ज्ञानाई सावित्री माई आणि आजच्या तिच्या लेकीं
ज्ञानाई सावित्री माई आणि आजच्या तिच्या लेकी
आज १० मार्च,ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांचा स्मृति दिन.स्वतः शिक्षित होऊन,स्त्रीयांना शिक्षणाच्या वाटा खुल्या करून देण्यापासून ते समाजहिताचे कोणते ही कार्य असो स्वतःला त्यात झोकून देवून आपल्या या मातेने मानवतेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला व तो आपल्याला बहाल केला आहे. आपल्या या सावित्री माईने तुम्हा आम्हा कोणालाचं अज्ञानाची झळ पोचू नये,यासाठी आयुष्यभर प्रखर अशा संघर्षाच्या अग्नीवर ती स्वतः अनवाणी चालली.ज्या स्त्रीया पायपुसण म्हणून झीजत होत्या, त्यांना शिक्षणाचे धारदार शस्त्र सावित्रीमाईने हाती देऊन तीचा उद्धार केला.स्त्रीने शिक्षण घेतलं म्हणजे धर्म बुडतो.स्त्री शिकली की विधवा होते. अशा एक ना अनेक खुळचट समजुती या समाजात रूढ होत्या.या सनातनी विचारांविरोधात लढली ती आपली माय सावित्री.भारतातील पहिली
महिला शिक्षिक होण्याचा बहुमान आपल्या सावित्री माईंना मिळाला.हे सगळं सहन न झाल्याने सनातन्यांकडून अंगावर दगड-गोटे
शेण,शिव्या शापाचा मारा सावित्री बाईंवर झाला.सावित्री बाई या सगळ्याला धाडसाने सामोर गेल्या. यातून एका नव्या क्रांतीचा जन्म झाला.
या क्रांतीची बीज समाजात रुजवण्याचं कार्य फूले दांपत्याने केलं. बदलाची सुरुवात आपल्यापासून होत असते.ती सुरुवात महात्मा फुले यांनी सावित्री बाईना शिक्षण देवून केली.ही समाजसुधारनेची नवी दिशा होती. महात्मा फुले म्हणत,'एक स्त्री शिकली की तिच संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते'. असाच हा समाज सुधारतो. परिवर्तनाचा हा खरा मार्ग त्यांनी आपल्याला दाखला.घरचा दारचा विरोध असून देखील या दांपत्याने परिवर्तनाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवले.स्त्रीयांनी शिकावं,पिढ्यानंपिढ्या होत असलेला अन्याय दूर व्हावे,
बुरसटलेले अनावश्यक विचार यातून त्यांची मुक्तता व्हावी.यातून समाज शहाणा व्हावा. हिचं महात्मा फुले व सावित्री बाई यांची इच्छा होती.
यासाठी त्यांनी १ जनिवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.सुरुवातीला शिकायला येणाऱ्या मूलींची संख्या फक्त ६ इतकी होती.आता ती कोट्यावधी झाली आहे.सावित्री बाईंनी ब्राह्मण मुलींच्या शिक्षणासाठी देखील पुढाकार घेतला.त्या ब्राह्मणांनी सावित्री बाईंचा विरोध केला.तर ज्या सनातनी ब्राह्मणांनी सावित्री माईचा विरोध केला.त्यांनी सावित्री बाईंना आडवायला गुंड पाठवले.जे माईच्या अंगावर येवू लागले.त्या गुंडाच्या एक कानशिलात वाजवून सावित्री बाईंनी आपले रौद्र रूप दाखवले.परत कोणी त्यांच्या वाट्याला गेलं नाही.अशा होत्या सावित्रीमाई.
त्यांनी विधवांसाठी देखील मोठे कार्य उभारले.अत्याचारित तरुण विधवांच्या मुलांसाठी बालप्रतिबंधक गृह निर्माण केले.विधवा स्त्रियांचे केशवपन रोखले.बालविवाह बंद केले.असंख्य हाल अपेष्ठा सावित्री बाईंनी सोसल्या,
मानहानी पत्कारली.पण मानवनेच्या कार्यापासून त्या तूसभरही ढळल्या नाहीत.त्यांनी सगळ्या परिस्थितीला धैर्यान तोंड दिल.
ज्योतिराव फूले गेल्यावर त्यांच्या चितेला अग्नी देखील सावित्रीबाईंनी दिला.
ही भारताच्या इतिहासातील पहिली क्रांतिकारक घटना होती.संघर्षाची आणि क्रांतीची ज्योत महात्मा फुल्यांनंतर ही सावित्रीबाईंनी अखंड तेवत ठेवली.सत्यशोधक समाजाची धुरा साभाळून प्रतिकूल परिस्थिती असून देखील ही माय लढा देत राहिली ते आखेरच्या श्वासापर्यंत. १८९७ साली प्लेगची साथ आली.
