जागतिक पुस्तकं(ग्रंथ)दिन World Book Day !
जागतिक पुस्तक(ग्रंथ)दिन
World Book Day
२३ एप्रिल,जागतिक पुस्तक दिन !
पुस्तकाने मला काय दिले असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर त्याला उत्तर एकच असेल.पुस्तकाने माझ्या विचारांच्या पंखांना बळ दिले,योग्य दिशा दाखवली व माझे आयुष्य समृद्ध केले.
पुस्तक कधी माझे नातलग बनले,तर कधी माझी त्यांच्याशी घट्ट मैत्री जमली आणि त्यांच्यावर प्रेम ही जडलं.माझे विचार,कृती हे मला अनेकदा गर्दीतून अलगद वेगळ काढत(आज ही).आपण एकटेच असे आहोत का? असे प्रश्न एकेकाळी मला भेडसावत.पण जेव्हा पुस्तकं वाचू लागले,समजून घेऊ लागले तेव्हा उमगलं. आपल्यासारखे अनेक घडून गेलेत व आहेत.त्यांच्या लेखणीची धार माझ्या विचारांना आणखीन तीक्ष्ण बनवू लागली.पुस्तकांच्या मागे ज्ञानाचा महापूर असतो,हे तेव्हा समजलं.पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा लागतो हे ही तेवढंच महत्वाचं.चार बुकं शिकून कोणी शहाण होत असं नाही.ती चार बुकं डोक्यात घेऊन त्याप्रमाणे कृती करणं म्हणजे खरं ज्ञान संपादन करणे.
कोणीतरी खूप छान उदाहरण दिले आहे.जो पुस्तक वाचतो तो हजार आयुष्य जगतो,पण जो वाचतच नाही तो एकच जगतो.मला तर पुस्तक जवळ असलं तरी श्रीमंत असल्यासारखं वाटतं.घरभर पुस्तकं पसरली आहेत.झोपताना उश्याला घेतलं तरी छान झोप लागते.
मी कुठे ही गेले तरी माझ्याकडे एक छोटं का होईना पुस्तक असत.वेळ मिळेल तेव्हा ते काढून वाचायचं आणि त्या सुखी क्षणाचा आनंद लुटायचा.आता मोबाईल वर ही काही पुस्तकं मिळतात.त्याचा देखील पुरेपूर फायदा घेते.
तरी,प्रत्यक्ष पुस्तक वाचन एक वेगळाच अनुभव असतो.
माझ्या आनंदात,दुःखात,आयुष्याच्या अनेक चढउतारांमध्ये पुस्तकांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे.एखाद नवीन वेगळं पुस्तक बघितलं की वेगळाच आनंद मिळतो,जो शब्दात मांडणं कठीण आहे.
हो,पण आता तर सुरुवात आहे.अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत.आत्तापर्यंत ०•०००१% पण वाचून झालेले नाहीत.पुस्तकांच्या गर्दीत स्वतःला शोधायला मला आवडतं.कारण तिथे आपली आपल्याला नव्याने ओळख होते.एकदा पुस्तक हातात असले की गर्दी असली तरी अलिप्त असते आणि एकटी असले तरी त्या लेखकाच्या विचारांच्या गर्दीत हरवून जाते.
तिथं फक्त मी,पुस्तक आणि एक कप कॉफी एवढच ! बाकी हळू हळू सगळं धूसर होत जात..
हो,पण मधली काही वर्ष पुस्तक हा प्रकार फक्त घेऊन आणून ठेवणे एवढाच उरला होता.कधी हातात घेतलं आणि वाचल,असं होतच नव्हतं.तेव्हा काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं.मग कधीतरी ते पुस्तक उघडायचं आणि त्याच्या पानांचा सुगंध आला तरी मन भरून यायचं.कधी कधी वाटायच आपल्याला वेड लागला आहे की काय? पण पुढे वाचनातूनच समजलं,याला बिबलीऑजमिया(BIBLIOSMIA) असं म्हणतात.हो उच्चार अवघड आहे पण अर्थ तेवढाच सोपा.बिबलीऑजमिया म्हणजे एखाद्या चांगल्या पुस्तकाचा सुगंध.हा सुगंध मन प्रसन्न करून जातो.आपण असे एकटे नाही,हे समजल्यावर कुठे जरा जीवात जीव आला.
माझ्या दोन्ही मुलांच्या जन्मापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र वाचले होते.आताच्या तुलनेत तेव्हा ते फार झेपलं नव्हतं. पण,आपल्याला येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार घडवायचे,म्हणून प्रयत्न होता.आताही तोच प्रयत्न सुरू आहे व त्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.मुलं लहान वयातच वाचून,समजून,शिकून,लिखाण करून समृद्ध होत आहेत.यासारखं समाधान नाही.
मला नेहमी वाटत एखाद्या व्यक्तिचा मूळ स्वभाव काय आहे,हे समजून घ्यायचं असेल तर तो किंवा ती काय वाचते याचा शोध घ्यावा.मला तर उत्तम अनुभव आहे.तुम्ही करून बघा.काहींना तर वाचनाच व्यसनच असत.आपल्याला व्यसन म्हंटलं तर काहीतरी वाईट असं वाटतं.पण पुस्तक वाचायचे व्यसन हा मार्ग कधी चुकू आणि चुकवू शकत नाही.पण हो एक मात्र,विध्वंसक प्रवृत्तींचे लिखाण,मानसिकता हे तर निश्चितच वाईट. त्याची दक्षता मात्र घ्यावी.पुस्तकं कोणती वाचावी याला मर्यादा नाही.सगळ पिंजून काढा.पण त्यातून काय योग्य,अयोग्य याची छाननी करून पुढे जावे.
मी निश्चित वाचन वेडी आहे.पण कधी काय आवडेल सांगता येत नाही.एकदा पुस्तकं बघितली की सगळी आपल्याकडे असावी अशी मनाला हाव वाटते.संधी मिळाली की बरीच पुस्तकं घेते सुद्धा.लगेच वाचता आली नाही तरी ठीक,पण त्यांच्याकडे बघितलं की आपल्या ओठांवर आपसूक हसू उमटत.आपलेपणाच समाधान दाटून येत.
चांगल्या पुस्तकांमुळे मूर्खपणा निश्चित दूर राहतो.
आणि सध्या काळात तर ते फार महत्त्वाचा आहे.गेल्या वर्षभरात तर काय काय वाचलं आणि लिहिलं याची यादीच बनेल.खूप उभारी दिली या पुस्तकांनी अनेकांना.त्यात मी ही एक.पुस्तकं आपल्याला वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतात.त्याला जादुई दुनिया म्हणतात येईल.आपण शेकडो,हजारो वर्ष मागे भूतकाळात देखील डोकावून येतो.
माझी मुलं मला ब्युटी अँड द बीस्ट
(BEAUTY AND THE BEAST)मधली बेल(BELLE)म्हणतात.ती सतत वाचनात गुंग असते.
हो ही एक काल्पनिक कथा आहे,जी फ्रेंच कादंबरीकार गॅब्रिएला सुझानने डी विलेनेउवे यांनी १७४० मध्ये लिहिली होती.ही जरी परिकथा(fairy tale)असले तरी मला खूप भावते.कारण परी कथेत पहिल्यांदा असं दाखवलं आहे की एक नायिका आपल्या नायकाला वाचवते.हा विचार किती वेगळा होता त्या काळी आणि आत्ता देखील.हे अन्वेषण (explore)केल्या शिवाय समजतं नाही.म्हणून वाचा.भरपूर वाचा आणि आपल्या विचारांना कल्पनेबाहेर दूर दूर मुक्तपणे विहार करू द्या.
ज्या काळात आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही,जे अनुभव आपल्याला घेता आले नाहीत.तिथे या पुस्तकाच्या माध्यमातून सफर करा आणि एक वेगळाच अनुभव घ्या व समृद्ध व्हा !
शेवटी एक लक्षात ठेवा,वाचाल तर वाचाल नाही तर आयुष्य व्यर्थ वाया घालवाल !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment