कन्यादान या विधीच्या निमित्ताने..
कन्यादान या विधीच्या निमित्ताने..
हजारो वर्षाच्या भारतातील अनेक कालबाह्य होत असलेल्या धर्म,संस्कृतीच्या नावाखाली चालवलेल्या अनावश्यक रूढी परंपरा यांचे खंडन करून भारतीय समाज हा सातत्याने परिवर्तन करत आला आहे.
आज ही अनेक अशा अनावश्यक रूढी परंपरा समाजामध्ये रूढ असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोयीप्रमाणे अनेक बदल आपण यात केले असले तरी विषमतावादी अनेक रूढी आपण कवटाळून आहोत हे सत्य स्वीकारणं अनेकांना अवघड जात आहे.एकीकडे स्त्री पुरुष समानतेचे शाब्दिक/मौखिक गोडवे गायचे आणि दुसरीकडे मात्र स्त्रियांना संकोचित,अपमानित,
लज्जास्पद,कमीपणा इत्यादी नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल अशा पारंपारिक रूढी धर्माचे,संस्कृतीचे भूषण म्हणून मिरवायचे.ते ही स्त्री जन्मापूर्वी पासून ते मृत्यू नंतर देखील.हा दुटप्पीपणा कळत नकळत समाजामध्ये आज ही प्रचिलित आहे.बऱ्याच औंशी यात बदल होत आहे.तरी यावर अधिक चिकित्सा होणं आवश्यक आहे.हे जवळ पास सगळ्याच धर्मात होत आहे.परंतु मी हिंदू/सनातनी धर्म या विषयीच इथे मांडणी करणारं आहे.कारणं माझ्यासाठी तस करणं म्हणजे आधी आपल्या घरातील केर बाहेर काढणं आहे.याची प्रेरणा इतर समाज बांधव भगिनीं घेतील ही अपेक्षा ठेवूया.
तर सनातनी हिंदू धर्मामध्ये जे विधी होतात ते वैदिक पद्धतीने.पोथी पुराणं यात अनेक रूढी,परंपरा यांचे पालन करण्याचे स्रोत उपलब्ध आहेत.या नुसार आपल्या जीवनातील अनेक टप्पे याला अनुसरून असावेत यासाठी अनेक नियम(बंधने)घालून दिले आहेत.
स्त्री पुरुष दोघांसाठी या रूढी परंपरा आहेत.पण इथे एक सर्वात मोठी समस्यां ही उदभवतें ती म्हणजे यामध्ये बहुतांशी बंधने/नियम ही स्त्रियांसाठी आहेत.स्त्री ही पुरुषांपेक्षा हीन कशी आहे व राहिलं ज्यामुळे पुरुषी वर्चस्व तिच्यावर कायम प्रस्थापित राहिलं याचा बारकाईने विचार केला आहे.असाच एक महत्वाचा विधी म्हणजे विवाह/लग्न विधी.स्त्रियांच्या दृष्टीने फक्त विवाह हा एकच संस्कार समंत्रक करावा,असे धर्मशास्त्रांनी सांगितले आहे.मागे अनेकदा या विषयी मी लिखाणातून व बोलण्यातून मांडलं आहे.परंतु या विषयी जितकं मांडाल तितकं कमीच.याविषयी सातत्यानं व्यक्त व्हायला हवं.अस ही सध्या या सर्वंच विषयांवर बोलण्याची संधी आपसूकच मिळत आहे.याचे कारणं राजकारण्यांच्या माध्यमातून धर्म,संस्कृती,रूढी,परंपरा इत्यादीं विषयी सातत्याने होत असलेली चर्चा,वादविवाद इत्यादी. डावे-उजवे,पुरोगामी-प्रतिगामी सगळेच या विषयी व्यक्त होतात.आपण ही सुवर्णा संधी दवडणे योग्य नाही.
म्हणून आजचा हा लेख प्रपंच.
तर मुख्य विषयांकडे येताना विवाह हा मानवी जीवनातील एक प्रमुख टप्पा समजला जातो.
