जागतिक पुरुष दिन !

जागतिक पुरुष दिन..

आज १९ नोव्हेंबर,जागतिक पुरुष दिन !
खूपदा स्त्रियांविषयी लिहिताना पुरुषांविषयी लिहावं अस वाटायचं.पण ह्या ना त्या कारणाने राहून गेलं.आज पुरुषांसाठी खास दिवस.जागतिक पुरुष दिन ! म्हंटल आज ही भेट द्यावी,समस्त पुरुष वर्गाला.
    पुरुष,जन्मापासून ते वयोवृद्ध सर्वांचा त्यात समावेश. लहान बाळाला किंवा मुलांना आपण मुलगा म्हणत असलो तरी तो पुरुषच असतो हे आपण जाणातो.
     स्त्री जशी अबला,मृदू,नम्र म्हणून ओळखली जाते तसा पुरुष सबल,राकट,रागीट अशी सगळी मर्दानी,  पुल्लिंगी बिरुद त्याला लावून ओळखला जातो.
स्त्रीने कसं असावं हे व्यवस्थेने सांगितला आहे.तसं पुरुषाने कस असाव हे देखील सांगायला ही व्यवस्था विसरली नाही.मुळात स्त्रियांवर पुरुष अत्याचार,अन्याय करतात,आपल्या ताकदीचा,पुरुषत्वाचा गैरफायदा घेतात.म्हणून ते वाईट किंवा चुकीचे असा समज आहे. निश्चितच काही प्रमाणात तो खरा देखील आहे.पण पुरुषांपेक्षा पुरुषीवृत्तीला जी पुरुषप्रधान,पितृसत्ताक मानसिकतेमुळे हा चुकीचा पायंडा पडला आहे त्याला दुर्लक्षित का करतो ?
    मला अनेक लोक म्हणतात,तुम्ही सारख्या पितृसत्ताक,पितृसत्ताक करता.त्याचा काय दोष ?
दोष कसा नाही ? जिथे विषमता निर्माण होते तिथे एक वरचढ तर दुसरा कमकुवत असणारच ना..त्यात ही स्त्री पुरुष असमानता..अर्थातच स्त्रियांना त्याचा अनावश्यक त्रास हजारो वर्षे सोसावा लागला आहे.पण याचा अर्थ हा सगळा दोष पुरुषांवर टाकण्यात काहीच तथ्य नाही.ह्या पुरुषसत्ताक,पितृसत्ताक (Patriarchy) व्यवस्थेच्या पहिल्या बळी स्त्रियाच आहेत.ही पुरुषी मानसिकता पुढे घेऊन जाण्याचे कार्य स्त्रियाच खुबीने करतात.
आई,आज्जी मुलीला व मुलाला वाढवताना भेदभाव करते.मुलीला बायकांसारखी तर मुलाला मोठ्या पुरुषांसारखी वागणूक मिळते.मुलगा हाच वंशाचा दिवा हे साफ चुकीचा आहे,पण ही प्रथम खतपाणी घालून इथं पर्यंत कोणी आणली ? सासू-सून,नणंद-भावजय, जावा-भावा,आई-मुलगी अशी अनेक नाती आहेत, ज्यामध्ये वादविवाद होत असतात.पुरुष याचा थोडा फायदा घेऊन आपला वचक स्त्रियांवर ठेवतात.कारण आयता कारभारीपणा कोण सोडणार.पण स्त्रियांच खर नुकसान हे इतर स्त्रिया जास्त करतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे.पूर्वी स्त्री मातृसत्ताक पद्धत होती हे आपण जाणतो.नंतर त्याचं रुपांतर पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये झालं हे देखील सगळ्यांना माहीत आहे.पुन्हा स्त्री-पुरुष समानतेचे धडे गिरवल्या जावू लागले.यात पुढाकार पुरुषांचा होता हे आपण विसरून चालणार नाही.
