वारसा सोशल फाऊंडेशन आयोजित व्हर्चुअल जिजाऊ जन्मोत्सव १२/०१/२०२१
सर्वांना जय जिजाऊ
१२ जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव निमित्त वारसा सोशल फाउंडेशन वतीने व्हर्चूअल जिजाऊ जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.गुगल मीटच्या माध्यमातून साधारणपणे दीड तासाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कोविडच्या या काळात अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.पण १२ जानेवारी साजरी करत असताना असणारी काळजी व उत्साह दोन्ही लक्षात घेऊन वारसा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून मी हा व्हर्चुअल कार्यक्रम घेण्याचे ठरवले.प्रबोधन होण हा वारसाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.सत्य इतिहासाबरोबरच काळासोबत पुढे पाऊल टाकणं तितकंच महत्त्वाचं असतं.म्हणून सत्य इतिहासाच्या प्रबोधना बरोबर तंत्रज्ञानाचे ज्ञान असणंही आवश्यक आहे.या कार्यक्रमातून दोन्ही बाबी साध्य होण्यास व एकमेकांशी संवाद व चर्चा करण्यास निश्चित सकारात्मक परिणाम झाल्याचे लक्षात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जान्हवी दुधाने(माझ्या लेकीने)जिजाऊ वंदना घेऊन केली.प्रास्ताविक(मी) प्राची दुधाने यांनी केले.वारसा सोशल फाउंडेशनचा उद्देश,वर्चुअल कार्यक्रमाची संकल्पना या विषयी माहिती दिली.पुढील काळात असे अनेक कार्यक्रम घेऊन जागृती निर्माण करण्याचे कार्य वारसा करणार असल्याचंही सांगितलं.
अंजली मोटे,सुवर्णसंध्या धुमाळ,दमयंती पाटील या प्रमुख वक्त्यांनी अतिशय महत्त्वाच्या भूमिका सविस्तरपणे मांडल्या.तसेच पिया पाटील,रेश्मा यादव, शिल्पा गावडे,प्रगती हेगडे यांनी आपल्या भावना व विचार या माध्यमातून मांडले.पुढे सविस्तर या बद्दल लिहित आहे.वृषाली गोवर्धने व सुषमा शितोळे यांनी ही थोडक्यात कार्यक्रमाविषयी मत व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या विविध भागातून या सर्व महिला भगिनी जोडलेल्या होत्या.प्रथमच आम्ही सर्व गुगल मीट या वर्च्युअल माध्यमाचा वापर करत होतो.काही तांत्रिक बाबींमुळे व्हिडिओचा ऑडिओ म्हणजे आवाज स्पष्ट रेकॉर्ड झाला नाही.म्हणून सोबत व्हिडिओ पाठवता आला नाही.या सगळ्या चूकभूल लक्षात घेऊन पुढील कार्यक्रम आणखी नियोजन बद्ध करण्याची ग्वाही देते.
अंजली मोटे यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विषयी विस्तृत अशी सत्य इतिहासाची मांडणी केली. जिजाऊ केवळ एक पत्नी,माता,आजी इत्यादी म्हणून पूजनीय नाही तर त्यांचे कर्तृत्व त्याहून अधिक आहे.एक खमकी,लढवय्या व राज्यकर्ती जिजाऊ.नवरसांचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कसा उपयोग केला याचे वर्णन त्यांनी केले.कधी मृदू तर कधी कठोर,कधी गूढ तर कधी मनमोकळ्या अशा जिजाऊ भासत.एकीकडे धाराऊच्या शिदोरीची जबाबदारी मायेने स्वीकारणारी प्रेमळ जिजाऊ तर दुसरीकडे अफजल खानाच्या विरुद्ध शिवरायांना लढण्यास सज्ज करणाऱ्या काहीशा कठोर वाटणाऱ्या जिजाऊंचे वर्णन त्यांनी केले.पारंपरिक व्यापकतेच्या पलीकडे असणारी स्त्री म्हणजे जिजाऊ,खऱ्या अर्थाने सर्वगुण संपन्न होत्या.त्यांची वैचारिक व्यापकता व कर्तृत्व नव्याने अभ्यासून मांडण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.आजच्या स्त्रीने याचा उपयोग कुशलतेने करावा असं त्यांना वाटतं.आपल्यासमोर त्यांनी सुंदर शब्दात जिजाऊ उभ्या केल्या.त्याचं बरोबर वारसाच्या कार्याचे कौतुक ही त्यांनी केले.
सुवर्णसंधी धुमाळ यांनी सत्य इतिहासा विषयी प्रबोधन व त्या पुढील धोके यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आ.ह.साळुंखे तात्या यांनी सत्य इतिहासाचा उलगडा करताना अनेक ग्रंथ लिहिले आहेत.त्यांचा अभ्यास करून महामानव,वीर,वीरांगना हे प्रत्यक्षात काय होते याची जाणीव व माहिती घेण्यास निश्चितच मदत होईल,असे त्या म्हणाल्या.शिवाय शिवराय घडवायचे असतील तर जिजाऊनी जे संस्कार शिवरायांना दिले ते आपल्या पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे.त्यासाठी आ.ह.साळुंखे यांचे शिवराय संस्कार शिक्षण हे पुस्तक वाचावे असंही त्या म्हणाल्या.जिजाऊंचे कर्तृत्व हे शब्दात मांडणे इतकं साधं सोपं निश्चित नाही.पण ते मलिन करण्याचे कार्य निश्चित झालं.त्यामुळे खोटा व चुकीचा इतिहास समाजात रुजला.हा सर्वात मोठा धोका आहे.हा वेळीच ओळखून व समजून त्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे.आजच्या स्त्रीने बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात कार्य करताना जिजाऊंसम कर्तव्यदक्ष असावं असं ही सुवर्णसंधी म्हणाल्या.जिजाऊंचा चरित्र व्यापक आहे.ते अभ्यासून समजून पुढच्या पिढीला ते माहिती करून देणं हे कार्य आपण आज करणं आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं.