गृहस्थाश्रमातील प्रमुख महत्वाचा विधी असे संबोधलं जाते.आधीच सांगितल्याप्रमाणे वैदिक परंपरेनुसार बहुतांशी हिंदू(सनातनी)पद्धतीने विवाह होतात.या मधे अनेक विधी होत असतात.महत्वाचं म्हणजे विवाह विना एक पुरुष जीवन जगू शकतो परंतु स्त्रीची आवश्यकता पुत्रनिर्मितीसाठी आवश्यक असल्याने स्त्रीला विवाह बंधनकारक होता.स्त्री रजस्वाला होण्याआधीच तिचा विवाह करून देणं तिच्या पित्याला देखील बंधनकारक होत अन्यथा तो शिक्षेस पात्र होत,अस पोथी पुराणं सांगतात.याचा अर्थ पुरातन काळापासून विवाह स्त्रीसाठी अपरिहार्य आहे.विवाह बंधनात स्त्रीचा सहभाग केवळ मुलं जन्माला घालण्यासाठी व एक भोगाची चीज म्हणून पाहिल्या गेलं आहे यात कोणताच शंका नाही.याच विवाह सोहळ्यातील सध्या काही कारणास्तव चर्चेत असलेला विधी म्हणजे कन्यादान.त्यावर आपण आता बोलूया.
कन्या दान का होते? स्वानुभवावरून सांगायचं झाल्यास मुळात हे परंपरेने चालत आलेल्या रीती-भाती असल्याने फार चौकश्या कोणी करत नाही.हेच आमच्या सोबत ही झालं.माझा विवाह झालेला आता १८ वर्ष उलटून गेली आहेत.सगळे विधी हिंदू वैदिक पद्धतीने पार पडले.यात अगदी टिळा,साखरपुडा,हळद दळण्यापासून ती लावण्यापर्यंत,मंगलअष्टक,सप्तपदी,कन्यादान,कान पिळणे,वगेरे वगेरे सगळे विधी पार पडले..आज लिहितानाच दमछाक झाली.त्या दिवशी काय परवड झाली असेल याची कल्पना करा !
असो ! हे सांगण्याचा मुद्दा हा कि अज्ञान आपल्याकडून काय काय करवून घेते हे आता मागे वळून पाहिलं कि समजतं.यात उल्लेख केलेले बहुतेक विधी अनावश्यक आहेत,आपल्याला हीन ठरवणारे आहेत.तरी पारंपरिक म्हणून,आप्तेष्ठ एकत्र जमतात,आनंदी क्षण निर्माण होतात,छान आठवणी रहातात,समाजाचे एक विशिष्ठ बंधन,दडपण म्हूणन असे विधिवत सोहळा करणं योजलं जात.आमचं असच साग्रसंगीत सोहळ्याचं नियोजन होत. तेव्हा गंम्मत ही वाटली सगळे रीती रिवाज करताना.आता मात्र त्याअंगाने अभ्यास झाल्याने सगळे आठवून हसू येत आणि काहीस खिन्न ही व्हायला होत.विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझं दान दिल,ही कल्पना आता अवघडल्यासारखी वाटते.कारणं कन्यादान म्हणजे वधूपिता आपल्या कन्येचे वराला दान करतो.
दान म्हणजे कोणती अपेक्षा न बाळगता केलेले सत्कार्य.
कन्येच दान हे सत्कार्य??!!
याचा अर्थ जर कन्या दान या शब्दाशी जोडला तर काय समजावं.कन्येच दान करताना पिता कोणतीच अपेक्षा करत नाही का? आपली मुलगी सुखी,समाधानी आयुष्य जगावी ही माफक इच्छा तर असेलच की.परंतु हा विधी मुळात या सर्व अपेक्षांवर पाणी फेरणारा ठरू शकतो हा विचार वधू माता पिता का करत नाहीत? मुलगी लग्न लावून दान दिली की आपल्या कर्तव्यातून आपण मुक्त झालो हे विचार या विधी द्वारे बिंबवण्याचा प्रयत्न होतो.
अस म्हणतात,'धर्म,अर्थ व कामं या बाबतीत तू हिचं अतिक्रमण करू नकोस',अस वचन वधूपिता वराकडून घेतो.खरं तर याचा काही भविष्यात उपयोग होतो का?
हा ही उत्तर माहीत असलेला प्रश्न.
असो ! परंतु या मुळे जे जे विषय समोर येत आहेत ते अत्यंत क्लेशदायक आहेत.काही महाशय तर कन्यादान ही किती भावनिक बाब आहे.याला कोणी नाव कसं ठेवू शकत.अस काही म्हणतं आहेत.खरं तर यामधे भावना स्त्रीच्या (वधू) महत्वाच्या असतात.त्या इथे मात्र कधी विचारात घेतल्या जात नाहीत.वस्तूंबरोबरच सजीवांचे दान होते त्यात पशु वगेरे बरोबर स्त्रीचा समावेश आहे. अस धर्मांधांच म्हणणं आहे.गाई आणि बाई यांच्यानुसार समान व दानास पात्र आहेत.सनातनी धर्माने स्त्रीला कधी मानव मानलेच नाही.स्त्रीची गणना कायम प्राण्यांबरोबर केली गेली आहे.शतपत ब्राह्मणाने सांगितले आहे की
कावळा,कुत्रा,स्त्री आणि शूद्र हे खोटे असतात.
तुलसीदासाचे एक वचन आहे
ढोल गवार शूद्र पशु नारी l
ये सब ताडन के अधिकारी ll
असे खुप काही पुरावे आपल्याला पोथी,पुराणं,पुरातन साहित्य,मनुस्मृती इत्यादीं मधे सापडतील.
खरं तर मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हजारो वर्षाच्या भारतातील अनेक कालबाह्य होत असलेल्या धर्म,संस्कृतीच्या नावाखाली चालवलेल्या अनावश्यक रूढी परंपरा यांचे खंडन करून भारतीय समाज हा सातत्याने परिवर्तन करत आला आहे.तरी बहुसंख्य लोक सोयीप्रमाणे यात बदल करतात परंतु दुसरीकडे या अशा विषमतावादी रूढींना खतपाणी घालत आहेत.मानवी मूल्य जतन करणं अधिक महत्वाचं असताना आपण मात्र आपली संस्कृती आपला धर्म कसा व किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यात अधिक रस दाखवतो.हे सगळं आवश्यक आहे अस पटवलं जात.या सर्वांची आता फारशी गरज नाही,हे अनावश्यक आहे.अस जरी वाटतं असलं तरी परंपरेचा,संस्कृतीचा भाग म्हणून आपण याचे पालन केलेच पाहिजे असा समज अथवा दडपण समाजात आपल्याला दिसत.इथून मागे आणि आता ही हे या पद्धतीने विधिवत लग्न समारंभ पार पडले व पडत आहेत.अज्ञान आणि त्यातून निर्माण केली गेलेली भीती या सगळ्या अनावश्यक बाबींमुळे मनाविरुद्ध आज ही कित्येक लोक या रुढींचे पालन करतात.आपण यांना विरोध केला तर आपण धर्माच्या विरोधात जावू.लोक काय म्हणतील? आपण वाळीत टाकले जावू.आपण हे सगळं नाकारलं तर आपल्या मुलीचे अथवा मुलाचे लग्न होईल का? असे कैक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. खरं तर यातून सुधारित मार्ग अनेक आहेत.त्या मार्गाचा स्वीकार दोन्ही बाजूने व्हायला हवा.पालक असतील अथवा मुलं मुली ज्यांनी कोणी हे बदल स्वीकारण्याचे ठरवले असेल त्यांनी विरोध करण्यापेक्षा चिकित्सा करावी.या अशा विषमतावादी,अपमानजनक, अनावश्यक रूढी परंपरांना पायबंद घालण्यासाठी एकमेकांना पाठींबा द्यावा.
अत्ताचंच एक उदाहरण द्यायचं झालंच तर काही दिवसांपूर्वी आलीया भट आणि रणबीर कपूर यांचा विवाह सोहळा पार पडला.त्या निमित्ताने एका विशिष्ठ घटनेची बातमी वाचनात आली.त्यात वधू पिता महेश भट यांनी आपल्या लेकीला ७ वचनापैकी एक वचन घेवू दिले नाही.त्यांनी आपल्या पत्नीकडून देखील हे वचन घेतलं नव्हतं.ते वचन कोणतं ते आपण पाहू.आलीया जे कोणतं काम करेल ते रणबीरला विचारून करेन अस ते वचन होत.या वचनामुळे काय होवू शकत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.परंतु इथे वडिलांचा आक्षेप असल्याने आलियाने हे वचन दिल नाही.अर्थात त्यांनी इतर सोहळा विधिवत केला.बाकी अनेक विधी रीती रिवाजानुसार पार पडले.तरी या मधे हा एक छोटा बदल,महत्वपूर्ण निर्णय येणाऱ्या भविष्यकाळात ठरू शकतो.अशी उदाहरणं आपण का घेवू नये.बरं अस केल्याने कोणता धर्म त्यांना आडवा आला? त्यांनी कोणाची भीती बाळगली?
इतकंच नाही तर आज समाजात अनेक विवाह सत्यशोधक,शिव पद्धतीने होत आहेत.कोर्टात अनेक लग्न होतात.तिथे हे विधी नसतात.त्यांचा स्वीकार होतोच ना? मग भीती किंवा दडपण कशाचं?
धर्माच्या विरोधात आपण पाऊल उचलून धर्माच्या विरोधात आपण जात आहोत.हे पाप आहे वगेरे विचार पूर्णतः तकलादू आहेत.यामुळे धर्माची हेटाळणी होत आहे अस काहींना जर वाटतं असेल तर ठीक.परंतु जे जे चुकीचे ते थांबायला हवं इतकंच त्या मागचं कारणं.
कारण धर्म मानवाने आपल्या सोयीसाठी सोयीने निर्माण केला आहे.धर्माने मानव निर्माण केला नाही.पण हो आपल्यामधील स्वाभाविक बदल हे मात्र धर्मामुळे झाले आहेत अस म्हणतात येईल.या बदलांद्वारे स्त्री अवमान,
हीन वागणूक दिली जात असेल तर असे विधी नाकारले पाहिजेत.महात्मा फुल्यांनी ते नाकारले.आपण का नाकारू शकत नाही?
माझ्या लग्नात हे विधी केले,म्हणून माझ्या मुलांच्या लग्नात ते व्हावेत मनात असो अथवा नसो हा विचार एकदा तपासून पाहायला हवा.एकीकदे आपल्या लेकीला आदर्शवत जीवनाचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे कन्यादानासारख्या प्रथांद्वारे तीच खच्चीकरण करायचं.
ती एखादी वस्तू,पशु असल्यासारखा तिचा व्यवहार करायचा.योग्य आहे का? आता तर पशूंचे ही सजीव म्हणून अधिकार स्वीकारले जात आहेत.मग स्त्रीचे का नाही? बघायला गेलं तर शब्द,विधी फार छोटे आहेत. परंतु त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची खोली सापडता सापडणार नाही इतके ते खोल रुतले आहेत.यातून स्त्री जीवनावर होणारे घातक पडसाद रोखण्यासाठी स्त्री सन्मान होणं अपेक्षित आहे.आपल्याला ज्या अडकलेल्या जळमाटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपल्या महामानवांनी संघर्षातून उभा केला.आपण त्यात आज ही गुरफटून का पडलो आहोत याचा विचार व्हावा.या विषयी बोलत राहू.तूर्तास इथेच थांबते.
तर या लेखाच्या निमिताने आपण सर्व सुज्ञ वाचक या बाबतचा विचार नक्की कराल ही अपेक्षा आहे.थोपवल्या गेलेल्या या व अशा असंख्य रूढी परंपरांना हद्दपार करण्याची आवश्यकता आहे.सुरुवात आपल्यापासून करूया.मतदान नसून तो जसा आपला मताधिकार आहे. तसेच कन्यादान नसून तो कन्यासन्मान कसा होईल या दृष्टीने पाऊल उचलणे काळाची गरज आहे.
So say no to kanyadan !
कन्यादानाला नकार द्या !
ज्यांना हरकत असेल त्यांनी आपले स्वतःचे विधिवत दान करून घ्यावे.ही कृती सोडा कल्पनाच सहन होते का कळवावे !
महत्वाची टीप - कोणाच्या धार्मिक,सांस्कृतिक, सामाजिक,पुरुषी इत्यादी भावना दुखावण्याचा हेतू अजिबात नाही,अस मी म्हणणार नाही.
स्त्री सन्मानाखातर आपल्या सर्वांचा रोष सर आँखो पर 😊
जय भारत
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
आगदी बरोबरचच आहे,ताई,यापुढे सर्वांनीच कन्यादान,या शब्द प्रयोग करायचं नाही, दान द्यायला ती वस्तू आहे का?यावर सर्व पालकांनी एकदा विचार विनिमय करून योग्य ते शब्द प्रयोग करावे,आम्ही कन्यादान यापुढे नाही करणार,आम्ही आमच्या मुलीला,लेकीला,सासरी नांदायला पाठवणार,ही जशी आमची मुलगी आहे तशीच आपलीही मुलगी आहे,अस समजून तिला योग्य मार्गदर्शन दिलं केलं,तर तिला ही आपल्या आईची उणीव भासणार नाही,पण हे सर्व सोशल मीडियाचा गैर वापर होत आहे,आणि सर्व टी वी चायनल मुळे आपला समाज आणखी खराब बिगडत चाललाय, चायनाल
ReplyDeleteधन्यवाद ! इथे आपला परिचय समजला नाही.जमल्यास तो करून द्यावा.विषयाबाबत बोलायचं तर आपण कोणत्याच गोष्टीची चिकित्सा करत नाही.अगदी किस काढायची आवश्यकता ही नाही.परंतु अविचाराने काही करण्याऐवजी त्यावर आपण हे का करतोय,हे आवश्यक आहे का किमान अशा प्रश्नांची उत्तर तरी शोधावी.त्याशिवाय यातून बाहेर कसं पडणार
Delete