जन्मदिवस वृत्तांत

Late Post !

जन्मदिवस वृत्तांत 

२३ मार्च,माझ्या जन्मदिना निमित्ताने काही तरी वेगळा सामाजिक कार्यक्रम आपण घ्यावा हा विचार
सतत मनात येत होता.२ वर्ष कोव्हीडच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेवून पार पाडले.
पण ते व्हर्चुअल माध्यमातून.प्रत्यक्ष लोकांचा सहभाग असणारा मात्र कोणताच कार्यक्रम घेता आला नाही.
त्यामुळे हा कार्यक्रम कायम स्मरणात राहिलं व त्यातून समाज जागृतीच्या एका नवीन उपक्रमाचा उगम होईल हा हेतू समोर ठेवून कोणता कार्यक्रम घ्यायचा ते ठरवू लागले.१०-११ तारखेला कार्यक्रम घ्यायचा हे निश्चित झालं.पण कार्यक्रम घ्यायचा कोणता? हा प्रश्न काही सुटला नव्हता.१६ तारखेला लोकायतच्या अलका जोशी यांना संपर्क केला.त्यांनी नुकताच महिलादिनानिमित्त महिलांच्या विविध विषयी पुण्यातच शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजन केले होते. अलकाला मी माझी कल्पना सांगितली.जन्मदिनी शॉर्ट फिल्म तुमच्या माध्यमातून आपण अरेंज करू शकतो का अस विचारलं. ती लगेच हो म्हणाली.कोणत्या शॉर्ट फिल्म दाखवायच्या ही चर्चा श्रद्धा बरोबर सुरु होती.२३ मार्च हा शहीद दिवस असतो.वीर भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी उभारलेली क्रांती ही फार मोलाची आहे.त्यांचे स्मरण या दिनाच्या निमित्ताने झालेच पाहिजे अस वाटतं होत.
   त्याचबरोबर सध्या देशातील स्थिती ही विषमतावादाकडे अधिक झुकत आहे.द कश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून द्वेष,भेदाभेद भरभरून पसरवल्या जात आहे.अर्थात त्याबद्दल फार न बोलता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमातून आपण समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,अधिकार,हक्क,कर्तव्य इत्यादी मूल्ये मांडत रहाणं अधिक उपयुक्त ठरेल.
असंख्य घटनांच्या मालिकेतून गेल्या काही वर्षांपासून देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात झोकून देण्याचे कृत्य विकृत मनो व मनुवृत्ती करत आहे.हे रोखण्यासाठी देशाचे सजग नागरिक या नात्याने आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे.यासाठी आपण ही उपलब्ध माध्यमांचा विनियोग सकारात्मक,समाजहितासाठी वापरात आणावा या हेतूने स्वातंत्र्य लढा,त्यात सहभागी असलेले महान व्यक्तिमत्व यांचा त्याग,संघर्ष,कार्य आजच्या समाजाला शॉर्ट फिल्म द्वारे दाखवून जागृत करण्याचा निर्धार केला.मार्च महिन्यातील क्रमश काही ऐतिहासिक घटना म्हणजेच 
१२ मार्च मिठाचा सत्याग्रह,२० मार्च महाडचा सत्याग्रह,२३ मार्च शहीद दिन असे विषय घेवून त्यावर चित्रफीत दाखवायचे ठरले.आणखीन एक स्वातंत्र्य लढ्यातील काहीस प्रकाश झोतापासून दूर राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीरांगणा हौसा आक्का पाटील.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या.काही महिन्यापूर्वी वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.माझे या परिवाराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते. जेव्हा आक्कांविषयीची छोटी चित्रफीत पाहिली तेव्हा ही देखील आपण सर्वांना दाखवावी अस वाटल.आक्कांचा संघर्ष,त्याग,स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आज समाजाला समजायला हवा. म्हणून आक्कांची ही चित्रफीत या यादीत समाविष्ट केली. 
    २० तारखे पर्यंत हेच नियोजन सुरु राहिलं. 
श्रद्धा सतत माझ्या संपर्कात होती.जन्मदिनाच्या कार्यक्रमात ताई हा कार्यक्रम नक्की घ्यायचा आहे का? आपल्याला प्रतिसाद मिळेल का? जन्मदिनी आज पर्यंत असे कार्यक्रम झाले नाहीत.आपण हा कार्यक्रम घेतल्यावर लोकांना त्याचा हेतू समजेल का? आपण दुसरे कोणते विषय घेवू या का? असे एक ना अनेक प्रश्न ती मला करत होती.मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते. आम्ही आणखीन एक दोन फिल्म्स या यादीत जोडल्या होत्या.पण श्रद्धाच मत होत की त्यामुळे थोडं विषयांतर होईल.शेवटी वरती नमूद केलेल्या चार शॉर्ट फिल्म दाखवायचं निश्चित केलं.
