Rejected Is Equal To Being Redirected To Something Better..
Rejected Is Equal To Being Redirected To Something Better..
नकार हा सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या पुनर्निर्देशका सम आहे.
मानवाचे आयुष्य वाटतं,दिसतं तितकं सोपं नाही
युगे बदलली,काळ बदलला मानवाने हळूहळू प्रगती केली,पण संघर्ष,प्रयत्न,यश,अपयश यासारखे शब्द मात्र त्याची पाठ सोडत नाहीत.माझ्यामते हेच शब्द कृतीत आले की बदल घडत असतो.हे सगळं होत असताना अनेकदा नकार पदरी पडतो.त्या नकारातून येणारी निराशा मानवाचं जीवन दुःखी व कष्टी बनवत.अनेकदा तर नकारांची मालिकाच सुरू असते.पण मानव देखील हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो.काही परिस्थितीपुढे हतबल देखील होतात.आपण आज एक समजून घेऊया,नकार हा आपल्या जीवनाचा एखादा चांगला पुनर्निर्देशक(Redirection)ठरू शकतो.
नकार आपल्याला आयुष्यात वयाच्या कोणत्याही टप्प्यात येऊ शकतो.नकाराकडे या नकारात्मकतेने बघण्यापेक्षा आपल्याला यापेक्षा चांगल्या गोष्टी, माणसं, जागा,संधी मिळणार आहे हा सकारात्मक विचार करावा. नकार म्हणजे एक जोखीम.ही जोखीम तर आपण पावलो पावली सगळीकडेच झेलत असतो.मग तो नकार कवटाळून दुःख करत बसायचं की पुनर्निर्देशन ही एक संधी काहीतरी चांगले मिळवण्यासाठी आहे म्हणून लढायचं हे तुम्ही ठरवा.आज आपण अनेक यशस्वी होऊन गेलेले व असलेले लोक पाहत आहोत.यशाच्या शिखरावर ते विराजमान आहेत.पण त्यांच्या ह्या यशामागे किती नकार त्यांनी पचवले आहेत याची कल्पना कधी केली आहे का ? इथे काही नाव मी उदाहरण म्हणून देत आहे.थोडा वेळ काढून त्यांच्या विषयी माहिती नक्की घ्या.महात्मा गांधी,अब्राहम लिंकन,सॉक्रेटिस, न्यूटन, रखमाबाई राऊत,इंदिराजी गांधी,डॉ.अब्दुल कलाम, अल्बर्ट आईन्स्टाईन,मर्लिन मनरो, बिल गेट्स,स्टीव्ह जॉब्स,रतन टाटा,धीरु भाई अंबानी, रजनीकांत, सोनियाजी गांधी,अमिताभ बच्चन,महेंद्रसिंग धोनी ही व अशी लांबलचक नोंदवता येईल अशी यादी निश्चितच तयार होईल.त्यात आपल्या ही नावाचा समावेश आहेच.
पण खरं कोणाच्या नकारातून सकारात्मकता निर्माण झाली असेल तर त्यातील माझ्या मनावर छाप निर्माण करणारे सर्व थोर समाजसुधारक,विचारवंत वीर,विरांगणा,महामानव आहेत.प्रत्येक महामानव समाजहितासाठी संघर्ष करत असताना नाकारला जात असतो.हे नकार म्हणजे प्रस्थापित व्यवस्था,विचार जे समाजहिता विरुद्ध कटिबद्ध असतात त्यांचा नकार म्हणजे संपूर्ण मानव जातीचा विरोध असे भासवणारे बटू असणारे पण विक्राळ रूप दाखवून केलेला विरोध होय.
बळी राजा एक कर्तव्यदक्ष,संविभागी,कुशल, जाणताराजा असून देखील त्याला नाकारले गेले.
आज हजारो वर्षे लोटून देखील बळीचे सामर्थ्य नाकारून त्याला पदोपदी अपमानित आपलीच लोक करत आहेत.पण तो बळी जेव्हा त्याच सर्वकाही कपटाने लुटल जात होत,त्याला पाशाने खांबाला बांधून त्यावर अन्याय होत होता,त्याचा सन्मान बटूच्या पायाखाली चिरडला जात होता.त्या परिस्थिती देखील बळीराजा खचला नाही. आत्मविश्वासाने ह्या सर्व परिस्थितीला सामोरं जात होता.
माझ्या ह्या बळीच राज्य पुन्हा यावं ही भावना निर्माण करणारा बळीराजा.माझ्या विझत चाललेल्या अशा प्रज्वलित करणारा बळी.नकारात्मकतेवर मात करून आदर्श निर्माण करायला शिकवणारी बळी राजा.
आज आपण आपला पूर्वज इतका कर्तुत्ववान,धीराचा, सामर्थ्यवान, संविभागी,जाणता राजा म्हणून बळीराजाचा गौरव करणे,नकाराला सामोरं जाताना त्याने दिलेला लढा समजून घेऊन त्यातून बोध घेणे गरजेचे आहे.
हाच बळीराजाचा वारसा पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जतन केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येक वेळेस नकाराला सामोर जावं लागलं.एवढेच काय तर त्यांचा शिवराज्यभिषेक देखील नाकारला गेला.पण जिजाऊंचे संस्कार काही हलके नव्हते.त्यांचा पाया सिंधू संस्कृती व बळीराज्याच्या इतिहासाच्या गौरवांकित पाऊल खुणांनी माखलेला होता.सर्व परिस्थितीवर मात करुन शिवाजी छत्रपती झाले,ते ही रयतेच्या हितासाठी.छत्रपती संभाजी महाराज तर आपल्याच लोकांच्या माध्यमातून नकाराला सामोरं गेले.त्यात परकीय विरोध हा वेगळाच.त्यातून स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती या आपल्या राजानं दिली.पुढे शाहू महाराज याच विचारांनी प्रेरित होऊन जनहितासाठी संघर्ष करत राहिले.नाकारातून विरोध पत्कारून त्यांनी अनेक समाजहिताचे कार्य केले.सर्व समाज एकसंघ ठेवण्यात आपल्या पूर्वजांप्रमाणे ते यशस्वी झाले.महात्मा फुले सावित्रीबाई यांनी तर स्त्री शिक्षणाची कवाडे उघडून समाजहिताचे कायमस्वरूपी कल्याण केले.आज मी आपल्यासमोर जे काही मांडत आहे त्यात त्यांचा वाटा निश्चितच अनमोल आहे.स्त्री म्हणून जगण्याचा,शिक्षणाचा मार्ग यांच्या मुळेच मला प्राप्त झाला.पण त्यासाठी त्यांना नकाराला सामोरं जावं लागलं होतं.सावित्रीबाईंना तर काय काय सोसावं लागलं याची यादी संपता संपणार नाही.
पुढे बाबासाहेबांनी केलेले योगदान या सर्वांवर एक शिक्कामोर्तब ठरले.संघर्ष,त्याग,नकारातून उभी राहिलेली भारताची राज्यघटना व त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे बाबासाहेब या सर्वांचे एकदा आयुष्य काय होते वाचाच.यातून समजेल नकारातून नवा मार्ग कसा शोधावा आणि तो सकारात्मक दृष्टीने कसा फलदायी करावा.या सर्वांनी तर समाजासाठी कार्य केल्याने विरोध पत्करला,नकार पचवला.आपल्याला आपल्यासाठीच करत असलेल्या कार्यातील नकार पचवता येत नाही. नकारातून अपयश येत म्हणतात पण हेच अपयश एखादी उत्तम संधी देखील निर्माण करतं हे आपण का विसरतो.
माझ्या आयुष्यात असे अनेक नकार मी पचवले आहेत.हे आपल्याच बरोबर का होतो हे प्रश्न निर्माण होतात.निराश,हतबल झाल्यासारखं वाटतं.
जे काही आपण करतो ते कितीही चांगलं असलं तरी नाकारले जातो.असं खूपदा होत.पण हा आयुष्याचा शेवट नसतो.एकीकडे नाकारले गेलो तरी इतर दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत हा विचार मी करते.आज मागे वळून पाहताना स्पष्ट दिसत,जे होतं ते चांगल्यासाठीच.अमुक ठिकाणी नाकारले गेले नसते तर हा मार्ग निवडला नसता.आज मी इथं आहे ते या नकारांमुळे.दुःख करत बसण्यात काहीच हुशारी नाही.यापेक्षा त्यातून मार्ग शोधा.कोणताही नकार वैयक्तिक घेऊ नका.ही वेळ,हे दुःख पुढे निश्चित सुखात बदलेल ही सकारात्मकता ठेवा.शेवटी सुख आपल्या मानण्यात असत.एखाद्या क्षेत्रात हवं तसं यश मिळत नसेल,सतत नाकारल्या जात आहात,तर एकीकडे प्रयत्न करत राहा आणि त्याच वेळेस इतर क्षेत्रात ही कार्य करून पहा.कोण जाणे यशाचा मार्ग तुमची वाट तिथं पाहत असेल.कधी कधी आपणच दुर्लक्ष करतो.थोड आजुबाजुला बघा,लक्षात येईल.
प्रत्येक नकाराला समोर जाताना माझ्यामध्ये झालेल्या बदलाबाबत मला अभिमान आहे.पडले,झगडले,रडले, चिडले,दुःखात,निराशेत राख झाले.पण पुन्हा माझ्या त्याच राखेतून निरखून उभी राहिले.माझा नवीन संघर्ष,नव्या पुनर्निर्देशक मार्गावर मी चालत राहिले.मी अशीच घडत आहे,रोज अधिक चांगल्या प्रकारे.येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात माझ्यासह हे नकार भेटत रहातील.घाबरू नका.आत्मविश्वासाने पुढे जा.खचून जावू नका.योग्य निर्देशक मार्ग निवडा आणि प्रयत्न करत रहा.
नितळ पाण्याच्या प्रवाहात तुमची नाव मार्ग काढत यशाच्या महासागरापर्यंत पोहोचेल.वाटेत काही वादळ भेटतीलच,ती पेलण्याची तयारी करा आणि नकारातून सकारात्मकतेकडे प्रवास सुरु ठेवा.
सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Very well written 👏
ReplyDeleteRejection hurts, but it’s not a thing you can’t recover from. If you are strong, you can use that pain to get back up and become more stronger than before
Rejection is not the end…It’s just a step on the path.
Use rejection as an opportunity and be always ready to learn from your mistakes.
And you have done that
Proud of you👍
Thank you sweetheart
Delete