समवयस्कांचा प्रभाव..Peer Pressure !
समवयस्कांचा प्रभाव..Peer Pressure !
अनेक विषयासंदर्भात लिहित आहे.त्यात मुला- मुलींविषयी लिहिणं फार महत्त्वाचा आहे.म्हणून हा विषय प्रथम घेत आहे.पुढे आणखीन काही विषय मुलं व पालक याबाबत घेणार आहे.तूर्तता पीअर प्रेशर म्हणजे समवयस्कांचा प्रभाव याविषयी माहितीस्तव हा लेख.मुळात बहुतांश पालकांना व मुलांना हे पीअर प्रेशर किंवा समवयस्कांचा प्रभाव म्हणजे नक्की काय हेच माहीती नसतं.पण हा विषय माहिती करून घेणे सर्वांसाठी हिताच आहे.समवयस्कांचा प्रभाव तुमचा आमचं जीवन कायमच बदलू शकतो हे लक्षात घ्या.
तर मुळातच पीअर प्रेशर किंवा समवयस्कांचा प्रभाव म्हणजे काय ?
आपल्या वयाचे असणारे लोक,समवयस्क.त्यात मित्र-मैत्रीण,बहिण-भाऊ(सख्खे,चुलत,मालत,इ.), विद्यार्थी,परिचित यांचा समावेश असतो.एका शाळेत, कॉलेजात,शेजारी,गावी,परदेशात कुठेही वास्तव्यास असलेल्या अथवा भेटणारे.आता तुम्ही म्हणाल यांचा प्रेशर म्हणजे प्रभाव कसला ?
मानव हा सामाजिक प्राणी आहे हे आपल्याला माहित आहे.या कारणाने माणूस एकटा राहू शकत नाही. त्याला त्याचा एक विशिष्ट गट,जमाव हा प्रिय असतो.एकट पडण्याची भीती प्रत्येक व्यक्तीला निर्माण होत असते.
हे एकटेपण आपल्या वाट्याला येऊ नये ह्यातून निर्माण होतो तो दबाव.हाच दबाव,प्रभावात रूपांतरित होतो.समवयस्कांचा दबावातून,प्रभाव.कोणत्यातरी कारणाने आपण आपल्या या गटापासून वेगळे वाटू नये.त्यांच्यामधे आपण काही ही करून सापादलो पाहिजे,स्वीकारले गेले पाहिजे त्यासाठी वाटेल ते करायची तयारी यातून निर्माण होते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारे आपले बालमित्र अनेक शारीरिक,मानसिक,वैचारिक बदलांना सामोर जात असतात.नवीन नवी आव्हाने त्यांची आ वासून वाट पहात असतात.त्यातून जर चांगले मित्र-मैत्रिणी यांची संगत लाभली तर ठीक नाही तर त्यांच्यासारखे जीवन जगण्याचे वेध यांना ही लागतात व पुढे नुकसान होत.
एक उदाहरण सांगते,म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
पार्वती नावाची अवघे १७ वय असलेली मुलगी बारावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी शहरात येते.
गावाकडे कौटुंबिक परिस्थिती बेताची.कर्ज काढून आई वडील तिला शिकायला पाठवतात.शहरात आल्यावर तिचं गावाकडचं शांत आयुष्य एकदम बदलून जातं.तिच रहानीमान एकदम साधा असल्याने तिला पटकन कोणी आपल्यात मिसळू देत नाही.पण होस्टेलमधील काही मुली तिला तिचे रहानीमान बदलण्याचा सल्ला देतात.त्या आपल्याबरोबर बोलल्या या विचारानेच पार्वती हर्षित होते.पण आपली परिस्थिती बेताची असल्याचे ती त्यांना सांगते.त्या मैत्रिणी तिला काही कपडे,मेकअपचे सामान देतात.हळूहळू पार्वती बदलू लागते.पुढे त्या मैत्रिणी तिला डिस्को,पब सारख्या ठिकाणी घेऊन जातात.पार्वतीला समजून चुकते कि ती जे काही करत आहे ते चुकीच आहे.पण आता खूप उशीर झाला आहे असं वाटतं.त्या मैत्रिणी तिला दारू पिण्यास प्रवृत्त करतात.आपण नाही म्हंटलो तर आपल्या मैत्रिणी हसतील,आपण पुन्हा एकटे पडू या भीतीने ती तो कडू घोट घेत रहाते.पुढे जे व्हायला नको तेच घडतं.पार्वतीच्या गुंगीचा फायदा घेतला जातो.