हा रोग संसर्गजन्य असून देखील त्यांनी स्वतः प्लेगच्या रुग्नांची सेवा केली.प्लेगच्या रुग्नांची ने आन देखी माईंनी केली.यातच त्यांना ही प्लेगची लागन झाली.अखेरीस १० मार्च १८९८ रोजी सावित्री माईची प्राणज्योत मावळली.
अशा या कर्तृत्वसंपन्न मातेच्या स्मृतिस कोटी कोटी अभिवादन.
या मातेचे जितके आभार मानल, ते कमीच पडतील.पण,खरा प्रश्न हा उद्भवनो ज्याच्यासाठी या आईने इतक्या यातना भोगल्या,संघर्ष सर केला.एक नवी दिशा,मार्ग ज्या तिच्या लेकींसाठी तिने दाखवला,त्या आज काय करत आहेत?
आपल्याला जे सहजपणे मिळत आहे त्यासाठी आपल्या या पूर्वजांनी घेतलेले श्रम आपण फार सहज घेत आहोत का? ज्यासाठी त्यांनी संघर्ष केला ते आपल्याला सहज मिळाल म्हणून आपण उतलो आणि मातलो. ज्या शिक्षणाच आपण अहंकार बाळगू लागलो.आपल्याला गर्व वाटु लागला त्याचा खरा बोध घोण्यास मात्र आपण
विसरलो.अरे एवढच काय तर या आपल्या ज्ञानाई सावित्री माईला,तिच्या पहिल्या मुलींच्या शाळेला,तिच्या विचार आणि कार्याला देखील आपण विसरलो.शिकलेल्या बायका दगडूशेठ गणपतीला जातात.
पण,समोर असलेली जीर्ण झालेली भारतातील पहिली मुलींची शाळा कधी दिसली नाही.मुलींना,महिलांना भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी व कुठें सुरु केली विचारलं,तर त्यांना सांगता देखील येत नाही. किमान इथून पुढे कधी त्या गणपतीला गेल्या तर समोर आपल्या उद्धराची मुहूर्तमेढ जिथं झाली ति जीर्ण वास्तू आवर्जून पहातील आणि थोडी का होईना जाणिव त्यांच्यात निर्माण करेल ही अपेक्षा आहे.
आपल्या माथी लागलेला शुद्रादी शुद्रचा कलंक,दुय्यमपणाची वागणूक यासाठी पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध ही माता भिडली.फक्त आपल्यासाठी ! आपण मात्र आज ही याच पुरुषप्रधान संस्कृतिला खतपाणी घालण्याचं काम बिनचूकपणे करत आहोत.इतर स्त्रीयांवर होणाऱ्या अन्याया विरोधात लढायचं सोडा,साधा आपल्यावर अन्याय झाला तर आजची स्त्री प्रतिकार करत नाही.रुढ़ी परंपर,दैववाद दूर लोटायचं सोडून त्यात शिक्षण घेवून देखील अधिक स्त्रिया गुंतत चालल्या आहेत. विज्ञानवादी दृष्टी कदाचित शिक्षणाने येईल आणि हा समाज सुधारेल अस फुले दांपत्याला वाटल होत.पण शिक्षण घेवून अज्ञानी राहिलेल्यांना काय विज्ञान समजणार आणि परिवर्तन कस होणार ? ज्ञानाची देवता कोण? प्रश्न केला की पटकन सरस्वती उत्तर येत.ज्या सरस्वतीने शिक्षणासाठी काहीच केलं नाही.पुराणांनी जी सरस्वती निर्माण केली आणि आपल्या माथी मारली.तीच शैक्षणिक क्षेत्रात येगदान शोधून सापडणार नाही.सावित्री बाईंचं कार्य जगाने पाहिलं व अनुभवलं.मग खरी ज्ञानाई कोण? अर्थातच सावित्री माई.
पण,उदो उदो मात्र सरस्वतीचा होतो.याला कारणं समाज व्यवस्था.शिक्षण व्यवस्था,राजकारणी,मीडिया हे प्रामुख्याने याला जबाबदार.यात आपला ही तितकाच सहभाग.किमान आता तरी समजून घ्या.आपल्या पुढच्या पिढीला कळूद्या.आपली ज्ञानाई सावित्री माईंचं आहे !
सावित्रीबाईंनी समाजाची स्त्रीयांकडे बघण्याची मानसिकता बदलली होती. पण,ते विचार पुढे घेवून येण्यासाठी आपण कमी पडलो.
तो मनुवादी दृष्टीकोन पुन्हा आपले डोक वर काढू लागला आहे.तो सावित्रीबाईच्या चारित्र्यावर आज घाव घालत आहे.कोश्यारी सारख्या महाभागाच्या माध्यमातून.पण हा अवमान फक्त सावित्रीचा नसून तीच्या समस्त लेकींचा आहे.हे देखील आपल्याला समजू नये इतके का आपण मठ्ठ झालो आहोत.बुदधी, संवेदना सगळं हरपून बसलोय. यासाठी का अट्टहास कला होता सावित्री बाईंनी ? धर्म आणि परंपरेच नाव घेतलं की शिकल्या सवरलेल्या स्त्रीया पण क्षणाचा विचार न करता मान खाली घालून धावू लागतात.
(नंदी दूध पितो,गणपती दूध पितो, कृष्ण आणखीन काय खातो..)
हे बघण्यासाठी रांग लावतात.त्या मागे काही विज्ञान असू शकत हे त्यांचं शिक्षण त्यांना कधी सांगतच नाही वाटतं.
अरे बाई शिकली की त्यांच्या सात पिढ्या नरकात जातात म्हणणारे शिकून मोठे झाले.तुम्ही मञ बसले इधचं स्वर्ग नरक शोधत.इथून मागे १५० वर्षापूर्वी इतका प्रखर
विरोध असताना जर सावित्री माई लढू शकते.आपल्या येणाऱ्या अगणित पिढ्यानंसाठी परिवर्तनाच महासागर निर्माण करू शकते.आपण मात्र स्वतःला संभाळू शकत नाही.इतक्या सवलती,स्वातंत्र्य,अधिकार असून देखील स्त्री नामधारीच राहिली !
ती पुन्हा चूल अन मूल एवढ्यातच अडकली.ज्या शिक्षणाने स्वातंत्र्य मिळवलं आज ते शिक्षण तुम्हाला बांधून ठेवतय.कर्म-कांड,रूढी परंपरा, व्रत वैकल्य,धार्मिक विधी यात तुम्ही अडकला.म्हणजे है शिक्षणाचे उपयश आणि धर्माचे यश म्हणणव लागेल. तुम्ही शिक्षणाचा गैरवापर केला.
जो बदल अपेक्षित होता तो झालाच नाही.आपण पुन्हा उलट्या पाऊली मागच्या बुरसटलेल्या शतकांकडे वाटचाल करत आहोत.ति वेळ दूर नाही,जेव्हा तुमच स्वतंत्र्य हिसकावून घेतलं जाईल.स्वातंत्र्य संपले की तुम्ही आहात त्यापेक्षाही वाईट गुलामागिरीच्या खाईमधे लोटल्या जाल.तेव्हा तुम्हाला आठवण होईल सावित्रीमाईची आणि तिच्या कार्याची.एवढी विषाची परिक्षा घेण्यापेक्षा वेळ असताच सुधारा.तुमच जीवन व्यर्थ चाललच आहे.पण, सावित्रीबाईंचे परिश्रम का पणाला लावत आहात? आज एक नाही असंख्य सावित्रीच्या लेकी समाजात आहेत.एकत्र या,आपल्या या मातेच्या विचारांचा जागर करा.त्याची बीज समाजात पेरा.हा विचार प्रवाह अखंड तेवत राहो यासाठी सावित्रीबाईंचे विचार कृतित उतरवा.आपल्या या मातेच्या जीवन संघर्षाला व्यर्थ जावू देवू नका.अगणिक त्याग तीने केले आहेत.त्या त्यागांची भरपाई होवू शकत नाही.पण,तुम्ही जर त्यांना अभिप्रेत असलेला सत्याची कास धरून,समतेच्या मार्गी जाणारा समाज निर्माण करू शकला तर तेच त्यांच्या कार्याला समर्पित परिवर्तन वादी कार्य होईल.यासाठी समाजात सावित्री एकटी असून सुद्धा चालणार नाही. ज्योतिबा देखील या कार्यात सहभागी हवा.बांधवांनो आणि भगिनींनो एकसंध व्हा.हे मानवहिताचे कार्य हाती घ्या.ज्यामुळे या परिवर्तनवादी कार्यास गती मिळेल.एवढीच या सावित्रीच्या वैचारिक कृतिशील
लेकीचे आव्हान व इच्छा आहे.
सत्य की जय हो
जय भारत
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
वास्तविक आणि परखड मत ताई.. सावित्रीमाई फुलें यांच्या कार्याला सलाम
ReplyDeleteधन्यवाद ताई
Delete