     आपल्या सुराज्यात स्त्रियांना सन्मान देणारा
राजा बळी,आपल्या स्वराज्यात परस्त्रीला मातेसमान आदर देणारा राजा छत्रपती शिवाजी,आपल्या पत्नीला,‘श्री सखी राज्ञी जयती’ ही पदवी देणारा 
राजा छत्रपती संभाजी,स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले,पुढे स्त्रीशिक्षणाची राजाज्ञा काढणारे छत्रपती शाहू महाराज,स्त्रियांचे हक्क,अधिकार त्यांचे कायदे स्वरूपात करून देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सतीप्रथा, बालविवाह,पुनर्विवाह,संपत्तीमध्ये अधिकार यासाठी कार्य करणारे राजा राम मोहन रॉय हे व असे सर्व स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढणारे पुरुषच होते हे नाकारून चालणार आहे का ? इथे कुठेही पुरुषांचा मोठेपणा दाखवण्याचा व स्त्रियांना कमी लेखण्याचा माझा हेतू नाही.स्त्री व पुरुष एकमेकास पूरक आहेत हे वास्तव जाणून घेण्यास आपण नाक तोंड का मुरडतो ? 
      आजवरची आपण आपली कुटुंब व्यवस्था विचारपूर्वक निरखून पाहिली तर त्यात किती असमानता आहे हे आपल्या लक्षात येईल.जन्माला येण्या आधी पासूनच हा विचार व्हायला लागतो.आपल्या मुलाचे अथवा मुलीचं लग्न झालं की म्हातारी माणसं नातवंडांचा तगादा लावतात.बरं नातवंड पाहिजे म्हणजे नातू(मुलगा) ही पहिली पसंती.इथेच पुरुषी मानसिकतेला बळ मिळतं व तिचा जन्म होतो.यात त्या जन्माला येणाऱ्या बाळाची   टीचभर देखील चूक नाही याची नोंद घ्या.हा समाज अनावश्यक फुलप्रूफ प्लॅन देत असतो.कधी,कसं,काय वागायचं याविषयी.जन्माला आलेला मुलगा असेल तर आनंदी आनंद,पण मुलगी झाली तर सगळा दोष सुनेचा.इथे पुन्हा पुरुषी मानसिकता आणखीन बाळस धरते.बरं हे करणारे आपले,बाहेरचे सगळ्यांचा समावेश असतो.ते अनावश्यक फुलप्रूफ म्हटलं ना ते इथं तर त्यांना उधाण येत.
    पुढे रोजच्या खाण्यापिण्यापासून,रहाणीमान,  आरोग्य,शिक्षण,मान-सन्मान इत्यादींमध्ये मुलगा मुलगी भेद बघून हे अंतर वाढवले जात.मुला-मुलींचं काय..त्यांना जे संस्कार घरातून,समाजातून मिळतात ते त्याच प्रमाणे स्वतःभोवती एक वलय तयार करत जातात.स्त्रियांचं संरक्षण पुरुषच करू शकतो वगैरे परंपरेने आलेले दाखले देत हे भेद आणखीन गडद  केले जातात.मुली-बायका नाजूकपणा जपत हेच खरं म्हणून स्वतःच स्वतःला कमी समजू लागतात. नाजूकपणा,नम्र,चारित्र्यसंपन्न, घरेलू, संस्कारी,सहनशील,निमूटपणे सगळं मान्य करणारी, ताब्यात राहणारी वगैरे वगैरे स्त्री असते.पुरुषात हे सगळे गुण असले की तो स्त्री तर होत नाही ना ? मग असं का ?       
       पुरुष रडत नाहीत ही तर गंमतच आहे.
न रडणारा पुरुष मी तरी अजून पाहिला नाही.
अरे ती भावना आहे.ती काय स्त्री-पुरुष बघून येत नसते.आपण लहान मुलाला रडत असला की त्याला म्हणतो,'काय बायकांसारखा रडतोस,अरे मर्द बन मर्द'! म्हणजे काय ? तर न रडणारा पुरुष मर्द.पुढे तोच पुरुष बाईला रडवतो.होना ? असा पुरुष संस्कारातून घडण्यापेक्षा मुली असलेल्या केव्हाही बेहत्तर.आपलं पोरगं चुकलं तरी तोच बरोबर म्हणून त्याच्यामधला नकारार्थी पुरुष जागृत करण्याचे काम घरातून सुरू होत.स्त्री-पुरुष नैसर्गिक भेद आहेत पण त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो तो किती ? आणि मानवानेच पुरुष श्रेष्ठ ही व्यवस्था निर्माण केल्याने किती द्वेष निर्माण होतो,हे फरक ओळखा.इंग्रजीत एक शब्द आहे MISOGYNY(मिसोजिनी) याचा अर्थ पुरुषाचा स्त्री जातीवरील तिरस्कार.हे असे शब्द कशाचं फळ म्हणावं ? आणखीन एक मराठी शब्द सांगते,परित्यक्ता स्त्री.
म्हणजे नवर्‍याने टाकलेली बाई.ह्यासाठी पुरुषाला शब्दच नाही.का ? पुरुषाला कुठे बाई टाकून जाते,हा समज.
    पण यात माझ्या बांधवांनो तुमचा पूर्णतः दोष आहे असं मी म्हणत नाही.संस्कार,व्यवस्थेचे तुम्ही देखील भक्ष आहात हे ध्यानात घ्या.पुरुषी अहंकार काही कामाचा नसतो,बघा..कुटुंब चालवता म्हणून तुम्ही महान होता आणि कर्ता म्हणून ओळखले जातात.हे एवढंच तुमच ध्येय नाही.कमवत कोणीही असू शकत.बायकोला साथ देऊन,मुलीला तिच्या पायावर उभ करून, आई-सासू-बहीण अशा सगळ्यांना त्यांना त्यांची ओळख निर्माण करून देण्यात,त्यांचा भागीदार होणं हे कार्य तुमचे ध्येय नाही का ? कुटुंबामधे मुला-मुलींना वाढवताना आपले योगदान किती ? कधी स्वतःला विचारलं का ?
आई वडील यांचे अनुकरण करत मुलं मोठी होतात.पुरुष होणे हा सुद्धा अनेकदा पुरुषांना शाप वाटत असेल. आपल्या मुलांना ते वाटू नये यासाठी थोडा बदल स्वीकारा.तुम्ही सर्व निश्चित चांगले आहात.
जो पुरुष आपल्या आयुष्यातील स्त्रियांचा आदर सत्कार करतो,त्यांना घरातील कामात,त्यांच्या व्यवसायात,त्यांना उभं करण्यात,त्यांचे कौतुक करतो त्याला बाईलवेडा, मूर्ख,बायल्या,बायकोचा चमचा इत्यादी बिरुदे लावली जातात.का ? तुमच्या पायात देखील अनावश्यक संस्कार,प्रथा,रूढी,परंपरा,समाज व्यवस्थेच्या बेड्या आहेत.हे मान्य करा व त्यातून स्वतःची सुटका करून घ्या.
    कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे म्हटलं जात.अर्थात तो किती फसवा असतो हे आपल्याला माहित आहे. तो झुकवाल तसा झुकतो.बऱ्याचदा स्त्रिया कायद्याचा गैरवापर करतात.सरळ,साध्या पुरुषांना त्याचा फटका बसतो.काही मुली मुळातच हेकेखोर,पुरुषी मानसिकतेच्या असल्याने जोडीदाराला नाच नाच नाचवतात.पुरुषी माज पुरुषालाच असतो असं नाही,तो बायकांनाही झपाटतो हे लक्षात घ्या.
(*मनाचं लिहीत नाही.अशा अनेक केसेस मी स्वतः पाहिल्या आहेत.म्हणून इथं मांडत आहे.)
हे प्रमाण नगण्य स्वरूपात असलं तरी त्याचा विपरीत परिणाम होत असतो.आपल्याला कोणी एक वरचढ ठरून सत्ता प्रस्थापित करायची नाही.गाडीच्या दोन चाकांप्रमाणे स्त्री पुरुष असतात.एक मोठा एक छोटा असला तर समतोल होईल कसा ? स्त्री पुरुष एकमेकांप्रती आदर भाव निर्माण होणे आवश्यक आहे.
    आज अनेक स्त्री-पुरुषांनी खोचक अशा पोस्ट केल्या आहेत.एक गमतीचा भाग म्हणून सोडून द्या.पण स्त्री दिन सम पुरुष दिन साजरा करण्यात काय हरकत आहे.
हो पण भविष्यात स्त्री-पुरुष दीन होऊ फिरू नये एवढी मात्र काळजी घ्या.शेवटी काय तर,'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'अशी आपली अवस्था.तर माझ्या समस्त पुरुष बांधवांना आजच्या जागतिक पुरुष दिनानिमित्त हा लेख समर्पित करत आहे.आपल्या विषयी जास्त जाणून,त्यातून भरपूर लिखाणं व्हावे यासाठी तुमची साथ मोलाची बरं का ?  
    सर्वां पुरुष बांधवांना खूप खूप शुभेच्छा ! 
आम्हा स्त्रीयांना आपला पुरुष म्हणून सार्थ अभिमान वाटावा असे कार्य आपल्या हातून घडो ही सदिच्छा !

प्राची दुधाने 
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??