हे उदाहरण अतिशयोक्ती वाटले पण हे वास्तव आहे.अशा अनेक घटना घडल्या आहेत.आपण त्याबाबत किती गाफील आहोत हे यावरून समजत.संगत चांगल्या माणसांची असावी अस आपली वडीलधारी मंडळी नेहमी सांगत असत,ते यासाठीच.मुलं मुली गाव खेड्यातील असो अथवा शहरातील परिणाम एकच होवू शकतो.त्यासाठी सावध रहावं.
पार्वतीच्या बाबतीत जे घडल,ते सभोवतालचा तिच्यावर असणारा प्रभाव व दबाव या मुळे.आपण वेगळे आहोत,स्वीकारल्या जात नाही,एकटेपणा या भावनांनी तिच्यामध्ये न्यूनगंड,भीती निर्माण केली.शिक्षणाचे ध्येय बाजूला सारून ती आपल्या समवयस्कांच्या खोट्या भावविश्वाला भूलली.ह्या चुकीच्या प्रभावाने तिच्या आयुष्याचे ध्येय बदलून नुकसान केलं.ते या पीअर प्रेशरमुळे.आपण आपल्या मुला-मुलींना नाही का आणि कोणत्या वेळेस म्हणायचं हे शिकवलं पाहिजे.एखाद्या विषयाचे दडपण येऊन नको वाटत असलेल्या गोष्टी मनाविरुद्ध करायची आवश्यकता असुरक्षितता या भावनेतून निर्माण होते.त्यांना त्या सुरक्षिततेची जाणीव द्या.
मुलं-मुली आपल्या आई-वडिलांना प्रथम आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण करत असतात.वयात येताना आपल्यापेक्षा आपल्या पाल्यांना मित्र-मैत्रीण,समवयस्क जास्त भावू लागतात.पालक व पाल्य त्यांच्यातील अंतर वाढू लागतात.पालकांनी कितीही चांगले संस्कार दिले तरी बाहेरच्या जगाचा मोह मुलांना आकर्षित करत असतो.यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र मैत्रीण बनून त्यांच्याशी संवाद साधावा.ही प्रक्रिया मुलं लहान असतानाच स्वीकारावी.पुढं अंगवळणी पडल्याने मुलं व पालक यांच्यात कोणताही आडपडदा राहत नाही.बाहेरच्या विश्वाचे मायाजाळ कसं असतं याची पूर्वकल्पना पाल्यांना असावी.चुकीच्या,मनाविरुद्ध कोणतीही गोष्टला नकार द्यायला त्यांना शिकावा.
इतरांपेक्षा वेगळं असणं,कोणी आपल्याला मागे नाव ठेवण या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत याची जाणीव मुलांना करून द्यावी.हे पीअर प्रेशर चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारचे असत हे देखील समजून घ्यावं व मुलांना सांगावं.
आता या पीअर प्रेशरचे चांगले,वाईट प्रभाव कसे व कोणते ते बघूया.
वाईट प्रभावाबाबत आपण या आधी वाचलाच आहे,पण त्या विषयी थोड आणखीन जाणून घेऊ. मुलं-मुली आपण कोण आहोत हे विसरतात,आपण अयोग्य आहोत,स्वतःला कमी लेखू लागतात आणि चुकीचा प्रभाव स्वतःवर ओढवून घेतात.
उदाहरण-चित्रपटात असणारा अमुक एक नट शानमधे दारू,सिगरेट ओढतो,पितो त्याप्रमाणे काही मुलं प्रात्याक्षिक करत असतात,असं अमितला दिसतं.ते मित्र त्याला पण तसं कराण्यासाठी प्रवृत्त करतात.तो नकार देतो.पण त्याचे मित्र त्याला फट्टू,भेकड असं खूप काही म्हणतात.अमित भीतीने व रागाच्या अवेशातून मित्र म्हणतात ते ऐकतो व दारू,सिगारेट पितो.पण पुढे मात्र त्याला हे व्यसन लागतं.त्याच आयुष्य बरबाद होतं.पार्वती व अमित दोघांच्या बाबतीत तेच घडलं.वाईट संगत,वाईट प्रभाव !
पीअर प्रेशर चांगले देखील असतं.तुम्ही म्हणाल एवढं वाईट सांगितलं आता चांगलं काय असणार.
तर बघा,हीच पार्वती तिला इंग्रजी येत नव्हतं.तो तिला कमीपणा वाटू लागला.त्यातून एकट पडण्याची भीती,दबाव होताच.पण तिच्या मैत्रिणींनी तिला इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं.फावल्या वेळात त्या स्वतः तिला इंग्रजी वाचायला,बोलायला,लिहायला शिकवू लागल्या.छोटी छोटी इंग्रजी भाषेची पुस्तक तिला भेट देवु लागल्या.यातून पार्वतीचा उत्साह द्विगुणित झाला.काही महिन्यातच पार्वती उत्तम प्रकारे इंग्रजी बोलू,वाचू व लिहू लागली.हा चांगला प्रभाव.चांगले धेय्य एखाद्याच असेल व तेच धेय्य आपण ठेवलं,पण त्यासाठी चांगले कार्य,कष्ट करण्यास ठरवून धेय्य गाठलं तर त्याला चांगला प्रभाव म्हणाव.अमितने मित्रांना नकार दिला होता.त्याच्या त्या निर्णयावर अमित ठाम राहीला. त्याच्या चांगल्या प्रभावाने ते मित्र देखील सुधारले.हा चांगला प्रभाव.
पालकांनी आपल्या पाल्यांना चांगली संगत मिळावी यासाठी प्रयत्न निश्चित असतात.पण आपलीच मुल
एखाद्याचं आयुष्य चुकीचा प्रभाव पाडून बरबाद करणार नाहीत याची देखील दक्षता घ्यावी.सध्याच्या लहान व तरुण पिढीला लवकर exposure मिळत आहे. टीव्ही,सोशल मीडिया,चित्रपट इत्यादी माध्यमांद्वारे नवीन नवीन विषय वयाच्या आधीच डोळ्यासमोर दिसू लागतात.त्यातून काय घ्यावं व काय सोडून द्यावे हे मुलांना निवडता यायला हवं.लहान-लहान नकारात्मक प्रभाव पुढे भयाण रूप घेतात हे त्यांना सांगत चला.कोणाच्या बोलण्यात,वागण्यावर,पेहरावावर, व्यंगावर हसू नये.कोणाला काही येत नसेल तर त्यासाठी त्याची टिंगल करू नये.जगात खूप ज्ञानाच्या गोष्टी आहेत ज्यांच्या पासून आपण सगळेच वंचीत आहोत.एका मानवी जन्मात सगळं ज्ञान आत्मसात करणं केवळ अशक्य आहे,याची जाणीव पाल्यांना व्हावी यासाठी प्रयत्न करा.आपली परिस्थिती चांगली व दुसऱ्याची वाईट ही असमानता दूर करण्यासाठी हितकारक कार्य कसे करता येईल यासाठी मुला-मुलींनी वैचारिक असावं. पालकांचा आपल्या पाल्यावर मजबूत प्रभाव असावा. चांगलं वाईट बाबत जागरूकता पाल्यामध्ये निर्माण करावी.चांगली मैत्री असेल तर त्याला प्रोत्साहन,निवड याकडे देखील पालकांनी लक्ष द्यावे.कुटुंबामध्ये मुक्तसंवाद अत्यंत महत्त्वाचा.जबाबदार वर्तनाचा आदर्श निर्माण करावा यासाठी पालकांनी कृतीतून,विचारातून सकारात्मकतेचा पाल्यांवर प्रभाव पडणं अत्यावश्यक आहे.पालकांनी मुलांएवढे होऊन त्यांच्या जगाचा एक भाग व्हायला काय हरकत आहे? निखळ मैत्रीचं नातं निर्माण करून मुलांना समजून घेतलं तर तो देखील त्यांना घडवण्याचा उत्तम मार्ग होऊ शकतो.मुलांना मुक्त संवादातून त्यांची मतं जाणून त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर जबाबदारीची जाणीव वाढण्यास मदत होईल.निर्णय क्षमता वाढते.आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचे बळ मुलांना मिळेल.आपला चांगला प्रभाव इतरांवर कसा पाडायचा याचे कौशल्य मुलांना विचारातून,संवादातून,कृतीतून शिकवावं.