    १८ तारखेपासूनच जवळच्या काही मंडळींना कार्यक्रमाची कल्पना देवून ठेवली होती.ते ही आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारून तयारीला लागले.कार्यक्रमाचे नियोजन यजमान नितीन यांनी नेहमीप्रमाणे चोख पार पाडले.
अखेर २३ तारीख उजडली आणि जन्मदिनानिमित्त एका नवीन स्वरूपाच्या सामाजिक कार्यक्रमाची वेळ 
समीप येवू लागली.कार्यक्रमाची वेळ ५:०० वा ची होती. कार्यक्रम उशिराच सुरु होतात कदाचित या अनुभवामुळे अनेक शुभचिंतक थोड्या उशिरानेच आले.त्यामुळे ६:०० वा सुरु होणारा मुख्य कार्यक्रम ६:४५ ला सुरु झाला.अनेक मान्यवर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.विचारमंचावरून मी उत्सवमूर्ती असल्याने सर्वांनीच माझे व माझ्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येकाने आपल्या परीने अनुभवलेली प्राची आपल्या शब्दातून साकारली.आपण काय व कसे आहोत हे जाणून घेण्याचा खरं तर तो एक सुवर्णा क्षण असतो.
ते क्षण मी यथेच्छ अनुभवले.माझी मैत्रिण मेघना झुझुम यांनी उतकृष्ट असे सूत्रसंचालन केले.त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली.
   माझे वडील पंडुरंग थोरात,जेष्ठ मार्गदर्शक श्रीकृष्ण बराटे,म.काँ.पुणे शहर अध्यक्षा पुजा आनंद,माझ्या मार्गदर्शिका शैलजा मोळक,सेवा दलाचे दत्ता पाखिरे, 
जेष्ठ मार्गदर्शक अण्णा राऊत,महा.प्र.काँ. सरचिटणीस स्वाती शिंदे,मा.जि.परिषद सदस्य प्रभाकर भोरखडे,
बंधू अभिजित थोरात,अंनिसचे श्रीपाल ललवाणी,मनसेचे नेते कैलास दांगट,काँग्रेसचे नेते सचिन बराटे,शिव भीम क्रांती संघटनेचे चंद्रकांत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख आदी मान्यवर यांनी आपले विचार व्यक्त केले.
  काँग्रेसचे पुणे शहर ओबीसी अध्यक्ष प्रशांत सुरसे व त्यांच्या पत्नी पल्लवी सुरसे यांनी उपस्थित राहून अलका जोशी यांच्या हस्ते माझा सत्कार केला.
या वेळी माझे थोरले बंधू विक्रांत थोरात देखील उपस्थित होते.
    या औपचारिक कार्यक्रमा नंतर,पुढील महत्वाचा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हा कार्यक्रम दाखवण्यात आला.प्रत्येक फिल्म नंतर श्रद्धा त्या विषयी थोडक्यात माहिती देत होती.उपस्थित सर्व शांततेने या फिल्म पहात होते.
शहीद भगतशिंग यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म मधे त्यांनी आपल्या अवघ्या २३ वर्ष जे जीवन लाभले त्यात देशामधे निर्माण केलेली क्रांती व दिलेले बलिदान पाहून अनेकांच्या अंगावर शहारे तर डोळ्यांत अश्रू तरळत होते.मी तर माझ्यातील भगतसिंग शोधत होते.समोर दिसणाऱ्या भगतसिंगकडून आणखीन खुप काही शिकतं होते.इन्कलाबचा नारा प्रत्येकाच्या मनात उमटत होता.तसाच,भगतसिंग प्रत्येकात सामावत होता.
     याच अनुभवाला धरून पुढे मिठाचा सत्याग्रह आणि महाडचा सत्याग्रह या दोन शॉर्ट फिल्म दाखवल्या. मिठाचा सत्याग्रह केल्या नंतर गांधीजींना व प्रमुख नेत्यांना अटक झाली होती.मात्र सरोजिनी नायडू,मौलाना आझाद सारख्या नेत्यांच्या नेतृत्वात असंख्य भारतीयांनी अहिंसेच्या मार्गाने हा सत्याग्रह सुरु ठेवला.त्यांचे या भूमीवर सांडलेले रुधिर,स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेला त्यागाचे मोजमापन होणं शक्य नाही.तसेच,डॉ.बाबा साहेबांनी केलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह.रक्ताचा एक थेंब ही या भूमीवर सांडू न देता देशाला स्वातंत्र्य मिळावं.या विचाराने समाज व मानवहिताचे अखंड कार्य ते करत राहिले.चवदार तळ्याचा सत्याग्रह समाजातील विषमता दूर करणारी एक महत्वाची ऐतिहासिक घटना म्हणून नोंद होते.याच वेळेस मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.जी मनुस्मृती मानवाला मानव समजतं नाही.वर्ण भेदात अडकवून गरीबांच शोषण करते.तिचा स्वीकार आम्ही करत नाही.हे प्रस्थापितांना ठणकावून सांगण्याचा तो यशस्वी प्रत्यन होता.
   सगळ्यात अखेरीस क्रांती वीरांगना हौसाआक्का यांची शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांच्यावर केलेली ही फिल्म त्यांचा या वयात देखील असणारा करारीपणा दर्शवतं होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी केलेला संघर्ष,त्याग,लढा खुप मोलाचं आहे.तरी,"मी थोडस बारक,बारक काम केलं" असे उदगार काढणाऱ्या अक्का पडद्यावर दिसत होत्या.
ही माणसं उगीच महान होत नसतात.कोणत्याच गोष्टीची परवा न करता स्वतःच देशहितासाठी सर्व काही पणाला लावून लढत असतात.इतकं भरीव कार्य करून देखील आपण इतकं काहीच केलं नाही अस मोकळेपणानं सांगतात.हे भाव व या वयात ही आणखीन काही तरी देशासाठी करू पहाणं हे अस आता कुठें सहजा सहजी पहायला मिळत नाही.या अशा हौसा अक्का मी प्रत्यक्षात पाहू शकले,अनुभवू शकले.त्यांचा सहवास लाभला, मार्गदर्शन घेवू शकले.याचे समाधान कायम राहिलं. दमयंती पाटील,हौसाआक्का यांची नातं.
या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.त्यांनी आक्कांविषयी बोलावं अशी त्यांना विनंती केली.दमयंती ताईंनी आक्कांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटनांना उजाळा दिला.अस रोज रोज होत नाही.
हा अनुभव देखील खुप वेगळा होता.आपल्याकडे जो मौल्यवान ठेवा आहे तो जतन करायला हवा अस वाटतं.तो प्रयत्न आपण वारसा सोशल फाऊंडेशन द्वारे करत असल्याचा आनंद व समाधान कायम राहिलं.या नंतर अलका जोशी यांनी आपल्याला आक्कांविषयी असलेली माहिती ही अति अल्प स्वरूपात होती.आता त्यात अधिक माहिती घेता येईल,कारणं त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य उल्लेखनीय होत अस आवर्जून मत व्यक्त केलं.
आपला उद्देश बहुतांशी इथेच सफल झाल्याची भावना माझ्या मनात घर करून गेली.आपला जागृती करण्याचा हेतू साध्य झाला आहे हे या सर्व शॉर्ट फिल्म दाखवून झाल्या नंतर अनेक उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले त्यातून शिक्का मोर्तब झाले.
  मला अस वाटतं काळाच्या ओघात आपण खुप काही महत्वाची मूल्ये दुर्लक्षित करत चाललो आहोत. इन्कलाब पुन्हा एकदा जिंदाबाद व्हायला हवा ! इन्कलाब म्हणजे क्रांती..क्रांती घडवायची असेल तर थोर विचारवंत,समाज सुधारक,महामानवाचे मानवहिताचे कृतिशील विचार अंगीकृत करायला शिकलं पाहिजे.बदल सहज होत नसतो.त्याची सुरुवात आपल्यापासून करायची असते.समविचारी लोकांनी,संस्था,संघटनांनी एकत्र यायला पाहिजे.एकसंध झाल्याने आपल्या कृतींचा अधिक परिणाम दिसेल.याच विचाराने विविध समविचारी बांधव भगिनींनसह हा कार्यक्रम घेण्याचा छोटासा प्रयत्न केला.या मधे सामान्यातील असामन्या व्यक्ती आणि संस्था यांनी मोलाचे योगदान दिले.सर्वांची नाव घेणं शक्य नाही.तरी इथे काहींचा उल्लेख होणं आवश्यक आहे.तो आवर्जून करत आहे.तरी नजर चुकीने कोणी राहीलच तर मनात राग धरू नये.
   वारसा सोशल फाऊंडेशनचे सर्व शुभ चिंतक,लोकायत,अभिव्यक्ती,पुणे महिला काँग्रेस,शिवभीम क्रांती सामाजिक प्रतिष्ठान,किलबिल प्रतिष्ठान,राष्ट्र सेवा दल,अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व मैत्रिण-मित्र परिवार.तसेच,वारजे कर्वेनगर परिसरातील पत्रकार बांधव.जागृती न्यूजची टीम.वारजे रामनगर मधील सर्व उपस्थित महिला भगिनीं व बांधव.मला नेहमी सहकार्य करणारे आरती घुले,श्वेता पढेर,गीतांजली जाधव,सानिया कुलकर्णी,साहेबराव बनसोडे सर,
भाऊ चव्हाण,दत्ता चव्हाण,दत्तात्रय गायकवाड,
दत्तात्रय शिनगारे सर,मुकेश यादव,अनिल ताडगे,
संदीप मोकाटे,विशाल भेलके,प्रकाश आरने,आलम पठाण,संकेत चरखा सर,सौरभ चौधरी,प्रशांत पवार व परिवार,नितीन हंडे,अनुराधा काळे,अनिल वेल्हाळ, शिवसैनिक संतोष शेलार,आरपीआयचे निलेश आगळे, दत्ता झंजे,काँग्रेसच्या शारदा वीर व राजा भाऊ साठे, सुनीता जाधव आणि परिवार,नम्रता ओव्हाळ असे अनेक शुभचिंतक बांधव भगिनीं यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच अनेक बांधव भगिनीं यांनी सोशल मीडिया,मेसेज,फोन द्वारे आपले शुभेच्छा व आशीर्वाद कळवले.दुधाने लॉन्सचे संपूर्ण व्यवस्थापन पहाणारी समृद्धी आणि सहकार्याचे ही कौतुक वाटते.काय हवंय नको सगळी सोय व्यवस्थित केली होती.महेंद्र मंगल केंद्र यांच्या जेवणाचा स्वाद देखील उत्तम होता.आपल्या सगळ्यांचे आभार मानून इथेच थांबता येणार नाही.आपले आशीर्वाद असेच पाठीशी असुद्या.मी आपल्या सर्वांच्या सदैव ऋणात राहिनं !
  या सगळ्यामध्ये माझी कायम साथ देणारे माझे पती नितीन,मुलं जान्हवी,अभिमान,आई विजया यांचा उल्लेख केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम असो अथवा माझा जीवनपट असो,पूर्ण होवूच शकत नाही.माझी दोन्ही लेकर आपल्या आईचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडावा यासाठी जबाबदारीने सर्व कामे करत होती.त्यांना खुप प्रेम !
   या वर्षी केक कापून जन्मदिवस साजरा करायचा नाही अस ठरवलं होत.त्यामुळे केक कापायच काहीच नियोजन नव्हतं.परंतु बंधू शिवसैनिक संतोष शेलार दादा केक घेवून आले व तो कापण्याचा आग्रह केला.तो आग्रह मोडवला नाही.मग काय कार्यक्रमात असणाऱ्या सगळ्या छोट्या मित्र मैत्रिणींना बोलावून घेतलं.त्यांच्या हातून केक कापून घेतला आणि सगळ्या बालमित्र मैत्रिणींचे तोंड गोड केलं.यासाठी संतोष दादा शेलार यांचे पुनःश्च धन्यवाद !
   तसेच,सर्वांना आव्हानं केल्याप्रमाणे आपण पुस्तकं रुपी भेट व आर्थिक मदत देखील काही बांधव भगिनींनी केली.त्याचा स्वीकार करून गरजूं पर्यंत ही मदत पोचवण्याचे माझे कर्तव्य मी निश्चित पार पाडेल अशी ग्वाही देते.या माध्यमातून ₹ ५,०००/- किमतीची ग्रंथ संपदा भेट स्वरूपाने प्राप्त झाली आहे याचा विशेष आनंद वाटतो.त्यासाठी सर्वांचे अनेक आभार.
   शेवटी इतकंच लिहिलं,असे उपक्रम आपण सर्वांनी आपल्या जन्मदिवस अथवा इतर कोणत्या ही सण समारंभात घेवू शकता.ज्यामुळे समाज व मानवहित जोपासले जाईल.आपल्या हातून सकारात्मक कार्य पार पडेल.देशाच्या खऱ्या प्रगतीचे आपण वारसदार होऊया.असे उपक्रम घेण्यासाठी कोणती ही मदत मार्गदर्शन पाहिजे असल्यास जरूर कळवावे.
कार्यक्रमाचे इतर फोटो व व्हिडीओ लवकरच पोस्ट करेन.

आपली विश्वासू, 
प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??