दमयंती पाटील यांनी थोडा वेगळा पण महत्त्वाचा विषय मांडला.आपण जिजाऊ आहोत हे स्त्रीया सांगत,बोलत असतात.पण जिजाऊ होणं इतकं सोपं नाही.ज्या अनावश्यक रूढी-परंपरा इत्यादींची होळी जिजाऊंनी केली ते आजची शिकलेली स्त्री का करू शकत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आम्ही जिजाऊसारख्या आहोत हे म्हणून होत नाही.त्यांचे गुण कृतीत असणं महत्त्वाचं आहे,असं त्यांनी मत व्यक्त केलं.
पिया पाटीलने आपल्या अवघ्या काही महिन्यांची लेकी सह्याद्री सोबत कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले मत व्यक्त केले.जिजाऊं विषयी कविता,गाणं व आपले मत मांडून तिने जिजाऊंचे शौर्य कथन केले.तरुण पिढीने हा पुढाकार घेणे किती महत्त्वाचा आहे हे त्यातून जाणवलं.कारण संस्कार हे असेच घडत असतात. वैचारिक वारसा एका पिढीद्वारे पुढच्या पिढीला देत राहण गरजेचे आहे.ते पिया सारख्या तरुण मुली-मातांच्या माध्यमातून कार्य घडो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.
रेश्मा यादव या शिक्षिका आहेत.या ग्रामीण भागात शिकवतात.त्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थिनींची अवस्था त्यांनी काय आहे याचे वर्णन केले.एक शिक्षिका म्हणून त्या पूर्ण प्रयत्न निश्चित करत आहेत वैचारिक बदल घडवण्याचा.पण पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. एकीकडे जिजाऊ जन्माला यावी म्हणतात आणि आली तर दुसरीकडे त्यांना शिकून पण देत नाहीत.कोवळ्या वयात शिक्षण अर्धवट सोडून त्यांचे लग्न लावले जात. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.समाजात व विशेष पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कार्य होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.शिवाजी घडावा,पण आज स्वतःला जिजाऊ म्हणवणारी स्त्री कशी मुलांना हे करू नको ते करू नको म्हणत रोखत असते.मग शिवबा घडणार कसा ? हा सवाल त्यांनी एका कवितेच्या माध्यमातून उपस्थित केला.
प्रगती हेगडे ह्या कागल येथील एका गावातून आपल्या सोबत जोडलेल्या होत्या.प्रथमच वर्च्युअल माध्यमातून त्या बोलत होत्या.विशेष म्हणजे काहीतरी मांडण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता.वारसा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिला- मुलींना आत्मविश्वासाने व्यक्त होण्याचे धैर्य व बळ मिळण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.त्याद्वारे आजपर्यंत अनेक भगिनी लिहू व बोलू लागल्या आहेत.आपलं मत व्यक्त करू लागल्या.याचा वैयक्तिक मला अतिशय आनंद आहे.प्रगती सारख्या अनेक महिला पुढे येतील व स्वावलंबी बनतील हेच कार्य जिजाऊंच्या स्मृतीस अभिवादन होईल.
शिल्पा गावडे यांनीही आपल्या विशिष्ट शैली मध्ये जिजाऊंच्या जीवनावर थोडक्यात आपले मत व्यक्त केले.
अनावश्यक रूढी परंपरा यांना मूठ माती देवून, इतिहासामध्ये नुसतं न रमता त्यातून बोध घेऊन,
सत्य इतिहास संशोधन व प्रबोधन होणे,जिजाऊंच्या वैचारिक कृतीचा वारसा चालवणे,एकमेकांना सहाय्य करून प्रगतीपथावर मार्गस्थ होण या व अशा अनेक विषयांची चर्चा या माध्यमातून झाली.वर्च्युअल माध्यमाचा वापर व उपयोग या अशा बाबींसाठी व्हावा हे मत अनेकांनी मांडले.त्याचप्रमाणे पुढील नियोजन कसं व काय असावे या विषयी ही चर्चा झाली.
१२ जानेवारी २०२१ रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त व्हर्चुअल कार्यक्रमाचा वारसा सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व बांधव भगिनींना शुभेच्छा व सहभागी महिला भगिनींचे आभार व्यक्त केले.तसेच जिजाऊंवर लिहिलेली कविता जिजाऊंना समर्पित केली.जिजाऊंना पुन्हा एकदा अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी माझी लेक जान्हवी व मुलगा अभिमान यांनी मला प्रोत्साहन दिले.तसेच संपूर्ण कार्यक्रमात ते सहभागी झाले व मार्गदर्शकांचे विचार ऐकून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला याचा अभिमान वाटतो.अशीच संस्कारांची शिदोरी वारसा हक्काने पुढे वृद्धिंगत होवो व यासाठी बुद्धी आणि बळ मिळो हिचं जिजाऊं चरणी
प्रार्थना !
ll जय जिजाऊ ll
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment