माय बाप शेतकरी

सवताच्या पोटाला घेवूनी चिमटा
माय बाप शेतकरी,
जगासाठी धन धांन्याची 
रास उभारी..
गडी आध्या रातीला बारं धरी.
ढवळ्या अन पवळ्या येळमाळं संगतीला, 
धावून जाय धन्याच्या मदतीला.
इमानदारीचा मळका सदरा,
बेईमाना परीस रुबाब करी. 
वरिसभर काळ्या मातीत गाळतो घाम,
पर त्याच्या कष्टाला कवा मिळल खरा दाम ? 
वाट बघणं एवढं मातुर उरलं त्याचं काम..
यळवर पाऊस अन बत्ती नाय,
बेफान बरसला,तरी डुईवर भार हाय,
अशा वक्ताला करावं काय ?
या इचारानं गडी बावरून जाय..
पोरीचं लगीन जोरात वाजवीन,
बेट्याला मोटा साहेब बनवीन.
सपान त्याचं व्हाऊन जाय,
सपरात बसून रडं माय..
सरकार इलाज काढील आता हिचं उरली आसा,
तीन बिलांनं मातुर पूर्ती केली निरासा.
ढेंकूर देयून बसल्या शेठला काय,
गोरगरिबांची जाण नाय !
जगाचा ह्यो पोशिंदा,
ठरिवलं तर पाडील बंद तुझा धंदा..
कोणी तरी सांगावं त्या वामन्याला,
बळीचा वारस हाय त्यो..
जरा जपून..नाय तर जुंपीन तुलाच नांगराला !!

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??