले तरी गप्पा मारत होत्या.उभ्यानं ही बराच वेळ बोलत होत्या. अखेर निरोप घेवून त्या निघाल्या,पण परत भेटू म्हणून गेल्या.
  ही त्यांची पहिली आणि अखेरची भेट.त्या नंतर काही वेळा फोनवर बोलण झालं.माझं या क्षेत्रात काही जमलं नाही.त्यामुळं मी नंतर हा विषय दूर ठेवला.तशी ही माणसं ही दूर राहिली. 
   काल १ मे २०२२,प्रेमा आई गेल्याच समजलं.सगळ्या आठवणी दाटून आल्या.त्या भेटीचे क्षण चित्रे मोबाईलमधे कैद केले होते.पण काळाच्या ओघात जशा या आठवणी विरतात तसे ते ही कुठें विरून गेले समजलं नाही.फोटो सापडेल न सापडेल आठवणी मात्र पुन्हा एकदा जाग्या झाल्या.शब्दातून या भेटीचे स्मरण रहावं म्हणून लिहिती झाले.
प्रेमा आईला अखेरचा सलाम !

-प्राची दुधाने

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??