दुसऱ्याला त्रास देणारे,खोटे बोलणारे,चोरी करणारे, दुसऱ्याचा अनादर करणारे,चुकीच्या व्यसनांच्या आहारी असलेले,अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे,इतरांच हसू करणारे,दुसऱ्याला कमी लेखणारे,अविश्वासू मित्र मैत्रिणीन यांच्यापासून दूर राहणेच योग्य.एकटे पडतो ही भावना मुळात धोकेदायक.त्यामुळे आपण नेहमी आपल्या पाल्यासोबत आहोत ही भावना व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे.
एक महत्त्वाचं लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हे पिअर प्रेशर सुरू होतं.जसं की मित्र-मैत्रिणींनी वेळेवर घरी न येऊ देणे,एखाद्याला विनाकारण मारायला लावलं,मित्र-मैत्रिणींनी कपडे,वस्तू विकत घेतली म्हणून आपण त्यासाठी हट्ट करणं,अमुक एखादी गोष्ट फक्त मित्र मैत्रीण करत आहेत म्हटलं म्हणून अडून रहाण अशा असंख्य सहज,छोट्या,दुर्लक्ष करण्यासारख्या वाटणाऱ्या,पण दुर्लक्षित झाल्याने त्रासदायक ठरतात.
हे सांभाळा..
हे झालं मुलामुलींच.वयाने मोठ्या माणसांबरोबर देखील हे पीअर प्रेशर अधिराज्य गाजवत हे लक्षात ठेवा.कामाच्या ठिकाणी,समाजात,मित्र,नातेवाईक यांच्यात आपण वेगळे पडू नये या भीतीने आपण त्यांच्याप्रमाणे जगायला लागतो.हा प्रभाव आपले अस्तित्व पुसून टाकतो हे ध्यानात देखील येत नाही. आनंदाच्या वेळी सुद्धा आपण दबावात असतो,हे आपण त्या प्रभावित व्यक्तींपासून बाजूला आल्यावर समजतच.सुटकेचा निःश्वास,सुसकार्या सहित सोडतो..
कोणाला छान वाटेल म्हणून मना विरुद्ध वागू नका.तुम्ही वाईट आहात अथवा वाईटाने प्रभावित असाल तर बदला.तुम्ही चांगले आहात तर इतरांवर चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करा.वेगळ असण,एकट पडणं हा काही गुन्हा नाही."आपलं अस्सल अद्वितीय व्यक्तिमत्व",जतन करा.या शीर्षकाचा माझा लेख निश्चित वाचा.घोळक्यात फिरणं,मस्तीत वावरणं कोणीही करतो,पण एकट्याने संघर्ष करून चुकीच्या लोकांपासून दूर असणे हे केव्हाही बेहतर व त्यासाठी धैर्य लागतं लक्षात ठेवा.एका वेळेस तुम्ही अनेकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न कराल तर कधीच यशस्वी होणार नाही.त्यापेक्षा स्वतःवर मेहनत घ्या.
तुमच्या सकारात्मक ऊर्जेतून हा समाज उजागर करा.
सर्व वाचक पालक व पाल्य यांच्या वर चांगला सकारात्मक प्रभाव पडो व वाईट पीअर प्रेशर पासून आपण दूर रहावं या सदिच्छांसह आपण सर्वांसाठी हा लेख समर्पित..
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment