बालपण !

मला पुन्हा एकदा बालपण जगायचं आहे..
मोठं होवून चंद्रावर जायचं !
हे स्वप्न पुन्हा गिरवायचा आहे.. 

आई-वडिलांच्या राज्यातील बालपण मोठे झालो की राहून राहून आठवत.लहान असताना कधी एकदा मोठे होतोय असं वाटत असतं.पण खरंच मोठेपण अंगी चढल की ते बालपण सुखदायी असल्याचे जाणवू लागतं. आई-वडील राजाराणी आणि आपण त्यांचे राजकुमार राजकुमारी.त्यांच संपूर्ण विश्व आपल्या भोवती फिरत असत.ते लाड,हट्ट पुरवणं संपुच नये असं वाटतं. आई-बाबा आहेत तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही हा विश्वास किती मोठा असतो.तो शब्दात कधीच मांडता येत नाही.
  आपलं बालपण तर्कवितर्क यांना भेदून एका वेगळ्याच विश्वात भ्रमण करत असतं.आपण चंद्राला मामा समजू लागतो.त्याच्याशी एक वेगळेच आपलेपणाचा घट्ट नातं निर्माण होतं.अंधार पडला की त्याची वाट बघू लागतो.तो दिसला की आनंद गगनात मावेनासा होतो.आपल्या ह्या गमतीशीर मामाला कधी भेटायचं हा प्रश्न एक कोडंच बनून राहतो.कधी रुसून फुगून बसतो,चंद्रावर जायचा हट्ट धरतो.मग आपली समजूत काढली जाते.पण हे चंद्रावर जायचे स्वप्न गिरवता गिरवता आपण कधी मोठे होतो कळतच नाही.आपण बालपणीच्या आठवणीत गेलो की अशा गमतीशीर गोष्टी आठवून आपण किती वेडे होतो असं वाटतं.पण ते बालपण ह्या मोठेपणापेक्षा कितीतरी पटीने सकारात्मक वाटत.कधीतरी पुन्हा बालपणात परतावं वाटतं.काही अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायला. आईच्या कडेवर,बाबांच्या खांद्यावर,गावाकडच्या पारावर बालपण पुन्हा अनुभवायचा आहे.
चेहऱ्यावर फिरलेले ते मायेचे स्पर्श,त्या प्रेमाच्या भावना साठवून घ्यायच्या आहेत.बिनधास्त,निर्धास्त,उनाड होऊन मुक्तपणे बागडायचं आहे.राहून गेलेल्या अनेक इच्छा पूर्ण करायच्या आहेत.आयुष्यातून अनेक प्रेमाची माणसं निसटून गेली आहेत.त्यांना पुन्हा एकदा डोळे भरून बघायचं आहे.त्यांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायचं आहे,तुमची कमतरता खूप जाणवते.त्यांच्याकडून काही गोष्टी पुन्हा ऐकायच्या आहेत.आई-बाबांची तक्रार करायची आहे.असं खूप काही मनातलं मांडायचं आहे.
  बालपण आयुष्यातील महत्त्वाच ठिकाण.त्यातील आठवणी घट्ट धरून ठेवल्या आहेत.त्या मोठेपणाच्या विश्वास कैद झाल्या आहेत.बालपण पुनर्स्थित होत नाही.पण मनाच्या एका कोपऱ्यात ते सदैव जिवंत ठेवता येतात.मी ठेवल आहे.भूतकाळाची ओढ आपल्याला आठवणींच्या कप्प्यातून बालपणात घेऊन जाणार नाही तर नवलच म्हणावे लागेल.त्या गमती-जमती,छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद,रुसवे-फुगवे,पण तितक्याच लवकर ते दूर होत.कायमची भांडणं आणि कायमची गट्टी असं काही नव्हतंच तेव्हा.कट्टी केली की बारा महिने बोलू नको म्हणणारे आपण बाराव्या सेकेंदाला बोलायला लागायचो.कागदाच्या नावेत विश्व सामावून जायचं.
बाहुली कोणाची ही असो तीच लग्न मात्र थाटात लावायचो.भातुकली सगळ्यांच्या घरातील सामग्री असल्यास शिवाय पूर्ण झालीच नाही कधी.खाऊ वाटून खाण्यातच आनंद होता.पण मोठे होता होता इतकं काय ते व्यवहार ज्ञान आपण आत्मसात करतो समजत नाही.निस्वार्थी प्रेम स्वार्थात कसं बदलत हा संशोधनाचा विषय वाटतो.काहीच बदलत नाही असं वाटतं,पण एकदा मागे वळून पाहिलं की जाणवतं.आपण खूप काही मागे सोडून आलो आहे.सगळं खूप बदललं आहे.पण या सगळ्यातून ही त्या सुखद लहरी आजही ध्वनी निर्माण करतात.त्या बालपणीच्या प्रसंगांना जिवंत ठेवतात.गरज आहे ती फक्त आपल्यातील ते मूल जिवंत ठेवण्याची.मग बघा मोठं होऊन मनातलं मूल जिवंत ठेवून देखील चंद्रावर जाण्याचे स्वप्न गिरवता येतं !

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??