गुरु पौर्णिमा
गुरु पौर्णिमा
गुरु..शब्द छोटा असला तरी,या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे.जो आपल्याला त्यांनी संपादन केलेले सर्व ज्ञान त्याबदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता दान करतो आणि अज्ञानाकडून ज्ञानाचा मार्ग दाखवतो तोच खरा गुरु जाणावा.चुकीचे ज्ञान देणारी व्यक्ती गुरु असूच शकत नाही.पण,चुकीचे कर्म करून तुम्हाचा सतत छळ करणारी व्यक्ती देखील तुमचा गुरु असू शकते हे मान्य करण्यास हरकत नाही.इथे,जर त्यांच्या चुकीच्या कृतीला तुम्ही विरोध केलात,बंड पुकारलात,विद्रोह केलात,
सकारात्मकतेकडे एक पाऊल टाकलं,आपल्यात शुद्ध परिवर्तन केलंत तरचं आपण त्या कुव्यक्तीला गुरु म्हणू शकतो.खरं तर इथे आपणच आपले गुरु होत असतो,कारण वाईट ओळखून त्याला विरोध करणं हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.असे असले तरी माझ्या मते आपल्याला कमीपणा आणणारे,अपमानित करणारे,आपल्याशी विनाकारण स्पर्धा करणारे,इत्यादी सर्व आपले गुरु होवू शकतात.बरं हे कोणी ही असू शकतात.ओळखी-अनोळखी,आप्तेष्ठ,
मित्र-शत्रू,कोणी ही.हे आपले आदर्श गुरु असतात.हे आपल्याला आयुष्यात काय करू नये हा धडा देतात, त्याचबरोबर अनन्यसाधारण असे काही करून दाखवण्याचे बळ आपल्यात निर्माण करतात.
विचार करून बघा !
असंख्य विचारवंत,महानायक,महानायिका,लेखक इत्यादी व्यक्ती आहेत त्यांच्या विचारांना,कृतीला अशा (कु)गुरुमुळे वेगळे पण महत्वाचे वळण प्राप्त झाले आहे.
महात्मा फुले..त्यांना जर कोणी अपमानित केलं नसतं,तर कदाचित त्यांच्या हातून एवढं महान समाजहिताचा कार्य घडलं असत का?अर्थात इथे फुलेंच्या बुद्धिमत्तेबाबत अथवा त्यांच्या कार्याबाबत कोणते ही नकारात्मक भाव मनी नाहीत.पण या सर्वाला कोणी तरी निमित्त मात्र झालं हे महत्वाचं.तसेच,बाबासाहेब यांच्याबाबत.त्यांच्या जीवनात जर हे असे नकारात्मक गुरु नसते तर कदाचित आज आपण ओळखतो ते बाबासाहेब देखील नसते.म्हणून आपल्या जीवनात असे जे असंख्य गुरु विना पगार आपल्याला जीवनाचा अनमोल बोध देत असतात त्यांना आवर्जून आजच्या दिवशी एक वदंन तो बनता हैं !🙏कारण गुरु हा गुरूच असतो..
याला अनुसरून पुढे...
आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतात.काही क्षणाचे साथी,तर अनेक आयुष्यभरासाठीचे सार्थी बनतात.पण ह्या लोकांमध्ये काही लोक असेही असतात जे आपल्याला आयुष्यभरासाठी धडा देऊन जातात.अर्थात ते धडे चांगले की वाईट हे आपण ठरवायचं.हा धडा गिरवणाऱ्या व्यक्तींचं वय महत्त्वाचं नसतं.माझ्या अनुभवाप्रमाणे अगदी लहान बालका पासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही आपल्याला अक्कलहुशारीचे डोस पाजू शकतात हे लक्षात ठेवा.अनेक अनुभव वाईट असतात,त्यातूनच आपल्याला शहाणपण आलं तर येत..नाहीतर,ये रे माझ्या मागल्या ! अनेकदा काही क्षणाची शिकवण लोक देऊन जातात,पण ते आयुष्यत बदल घडवणारे असतात.सांगण्याचे तात्पर्य एवढच की माझ्याही आयुष्यात असे अनेक लोक आले,येत असतात,
येत राहतील.जे मला चांगल्या वाईट अनुभवाद्वारे आयुष्यत काहीही झालं,कुठलाही प्रसंग आला तरी त्याला धीराने तोंड देण्याची,सत्य व सरळ मार्गावर चालत राहण्याची शिकवण देऊन जातात.
ज्यामुळे ही माझ्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये अनेक चढ-उतार अनुभवू शकले.
आयुष्याचा धडा गिरवायला शिकवणाऱ्या, हसवणाऱ्या, रडवणाऱ्या,घडवणाऱ्या,
बिघडवणाऱ्या,पाडणाऱ्या,
आधारदेणाऱ्या,मान देणाऱ्या,अपमान करणाऱ्या,आपलंस करणाऱ्या,दूर लोटणाऱ्या,मला साथ देणाऱ्या तर माझी साथ सोडणाऱ्या..मला हे व असे कैक अनुभव देणाऱ्या,पण संघर्षातून यशाची चव चाखवणाऱ्या माझ्या सर्व थोर गुरुजनांना आज गुरु पौर्णिमेनिमित्त मानाचा मुजरा !
मुजरा सर्व थोर विचारवंत,समाजसुधारक,वीर, विरांगणा,महामानवांना !
मुजरा आई वडिलांना !
मुजरा जोडीदाराला व मुलांना !
मुजरा लिहायला वाचायला शिकवणाऱ्या शिक्षकांना !
मुजरा मित्र परिवार व आप्तेष्ट यांना !
शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुजरा निंदक व हितशत्रू-मित्र यांना..!!
आपलीच
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment