सरते वर्ष..

सरते वर्ष..

२०२० हे वर्ष सुरु होण्यापूर्वीच विश्वावर कोरोना सारख्या जागतिक महामारीचे सावट उभ ठाकलं होतं.संपूर्ण जग एकाच वेळी भयभीत झाल असावा अशी स्थिती.
मानवाने कितीही प्रगती केली तरी मृत्यूला तो रोखू शकत नाही.याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याशिवाय राहत नाही.कोरोना विषाणू मानव निर्मित असल्याचेही समजले.त्यात किती तथ्य माहीत नाही.पण या विषाणूने असंख्य माणसं गमावली हे नाकारून चालणार नाही.२०२० हे वर्ष तस भीतीच्या सावटाखाली गेलं.अजून धोका टळला नाही.पण मानवाने जणू ह्या कोरोनाच अस्तित्व स्वीकारला आहे,अस जगतोय.
   २०२१ हे वर्ष तरी किमान आशादायी असावा ही  माझ्यासारखी अपेक्षा व इच्छा बहुसंख्य लोकांची असावी.या वर्षीचा संकल्प आहे त्यात कसे सुरक्षित राहावं हा विचार व्हावा.सर्वांचे दैनंदिन जीवन किती विस्कळीत झाला आहे याची कल्पनादेखील करवत नाही.नोकऱ्या नाहीत,शाळा असून नसल्यासारखी, मोकळेपणाने कुठं-कुणाकडे जाणं-येणं नाही,मानसिक व शारीरिक ताण,आर्थिक विवंचना,आरोग्य विषयी चिंता अशा अनेक समस्या सोबतीला आहेतच.
  २०२० या वर्षात अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला आहे.काहींनी तर एकापेक्षा जास्त माणसे एकापाठोपाठ जाताना अनुभवली.वेदनादायक असा हा काळ आहे.बराच काळ घरात सगळे कुटुंबीय एकत्रित होते.त्यामुळे एकमेकांचा सहवास लाभला हे जरी खरं असलं तरी चार भिंतींच्या आत फार काळ तेही सुखदायी नसतं.काहींना तर एकटं रहावं लागलं होतं.ते तर त्याहून भयानक ! पण माणसाला उराड पण सोसत नाही आणि धुराडं पण सोडत नाही..याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.
  एक दिवस म्हणजे २४ तास..करणार काय ? उशिरा उठणं,खाणं,टीव्ही पाहणं,वाचन,लिखाण,संगीत यात मन रमवणं,काही घरात जमतील असे खेळ खेळणं,घरून जॉब करणाऱ्यांचे रोजचे टार्गेट पूर्ण करणं ही अशी रोजची कसरत होतीच.गृहिणींचा तर पार पिट्टा पडला या काळात.जरा म्हणून उसंत नाही.हे कर,ते बनव,भांडी घास,कपडे धु,केर फरशी सगळा नुसता ढीगच ढीग..
बाई बिचारी त्या कोरोनाच्या सात पिढ्यांचा उद्धार करत होती.बाकी सगळे मदत करत असतील.पण घरातल्या स्त्रीला वाढीव काम आलीच की.कधीही उसंत न घेणारी शहरं चिडीचूप झाली होती.पण घरातील 'तिला' जरा उसंत नव्हती.मुलं,पुरुष आपापल्यापरिने काम करत होती.कधी भांड्याला हात लावला नसेल अशा लोकांनी त्या काळात भांडी घासली.सोशल मीडिया सोबतीला होता हे सगळ दाखवायला.
   गोड कटू आठवणी एकमेकांसोबत वाटून घ्यायला सोशल मीडियाने बराच हातभार लावला.जुने फोटो,  अल्बम,व्हिडिओ बघण्यात सगळे दंग होते.जमेल ते,  मिळेल ते खाण-पिण ही सुरू होतच.खंत फक्त मुलांचे खेळणे,बागडणे सीमित झाल्याबद्दल वाटते.बाकी आपण काय नवीन बनवलं ते जगाला दाखवायची उत्सुकताही अनेकांमध्ये होती.ती या माध्यमातून पुरवली गेली.फोन,मेसेज,व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे पाठवून देखील अनेकांनी इतरांना आधार दिला.ज्यांना मदतीची आवश्यकता होती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.अनेक जन घरात बसून जरी असले तरी मदतीचा ओघ थांबला नव्हता.अनेक ठिकाणी मानवतेचे दर्शन घडत होते.समाज हितासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारे पोलीस,डॉक्टर,आरोग्य व स्वच्छता कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वच लोकांचे मानावे तेवढे उपकार व आभार थोडेच ! 
  त्रासदायक व मानवतेला काळिमा फासणारे विषय ही अनेक होते.स्थलांतरितांचा प्रश्न तर फारच गंभीर होतात.त्यांचे व त्याच्या मुलांचे हाल बघवत नव्हते. शेकडो मैल चालत जाणारे ते लोक आपल्या देशाचेच आहेत ना ? मग त्यांना एवढा त्रास का ? असे प्रश्न भेडसावत होते.अक्षरशः पाठीवर बि-हाड घेऊन लोक दयनीय अवस्थेत आश्रयासाठी धावत होते.आणि आपण काय करत होतो टाळ्या आणि टाळ्या वाजून कोरोना पळवून लावण्यासाठी केलेली सामूहिक चळवळ तर जागतिक हसू करून घेण्यासारखी होती.माणसांचे जीव जाण्याच्या काळात ठोस उपाययोजना करण्यात आपण सपशेल अयशस्वी झालो.हे सोडून आपण मानसिक रुग्ण झाल्यासारखे का वागत होतो ? हे त्या लोकांनी एकदा तरी स्वतःला विचारावं..शेजारच्या घरात दुःखाचे सावट असताना आपण टाळ्या वाजवत होतो हे किती लाजिरवाणी होतं.जे काम करतात त्यांच्यासाठी प्रोत्साहन होते म्हणे..अरे त्यांना उसंत होती का हे प्रदर्शन बघण्याची ?
    त्यातच भर म्हणून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम ही फार खुबीने करण्यात आले.मुस्लिम बांधवांना तर जेरीस आणलं.या सगळ्याचा काय अर्थ काढावा ? आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरू आहे.शेतकरी मायबाप अनेक संकटांना सामोरं जातं असतो.त्याला येणारं वर्ष इच्छापूर्तीच असावा..हेच मागणं !
बाकी लिहिण्यासारखं खुप आहे.पण किती ही लिहिलं तरी कमीच ! अशी गत..
माझं सगळं ठीक आहे.काही नवीन उद्योग करण्याचं योजलं होत.ते ह्या वर्षी मार्गी लागेल अशी अशा आहे.
आपल्या सर्वांनी माझा लेख प्रपंच स्वीकारला यासाठी सर्वांना भरपूर प्रेम ! सगळे असेच छान रहा..
   सरतं वर्ष सरलं..अनेक कटू आठवणी देऊन,  त्यातही सुखाचे क्षण शोधणारे,मृत्यूच्या दाढेतून परत आलेले असंख्य बांधव व भगिनी,तुम्ही-आम्ही,लहान,  वयोवृद्ध,कष्टकरी,शेतकरी सगळ्यांसाठीच हा काळ यातनामय व परीक्षेचा होता.या सगळ्यातून सुखरुप वाचलो हेच या वर्षाचं देणं समजावं..अपेक्षेप्रमाणे काही घडलं नसलं,तरी खचून जाऊ नका.
'सर सलामत,तो पगडी पचास' म्हणतात ते उगाच नाही. काही गमावलं,काही कमवलं हेच जीवन असतं.पुढचं येणारे २०२१ हे वर्ष या सगळ्या दुःखातून सावरण्याचे बळ सर्वांना देवो,संपूर्ण जग या व अशा इतर संकटापासून मुक्त होऊन सर्वत्र मानवहित जोपासल जावं,आरोग्यदायी जीवन सर्वांना लाभो,आपल्या आप्तेष्टांची साथ दीर्घकाळ लाभो..हीच प्रार्थना व नवीन वर्षासाठी शुभेच्छा !
सरत्या वर्षाला सलाम व उगवत्या वर्षाला प्रणाम !
अनेक शुभेच्छांसह..
आपली, 
प्राची दुधाने 

वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??