धनतेरस निमित्त सर्वांना वैचारिक शुभेच्छा !
धनतेरस..धनत्रयोदशी !
वामनाने कपटाने बळीराजाचे राज्य व सर्वकाही त्याच्यापासून हिरावून घेतल्यानंतर बळीराजाला पाताळात धाडलं,म्हणजे मारलं.त्यानंतर बळीराजाचा पुत्र बाणासुर हा आपल्या फौजेसह वामनावर चाल करून गेला.बाणासुराच्या ह्या हल्ल्याने वामन काळजीनेच गतप्राण झाला.बळीराजाच्या मृत्यूनंतर जे धन वामनाने लुटले होते ते सर्व धनाचे मोजदाद बाणासुराने करून अश्विन वद्य त्रयोदशीला त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावस्येला आपल्या सर्व सरदारांना उत्तम प्रकारचे भोजन दिले.त्यानंतर बाणासुराने आपल्या कित्येक सरदारांना योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यांना आपापल्या मुलखात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हजर राहण्यासाठी हुकूम देऊन पाठवून दिले.
ह्या वरील माहितीवरून हे लक्षात येत की धनतेरस या दिवशी आपल्याकडे असलेली संपत्ती तीच मोजमापन करून योग्यरित्या तिचा विनियोग करणं गरजेचं.आपले पूर्वज हे कष्टकरी.शेतात राबून आपली उदरनिर्वाह करत.कापणीचा हंगाम झाला की त्यातून मिळणारे पिकलेल्या धान्याची मनोभावे पुजा केली जात.हे वैभव अखंड राहो यासाठी श्रद्धेने त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत.त्या अनुषंगाने आपण आपल्याकडील धन (दागिने,पैसा,धान्या,वाहन,इत्यादी)पुजन करतो.
धने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात,संसर्ग आणि सर्दी-खोकल्याचा धोका कमी होतो.म्हणून या दिवशी धने सेवन करतात.त्याचप्रमाणे गुळ,खोबरं देखील आपल्या गुणधर्मानुसार थंडीच्या दिवसात उपयुक्त असल्याने त्याचे ही सेवन केलं जात.उटणं,खोबर तेल हे अंगाला लावून अंघोळ केली जाते.त्या मागे देखील शास्त्रीय कारण आहे.दिवाळी दरम्यान थंडीची चाहूल लागते.बोचरी थंडी असल्याने शरीरावर रुक्षता वाढते.खोबर तेल व उटण्याचा वापर ही रुक्षता कमी करते.
शेतकरी,कष्टकरी,कारागीर आपापल्या अवजारांची झेंडू,शेवंतीची फुलं वाहून पुजा करतात.व्यापारी हिशोबाच्या वह्या,चोपडी यांची खरीदी व पुजन करतात.दिवा,पणती यांना एक विशिष्ट महत्व प्राप्त आहे. सकारात्मकतेचं व मांगल्याचं प्रतीक म्हणून सगळीकडे पणत्या लावल्या जातात.दुःख,निराशा,वाईटावर मात करून तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी पणती,दिवा.
असे हे आपले सण जे आपलं नातं ह्या मातीशी घट्ट बांधून ठेवतात. निसर्गचक्र हे जीवनचक्र आहे.
बदलत्या ऋतूनुसार त्याचे मानव जीवनामधे होणारे बदल या सणांद्वारे अंमलात आणल्या जातात.निर्मिती प्रक्रियेशी जुळून घेण्याचे वेळापत्रक जणू हे सण पुढ्यानंपिढ्यांचा वारसा जतन करतात.चुकीच्या प्रथा,परंपरा यांना शरण जाऊन काही तरी चुकीचा पायंडा पाडून सणांचे महत्व कमी होवू देवु नका.आपल्या पूर्वजांचा इतिहास वारसाने ह्या सणांमध्ये अखंड प्रवाहित होत असतो.तो समजून त्याप्रमाणे कृती अपेक्षित आहे.
धनतेरस..धनत्रयोदशीच्या सर्वांना वैचारिक शुभेच्छा !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment