बदला नको,मज बदल हवा...
बदला नको,मज बदल हवा...
नव आशा अन नवदिशा,
ध्यास मज हा उषा अन निशा.
जात-पात,भेदभाव टाळूया,
नवसमाज निर्माण करूया.
मानवतेचे बीज रोवूनी,
आपुलकीच्या वटवृक्षाला
घालू प्रेमाचे खत पाणी.
ना माझे,ना तुझे असे जिथे,
गुण्यागोविंदाने राहू तिथे.
विश्व आपुले घरकुल,
उभारू असे संकुल.
आदर्श घेऊ महामानवांचा,
वारसा उभारू विचारांचा.
कृतीत घालून विचार चांगले,
परिवर्तनाचे बांधू पक्के इमले.
संघर्षाचा मार्ग आपला,
लढा नवा हा जरी मानला.
तरी तो पुरातन आहे,
परी,वाट नवी अन ध्यास नवा,
बदलाची वाट काळ पाहे.
बल असोनी अशक्त का रे ?
वर्ग होवूनी विखुरले सारे.
एकसंध होवूनी सशक्त बनूया,
मानवतेचे गीत गाऊया.
नसे भेद जिथे सकळा,
श्वास हवेत त्या घेवू मोकळा.
बदला नको,मज बदल हवा.
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment